प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन  
 
सस्तनप्राणी- सस्तनप्राणी म्हणजे सपृष्ठवंशवर्गांतील अत्युच्च पायरीचे प्राणी होत. सामान्यतः सर्व चतुष्पाद प्राणी या वर्गांत येतात. त्यांनां ओळखण्याची ढोबळ खूण म्हणजे त्यांच्या अंगावरील केंस व स्तन ही होत. त्यांच्या पोरांचें पोषण लहानपणीं कांहीं कालपर्यंत स्तनांतील दुधावर होतें. केंस हे बाह्यत्वचेपासून उत्पन्न होणारे कठिण अवयव असून त्यांचें पोषण रक्तानें होतें. केंसाचा खालील भाग म्हणजे त्याचें मूळ हें त्वचांतर्गत खलिकेंत असतें. ह्या खलिकेस केशपेशिका असें म्हणतात. ह्या केशपेशिकांच्या भोंवतीं स्नायूंचें दुहेरी वेष्टण असतें, त्यांच्या योगानें अंगावर शहारे येण्याची क्रिया होते. ह्या केसांनां जोडकेस कधींहि येत नाहींत. केंसांची रचना अत्यंत साधी असते. त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणें होतः - (१) लोंकर; ही केंसांच्या पिळण्यानें झालेली असते. (२) मिशा म्हणजे कांहीं प्राण्यांच्या वरील ओंठावर असणारे सरळ केंस होत. (३) सायाळ अगर हेजहाग यांच्या अंगावरील पिसें अथवा कांटे हा केंसाचाच एक प्रकार होय. कित्येक प्राण्यांमध्यें ह्या केसांचें नियतकालिक पतन होत असतें.

