विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संभळ, त ह शी ल.- संयुक्तप्रान्त, मुरादाबाद जिल्ह्याची दक्षिणेकडील तहशील. क्षेत्रफळ ४६९ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) २४५८८६. हींत ४६६ खेडीं व संभळ (तहसिलीचें मुख्य ठिकाण) सोला, सराय व शिरसी हीं तीन मोठीं गांवें आहेत. तहशिलीच्या पूर्व भागाची जमीन रेताड आहे. येथील मुख्य पीक म्हटलें म्हणजे गहूं व ऊंस हें होय.
गा व.- संभळ तहशिलीचें मुख्य ठाणें. मुरादाबाद शहराच्या वायव्येस पक्कया सडकेनें हें २३ मैल आहे. लोकसंख्या ४०,०००. सध्यां चालू असलेल्या कलियुगाच्या पूर्वी होऊन गेलेल्या तिन्ही युगांत हें शहर अस्तित्वांत होतें व कनोजचा जयचंद व दिल्लीचा पृथ्वीराज यांच्यांत या गांवानजीक ब-याच झटापटी होऊन त्यांत जयचंदाचा पराभव झाला असें म्हणतात. इ. स. १३४६ च्या सुमारास तें अफगाण मुसुलमानांच्या ताब्यांत गेलें, तें पुढें अकबरानें (मोगल) काबीज केलें. पुढें १८ व्या शतकांत तें प्रसिद्ध पेंढारी अमीरखान (हाच टोंक संस्थानचा मूळ पुरुष होय) याची जन्मभूमि या दृष्टीनें प्रसिद्धीस आलें; येथें तयार होणारा मुख्य माल शुद्ध केलेली साखर हा होय. म्हशीच्या शिंगाच्या फण्याहि येथें होतात.