विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सरस्वती- या नदीदेवतेसंबंधीं वैदिक माहिती 'वेदविद्या' विभागांत (पृ. ३३६-३३७) दिलेली आढळेल. वेदोत्तर वाङ्मयांत तिला ब्रह्मदेवाची पत्नी वाग्देवता कल्पिलें आहे. ब-याचशा प्रवाहांनां सरस्वती हें नांव देण्यांत येतें. पण या नांवाच्या मुख्य नद्या दोन आहेतः (१) पंजाब इलाख्यांतील; ही नदी अंबाला जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सिरमूर संस्थानांत उगम पावून कर्नाळामधून नैर्ऋत्येस वहात जाते. नंतर उगमापासून ११० मैल असलेल्या पतियाळा संस्थानांतील घग्गर नदीस मिळते. अरवलींतून निघून कच्छच्या रणांत पडणारी दुसरी एक याच नांवाची नदी आहे.