केशपेशिकांमध्यें स्निग्ध पदार्थ स्त्रवणारे दोन लहान पिंड असतात. त्यांनां त्वक्‍मेदःपिंड असें म्हणतात. यांच्या स्त्रवामुळें केंसांनां तुळतुळितपणा येतो. देवमासे व इतर जलचर सस्तनप्राणी ह्यांच्या अंगावर बहुतेक केंस नसतात. कित्येक प्राण्यांत केंसांची वाढ विवक्षित भागांत फार झालेली असते. उदाहरणार्थ घोडयाची अथवा सिंहाची आयाळ किंवा मनुष्य व कांहीं माकडांची दाढी. केंसांच्या रंगामध्येंहि निरनिराळे प्रकार असतात. निरनिराळया मानववंशांमध्यें निरनिराळया रंगांचे व प्रकारांचे केंस असतात. उदाहरणार्थ हबशी लोकांचें केंस रांठ व कुरळे असतात; चिनी लोकांचे लांब, सरळ व काळे असतात; आर्यलोकांचे काळसर, पिंगट व वलयित असतात. कित्येक प्राण्यांमध्यें केंसांच्या रंगाची मांडणी फारच सुंदर असते. वाघाच्या अंगावरील पट्टे व चित्त्याच्या अंगावरील ठिपके हें त्याचें उदाहरण होय. थंड देशांत राहणा-या प्राण्यांचे केशवर्ण ॠतुमानाप्रमाणें बदलतात व हे बदल निरर्थक होत नसतात; ते प्राण्यांच्या राहणीवर अवलंबून असतात. कारण त्यायोगानें त्यांच्या भक्ष्यास अगर शत्रूस ते सहज गोचर होत नाहींत. स्तन हे त्वचेपासून झालेलेच पिंड असतात. हे पिंड अधनलिकांच्या समुच्चयानें बनलेले असतात. एकदोन प्राण्यांच्या अपवादाखेरीज या नलिका स्तनाग्रांतून स्त्रवतात. स्तन दोन अगर त्याहून जास्त असतात व त्यांची ठेवण निरनिराळया प्राण्यांत निरनिराळया भागांवर असते. माकडें वगैरेंचे स्तन वक्षांवर असतात. वाघ, सिंह, मांजर वगैरेंचे वक्ष व उर ह्यांवर असतात व गाई म्हशींचे जांघेंत असतात. स्तन धारण करून आपल्या पोरांच्या पोषणाची काळजी घेण्यामुळेंच या वर्गाला सर्व प्राण्यांत अत्युच्च पद प्राप्त होऊन सस्तनप्राणी हें विशिष्ट नांव देण्यांत आलें आहे. या वर दिलेल्या दोन मुख्य लक्षणांच्या योगानें इतर सपृष्ठवंश प्राण्यांपासून सस्तनप्राणी हे सहज ओळखतां येतात, तरी पण खालीं दिलेलीं लक्षणेंहि महत्त्वाचीं आहेत. (१) वक्षगुहा (कुहर) व उदरगुहा (कुहर) यांनां एकमेकांपासून विभागणारा स्नायूंचा एक पडदा असतो. श्वसनक्रियेंत त्याचा फार उपयोग होतो. सर्व सस्तनप्राणी वातश्वासी आहेत व हवा फुप्फुसांत ओढून घेण्यास त्यांच्यांत तो पडदा हें एक मुख्य साधन आहे. (२) मणक्यांचें कशेरूघन स्वतंत्र रीतीनें तीन ठिकाणाहून वाढत असतें तें असें: कशेरूघनाच्या मध्यभागी व त्याच्या पूर्व व पश्चिम शेवटीं पूर्ण वाढ झाल्यावर हें तिन्ही भाग एकमय अथवा एकजीव होतात. शिवाय प्रत्येक दोन मणक्यांच्या कशेरूघनांच्यामध्यें एक तंतुमय तरुणास्थीची चकती असते. गात्रांचीं लांब हाडेंहि कशेरूघनाप्रमाणें तीन ठिकाणांहून वाढून नंतर एकमय होतात. (३) मणक्यांचा कशेरूघन पूर्व व पश्चिम शेवटीं सपाट असतो. मानेचे मणके सात असतात. (४) कपालास्थी सीमन्तांनी जोडलेले असतात व हे सीमन्त बहुतेक नाहींसे होत नाहींत. खालचा जबडा, कर्णपटलास्थि आणि जिव्हास्थि हींच फक्त हालणारीं हाडें असतात. करोटीला दोन संध्यर्बुदें असतात व त्यांनीं ती कण्याला जोडलेली असते. (५) श्रोणिमंडलाच्या उदरतलभागीं फक्त भगास्थींचाच संधि झालेला असतो. परंतु कांहीं सस्तनप्राण्यांत हे भगास्थी संयुक्त होत नाहींत. अंसचंचु हें निराळें  झालेंलें नसतें. तें शेषरूपानें असफलकाला लागलेला उचवटा ह्या रीतीनें बनलेलें दिसतें. खुष्याचा संधि हा जंघास्थि व घोटा ह्यांच्यामध्यें झालेला असतो. (६) हृदयाचे चार कर्ण असतात. रत्तचचें उष्णमान जास्त असतें. महाधमनीची कमान फत्तच् वामभागालाच असते. (७) रक्तरुधिरपेशी केंद्रहीन असून द्विबाह्यगोल अशा गोलाकृति असतात. फक्त उष्ट्रकुटुंबांत अंडाकृति असतात. (८) यांच्यांत वृक्कोन्मुखीशिरव्यूह नसतो. (९) पूर्वमस्तिष्क अथवा गुरुमस्तिष्क मध्यमस्तिष्कला अथवा चक्षुमस्तिष्काला झांकून टाकते व पूर्वमस्तिष्काच्या पृष्ठावर पुष्कळशा वळकटया पडलेल्या असतात. पूर्वमस्तिष्काचे दोन्ही खंड पूर्वमस्तिष्कसंधीनें सांधलेले असतात, व चक्षुमस्तिष्काचे आडवे विभाग झालेले असतात म्हणजे चार चक्षुमस्तिष्कखंड असतात. (१०) फक्त निस्स्तनाग्रप्राणी अंडीं घालतात. बाकीचे सर्व जरायुज आहेत व अर्भक बहुतेक पूर्णावस्थेंत जन्मतें. (११) यांनां दोन प्रकारचे दांत असतात. पहिल्या प्रकारचे म्हणजे दुधाचे दांत कांहीं कालानें पडून जातात, त्यानंतर चिरकालीन दांत येतात. जबडयाच्या अस्थींतील पोकळींत दांत घट्ट बसलेले असतात. त्यांच्या आकारमानावरून छेदकदंत, श्वदंत व पेषदंत (चर्वणकदंत) असे त्यांचे विभाग पाडलेले असतात. (१२) गर्भाचें पोषण मातेच्या रक्तव्यूहापासूनच होत असतें. एवढयाकरितां गर्भाशयाच्या आंतील कलेचें एका पडद्यांत विशिष्ट रूपांतर होऊन त्या पडद्याचें गर्भासभेंवती परिवर्तन होत असतें व त्यांत मातेच्या रक्तवाहिन्यांचें जाळें झालेलें असतें. तसेंच गर्भाच्या भोंवतालचे कलारूपी पडदेहि त्या पडद्याला आंतून मिळून परिवर्तन पावतात व यांच्यांतहि गर्भाच्या रक्तवाहिन्यांचें जाळें झालेलें असतें. या दुहेरी पडद्याचा कांही विशिष्ट भाग विशेष वाढतो त्याला वार अथवा जरायु असें म्हणतात. व यामुळें गर्भाचें पोषण होतें. जन्म पावल्यानंतर प्राण्याचें पोषण कांहीं कालपर्यंत मातेच्या स्तनांतील दुधावर होतें. निस्स्तनाग्र ह्या उपवर्गाखेरीजकरून वार अथवा जरायु सर्व सस्तनप्राण्यांत आढळून येते. सस्तनप्राण्यांचें वर्गीकरण या लेखाच्या शेवटीं कोष्टकरूपानें दिलें आहे. त्यांतील मुख्य मुख्य गणांचें संक्षिप्त वर्णन पुढें दिलें आहेः -

