विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संस्कृति- सिव्हिलिझेशन व कल्चर या दोन इंग्रजी शब्दांचा कांहीं डिक्शन-यांत एकच अर्थ दिला आहे, तर कांहीं डिक्शन-यांत 'कल्चर' म्हणजे बौध्दिक सुधारणा असा अर्थ देऊन 'सिव्हिलिझेशन' याचा धार्मिक, नैतिक, सामाजिक वगैरे सुधारणा असा अर्थ दिला आहे. संस्कृति या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले केलेलें' असा व्यापकच आहे. संस्कृतीचें (सिव्हिलिझेशन) अखिल मानवजातीची प्रगति अशा दृष्टीनें परीक्षण करून शिवाय निरनिराळया मानवसमाजांची प्रगति या मर्यादित अर्थानेंहि या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थानें संस्कृतीचें लक्षण 'जातिराष्ट्रादि संघानां साकल्यं चरितस्य यत् व्यक्तं संस्कृति शब्देन भाषाशास्त्रत्मकं ननु,'' येणेंप्रमाणें देतां येईल. या मर्यादित अर्थानें प्राचीन काळच्या मूलग्रहकालीन, पर्शुभारतीय कालीन व भारतीय आर्य संस्कृति आणि असुरोबाबीलोनियन, मिसरी, प्राचीन ग्रीकरोमन, प्राचीन चिनी वगैरे संस्कृती यांची माहिती प्रस्तावनाखंडांत व त्या त्या देशविषयक लेखांत दिली आहे. थोडक्यांत असें सांगतां येईल कीं, मूलगृहकालीन आर्यसंस्कृति, असुरोबाबीलोनियन संस्कृति व मिसरी संस्कृति आज मृत असून, पर्शुभारतीय संस्कृति, पारशी समाजामार्फत, प्राचीन ग्रीकरोमन संस्कृति सांप्रतच्या पाश्चात्य संस्कृतिरूपानें, प्राचीन चिनी संस्कृति सांप्रतच्या चिनी समाजामार्फत आणि भारतीय आर्यसंस्कृति आजच्या हिंदु समाजामार्फत हयात असून ख्रिस्तोत्तर काळांत महंमद पैगंबरनिर्मित इस्लामी संस्कृतीचा उदय होऊन सांप्रत हिंदु, इस्लामी, पाश्चात्य आणि पारशी इतक्या संस्कृतींचा संग्राम चालू आहे. पण १९ व्या २० व्या शतकांत दळणवळणाची साधनें कल्पनांतील वाढल्यामुळें यापुढें वरील अनेक संस्कृतीचें वैशिष्टय फारसें शिल्लक न राहतां शेंदोनशें वर्षांत अखिल मानवजात समानसंस्कृतिक बनेल असा बराच संभव आहे.