विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संस्कार- संस्कारांचा उल्लेख वेदवाङ्मयांत प्रत्यक्ष आढळत नाहीं. परंतु ज्यावरून कांहीं संस्कारांचा बोध होईल अशा अर्थाचे मंत्र वेदांत-विशेषतः अथर्ववेदांत-आढळतात आणि त्या मंत्रांवरून उपनयन, विवाह व अंत्यविधि या संस्कारांचाच बोध होतो. यावरून हेच संस्कार फार प्राचीन असावेत असें वाटतें. हल्लीं ज्या विधींनां संस्कार म्हटलें जातें ते विधी प्रथम सूत्रग्रंथांतूनच आढळतात. त्यानंतर स्मृतिकार व प्रयोगकार यांनीं त्यांचें उपबृंहण केसें असावें. सूत्रांत ज्यांनां हल्ली संस्कार म्हणतात त्याशिवाय दुसरे अनेक विधी सांगितले आहेत, त्यामुळें सूत्रकालीं दिली गेली असावी असें वाटतें.
भारतीय लोकांत संस्कार म्हणून फक्त सोळा संस्कारच रूढ आहेत. कांहींच्या मतानें संस्कार अठ्ठेचाळीस, कांहींच्या मतानें पंचवीस व कांहींच्या मतानें सोळाच संस्कार असावेत. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन, चौल, उपनयन, महानाम्नीव्रत, महाव्रत, उपनिषद्व्रत, गोदानव्रत, समावर्तन व विवाह येथपर्यंत चवदा; पंचमहायज्ञ, अष्टकापार्वणश्राद्धादि सप्तपाकसंस्था, अग्न्याधानादि सप्त हविःसंस्था, अग्निष्टोमादि सप्त सोमसंस्था व आठ आत्मगुण एकूण अठ्ठेचाळीस संस्कार होतात. पंचवीस संस्कार ज्यांनीं सांगितले आहेत त्यांच्या मतानें गर्भाधानादि विवाहापर्यंत जे चवदा सांगितले आहेत त्यांत विष्णुबलि व निष्क्रमण हे दोन धरून सोळा; सप्तपाकसंस्था; पंचमहायज्ञ हा एक व उत्सर्जन-उपाकर्म हा एक असे मानिले आहेत. वरील संस्कारांत गर्भाधानापासून विवाहापर्यंतचे ब्राह्म व त्यापुढील दैव असे दोन भाग केले आहेत.
संस्कारांचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, इत्यादि त्रैवर्णिकांनां असून पुंसवनापासून चौलापर्यंतचें संस्कार स्त्रियांचे करावे पण ते अमंत्रक करावे असें सांगितलें आहे. याशिवाय संस्कारांचे नित्य, नैमित्तिक, मासिक व वार्षिक असेहि भेद मानिले आहेत. पंचमहायज्ञ हा नित्य संस्कार असून गर्भाधानादि विवाहापर्यंत नैमित्तिक; पार्वणश्राद्ध, दर्शश्राध्द, हे मासिक आणि उत्सर्जन-उपाकर्म हे वार्षिक संस्कार आहेत.
वरील पंचवीस संस्कारांपैकी हल्ली उपलब्ध असलेल्या ब-याचशा गृह्यसूत्रांत न आढळणारे म्हणजे विष्णुबलि, निष्क्रमण, महानाम्न्यादि व्रतचतुष्टयापैकीं पहिलीं तीन व्रतें होत. आश्वलायन गृह्यसूत्रांत गर्भाधान हा संस्कार प्रत्यक्ष उल्लेखिला नसून त्यासंबंधीं हवाला दिला आहे. सोळा संस्कारांपैकीं आज प्रचारांत असलेले संस्कार म्हणजे उपनयन, समावर्तन, विवाह आणि गर्भाधान हे होत. बाकीच्या संस्कारांपैकीं पुंसवनापासून चौलापर्यंत संस्कारांची उपनयनाच्या प्रसंगीं व महाव्रतादि व्रतचतुष्टयसंस्कारांची समावर्तनाच्या प्रसंगी अकरणप्रत्यवाय प्रायश्चित्तानें पूर्णता केली जाते. याशिवाय नामकरण केलें जातें परंतु तें संस्काररूपानें केलें जात नसून व्यवहाररूपानें केलें जातें. त्यांत संस्कारसंबंधी विहित क्रिया केली जात नाहीं.
वरील एकंदर परिस्थितीवरून असें दिसतें कीं, संस्कार म्हणजे मनुष्याच्या आयुष्यक्रमांतील विशिष्ट कालाचें दिग्दर्शन. जन्मास आल्यानंतर व्यक्तीला ओळखण्यासाठीं नामकरण, विद्यारंभासाठीं उपनयन, आणि प्रापंचिक इतर सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठीं विवाहसंस्कार. अशा त-हेचे हे तीन संस्कारच प्राचीन वाड्मयांत (अथर्ववेद) आढळतात. व तेच आजच्या कालापर्यंत कायम आहेत. गृह्यसूत्रातून जे संस्कार दिले आहेत त्यांचा बहुधां विवाह अथवा उपनयनापासून आरंभ आहे. परंतु जन्मास येणा-या मनुष्याचें संस्कार (ज्या ठिकाणीं गर्भधारणा व्हावयाचीं त्या) क्षेत्रसंस्कारापासून व्हावयास पाहिजेत. म्हणून प्रयोगकारांनीं संस्कारांस आरंभ गर्भाधानापासून केला आहे.