उ प व र्ग पं हि ला नि स्स्त ना ग्र अ थ वा आ द्य स स्त न प्रा णी.- ह्या उपवर्गांत एकच गण आहे, त्याला एकोत्सर्गस्थानधारी असें म्हणतात. हा उपवर्ग म्हणजे सस्तन प्राणिवर्गांतील अत्यंत निकृष्ट वर्ग होय. ह्या वर्गांत फार थोडे प्राणी येतात. यांचीं कांहीं लक्षणें उरग व विहग वर्गांशीं जुळतात म्हणून हे प्राणी सस्तन वर्ग व उरग आणि विहगवर्ग ह्यांमधील सांखळीच होत. हे प्राणी फक्त ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी व टास्मानिया या देशांतच सांपडतात. हंसचंचु अथवा पृथुपाद व कंटकित पिपालिकाद हे दोन प्राणी याचीं उदाहरणें होत.

लक्षणें:- या प्राण्यांत मादी कवचयुक्त अंडीं घालतें व तीं उबवते. मूत्र व पूरिष यांचें उत्सर्गस्थान एकच असतें. स्तनांनां अंग्रें नसतात परंतु स्तनापासून दूधस्तनकुहरांत स्त्रवतें. रक्ताचें उष्णमान कमी असतें. अंसमंडलाची रचना उरग वर्गांतील सरडयाच्या अंसमंडलाप्रमाणें असते व त्याला अंसचंचुहि असते व दोन्ही जत्रूंच्या खालच्या बाजूस इंग्रजी T या अक्षराच्या आकाराचें पूर्वोरःफलक असतें. गुरुमस्तिष्काचे दोन्ही खंड पूर्वमस्तिष्कसंधीनें जोडलेले नसतात. या प्राण्यांत खरे दांत नसतात व कानांस पाळीं नसतात.

हंसचंचु अथवा पृथुपादः- ह्याच्या तोंडाला बदकाप्रमाणें चोंच असते आणि तिनें तो चिखलांतून किडे व जीवजंतु काढून त्यावर आपली उपजीविका करतो. त्याचे पुढील पाय बदकासारखे असतात व त्यामुळें त्याला चांगलें पोहतां येतें. ह्या दोन लक्षणांवरून याचीं वरील नांवें पडलीं आहेत. ह्याच्या अंगावर मऊ लोंकरीसारखी लव असते. तो पाण्याच्या कांठाजवळ बिळें करून राहतो व त्यांत अंडीं घालतो. ह्या बिळांची लांबी ४० फुटांपर्यंत असते. हा आपल्या अन्नाचें जबडयाच्या कठिण भागानेंच चर्वण करतो. हा प्राणी भित्रा आहे.

कंटकित पिपीलिकादः- ह्याच्या अंगावर सायाळीसारखे कांटे असतात. ह्याचें तोंड लांब चिंचोळें असून त्याची जीभ लांब असते. जिभेवरील चिकटयाच्या योगानें मुंग्या वगैरे पकडून त्यांवर हा आपली उपजीविका करतो हा आपलीं अंडीं त्याच्या उदरतलावरील कातडीच्या पिशवीवजा घडींत ठेवून उबवतो. हा प्राणी निशाचर आहे.

