विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संबलपूर, जि ल्हा.- ओरिसा विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ३७७३ चौरस मैल. सन १९०५ पावेतों ह्याचा छत्तिसगड भागांत समावेश होत होता. ह्या जिल्ह्याच्या तिन्ही बाजूंस पहाड व जंगलें आहेत, व मधली जागा साधारण सपाट आहे. याचे खालसा व जमीनदारी असे दोन मुख्य विभाग आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडून आग्नेय दिशेकडे महानदी ४० मैलपर्यंत वहात गेली आहे. ह्या जिल्ह्याच्या वायव्य दिशेस बारापहाड नांवाच्या टेंकडयांच्या योगानें १६ चौरस मैलांचें एक मोठें पठारच बनलेलें आहे. दुसरा महत्त्वाचा पहाड म्हणजे झारघाटी. या पहाडाची जास्तीत जास्त उंची ३००० फूट आहे. या जिल्ह्यांत जिकडे तिकडे तलावच तलाव दृष्टीस पडतात. बारापहाड टेंकडया या विंध्याद्रीच्याच शाखा होत. या टेंकडयांवर राखीव असें पुष्कळ जंगल आहे व जमीनदारी इष्टेटींचा बराच भाग त्यांनींच व्यापिला आहे. यांतील झाडांच्या मुख्य जाती म्हटल्या म्हणजे साग, बिजासाल व शिसू या होत. जिल्ह्याची हवा सर्द व रोगट आहे. सर्व जिल्ह्याचा विचार करतां पाऊस नियमित असतो.
इतिहासः- अगदीं जुन्या कागदपत्रावरून असें दिसून येतें कीं, हा भाग पूर्वी चव्हाण वंशीय रजपुतांच्या ताब्यांत होता. ते येथें पूर्वी संयुक्तप्रांतातील मैनपुरी नांवाच्या गांवाहून आले होते असें म्हणतात. सन १७९७ मध्यें हा भाग मराठयांनीं जिंकून आपल्या राज्यास जोडला होता. पण १८१७ सालीं इंग्रजांच्या वजनामुळें तो तेथील राजाच्या स्वाधीन करण्यांत आला व त्यावर बंगालच्या गव्हर्नरची देखरेख रहावी असें ठरलें. सन १८४९ मध्यें वारसाच्या अभावीं तो बंगालप्रांतास जोडला जाऊन त्या सरकारच्या ताब्यांत तो १८६२ सालापर्यंत होता व पुढें तो मध्यप्रांतांत सामील करण्यांत आला. बंडाच्या वेळीं व त्यानंतर बरेच दिवस सुरेंद्रशहा नांवाच्या एका तोतयानें फारच बंडाळी माजविली होती पण तो १८६४ त हद्दपार झाल्यावर जिकडे तिकडे पूर्ण स्थिरस्थावर झालें. ह्या जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ७८९४६६ आहे. ह्यां जिल्ह्यांतून आसामांत मजूर पाठविले जातात. या जिल्ह्यांत शहर असें फक्त एकच असून लहान खेडीं मात्र १९३८ आहेत. धर्मसंबंधीं आंकडयावरून असें दिसतें कीं जवळ जवळ शेंकडा ९१ लोक हिंदु आहेत व शेंकडा ८ लोक वन्यहिंदु आहेत. मुसुलमानांची वस्ती फक्त ३००० आहे. शेंकडा ८९ लोकांची भाषा उडिया आहे. सरासरी २५००० लोक ओरांप, ११००० लोक कोल; व ५००० लोक उडिया भाषा बोलतात. येथें राहणा-या मुख्य जाती येणेंप्रमाणें:- गोंड (शेंकडा ८), कोल्टा (शें. ११), सावर (शें. ९), गढा किंवा अहीर (शें. ११) व गांद (शें. १३). १६ जमीनदारी इस्टेटीपैकीं दहा राजगोंडांकडे, राजपूर व बरपाली चव्हाण रजपुतांकडे, एक रामपूर नांवाच्या दुस-या एका रजपुताकडे, बोरासांवर व धेन्स बिंझालांकडे आणि एक बिजेपूर नांवाच्या कोल्टा जातीच्या इसमाकडे, आहे. मध्यप्रान्तासारखी काळी भोर ममीन संबलपुरांत कोठेच आढळत नाहीं. संबलपूर शहराच्या आसपासच्या व महानदीच्या उत्तर किना-यानें बिलासपूर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत पसरलेला जमीनीचा भाग अत्यंत सुपीक आहे. जिल्ह्यांतील मुख्य पीक तांदूळ. त्यांच्या खालोखाल तीळ, उडीद, कोद्रु व थोडाबहुत कापूस आणि ऊंस हीं पिकें होतात.
या जिल्ह्यांत रामपूर येथें दगडी कोळशाची एक खाण आहे. कोठें कोठें ७ फूट जाडीपर्यंत कोळशाचा खडक लागतो. पहाडी भागांत बहुतेक लोखंड सांपडतें. महानदींतील हिराकुंड नांवाच्या बेटात पूर्वी हिरे सांपडत होते. इब नदींत अल्प प्रमाणांत सोनें सांपडतें व तलपतियाझुनान व पद्मपूर येथें शिसें आणि हिराकुंडाच्या समोर जुनई येथें अँटिमनी धातु सांपडते. अभ्रक सर्वत्र आहे. परंतु व्यापारदृष्टया तो उपयुक्त नाहीं. संबलपूर जिल्ह्यांत टसर जातीचें कापड तयार करणें हा एक महत्त्वाचा धंदा आहे. रेमेंदा व बरपाली हीं त्या धंद्याचीं मुख्य ठिकाणें होत. हीं कामें भुलिया व कोष्टी लोक करतात. कांदोबहल जवळ तुक्रा येथें कांशाच्या धातूचीं कामें चांगलीं होतात. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा फारच मागासलेला आहे. १९०१ सालीं शें. ३.३ इतक्या लोकांनां व कायतें लिहितां वाचतां येत होतें. त्यांत ४०० स्त्रिया होत्या.
त ह शी ल.- ही या जिल्ह्याच्या पूर्व भागाची एक तहशील असून हिचें क्षेत्रफळ १४८९ चौरस मैल व लोकसंख्या (१९०१) २७५३०२ आहे. या तहशिलींत एक शहर (संबलपूर) व ७६६ खेडीं आहेत. या तहशिलींत एकंदर सात जमीनदारी इस्टेटी असून त्यांचें सामवायिक क्षेत्रफळ ६१४ चौरस मैल आहे.
श ह र.- संबलपूर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें शहर बंगाल नागपूर रेल्वेच्या एका फांटयाचें शेवटचें स्टेशन आहे. शहर महानदीकांठीं वसलेलें आहे. येथील लो. सं. १९०१ सालीं १२८७० होती. या शहरीं सोमलई देवी नांवाची एक ग्रामदेवता आहे. तिच्या नांवावरूनच या शहरास संबलपूर हें नांव मिळालें असलें पाहिजे. सन १८६७ सालीं या शहरीं म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. हा सर्व जिल्हा व सोनपूर पटना व रैराखोल हीं संस्थानें या सर्वांची मुख्य व्यापारी पेठ संबलपूर हीच आहे. आसामांत मजूर पाठविण्याचें येथें एक ठाणें आहे. येथील मुख्य धंदा म्हणजे टसर जातीच्या रेशमाचे व सुती कापडाचे हातमाग होत. या शहरीं एक हायस्कूल (दुय्यमप्रतीचें) असून उडिया व हिंदी शाळाहि आहेत.