उ प व र्ग२रा स स्त ना ग्र.- भाग (अ) मध्यम सस्तनप्राणी, लक्षणें:- या भागांत ऑस्ट्रेलियांतील आणि अमेरिकेंतील कांगरू व ओपोसुम नांवाचे प्राणी येतात. यांची पोरें अपूर्णावस्थेंत जन्मास येतात आणि त्यांचें रक्षण उदरतलावर आलेल्या पिशवीमध्यें होतें म्हणून या उपवर्गास उपवर्गकोशधारी असें नांव दिलें गेलें आहे. ह्या पशिवींत लांब स्तनाग्रें असतात व त्यांनां पोरें बरेच दिवस चिकटून राहतात. तीं पोरें अपूर्णावस्थेंत जन्मल्यामुळें दूध ओढण्यास असमर्थ असतात म्हणून त्यांच्या तोंडांमध्यें स्तनावरील स्नायूंच्या दाबाच्या योगानें दूध पिळलें जातें; यामुळें त्यांच्या श्वसननलिकेस अडचण होऊं नये म्हणून त्यांच्यांत श्वसननलिकेचें तोंड अन्ननलिकेपासून निराळें पडलेलें असतें व तें पश्चिम नसिकाद्वारांच्या लगत उघडतें.

यांच्या अस्थिपंजरांत दोन विशिष्ट लक्षणें असतात. खालच्या जबडयाच्या हाडांचे पश्चिम कोन मागें वळलेले असतात, श्रोणिमंडलांत दोन अस्थी जास्त झालेले असतात. ते उपगर्भकोशास आधार देण्यास उपयोगी पडतात. त्यांनां उत्तर (ऊर्ध्व) भगास्थि असें म्हणतात. मेंदूच्या पृष्ठभागावर वळकटया किंवा वलयें नसतात. गुमरुस्तिष्क इतर प्राण्यांच्या मानानें लहान असतो. वृषण पुं-जननेंद्रियाच्या अथवा शिश्नाच्या पुढच्या बाजूस असतो. अंडस्त्रोतस दोन निरनिराळे असतात. गर्भाशय दोन असतात व योनिमार्गहि दोन असतात पिरमॅल नांवाच्या प्राण्यांखेरीज इतरांत जरायु नसते.

या मध्यम सस्तन उपवर्गाचे दोन गण असून त्यांतील प्रत्येक भागांत चार कुलें आहेत. हे गण दन्तरचनेवरून पडले आहेत व त्यांच्या राहणीचा संबंधहि या दंतरचनेशीं आहे. पहिला गण बहुपूर्वसमदंती-यांतील प्राणी मांसभक्षक आहेत व दुसरा गण द्विपूर्वदंती- या गणांत वनस्पतिभक्षक प्राणी आहेत. द्विपूर्वदंती गणांत छेदक दंत थोडे असतात व श्वदंत फार लहान असतात. पहिल्या गणांत श्वदंत मोठाले असून छेदकदंत पुष्कळ व सारख्या आकाराचे असतात.

बहुपूर्व समंदती; यांत पुढील चार कुलें येतात:-

(१)ओपोसुमकुल:- ओपोसुम हे प्राणी झाडावर वस्ती करून राहतात. ते मांसाहारी अथवा कीटकभक्षक असतात. त्यांचें शेंपूट लांब असतें व तें विळखा घालण्यास उपयोगी असल्यामुळें ह्या झाडावरून त्या झाडावर जाण्यास तें त्यांनां उपयोगी पडतें. जठर लहान असून अंधांत्र लहान असतें. उपगर्भकोश बहुतेक नसतो. मादी पोरांनां पाठीवर स्वत:च्या शेंपटीभोंवतीं त्यांच्या शेंपटांचें वेष्टण करून वाहून नेते व दूध पाजण्याच्या वेळीं एकेक पोर पाठीवरून खालीं घेऊन पाजिते व पुन्हां पाठीवर ठेवते. मध्यअमेरिका, मेक्सिको आणि ब्राझिल ह्या प्रदेशांत हे प्राणी सापडतात.

(२) दास्युरीडी अथवा दास्युरकूल:- याची टास्मानियांतील लांडगा दास्युर व पट्टाईत पिपीलिकाद प्राणी हीं उदाहरणें होत. यांच्यांत श्वदंत मोठाले असतात, व अंधांत्र लहान असतें. यांत उपगर्भकोश नसतो पिलें जन्मतांच मादीच्या स्तनाग्रांस चिकटून तिच्या अंगावरील केंसांत झांकलेलीं राहतात. हे प्राणी फक्त ऑस्ट्रेलियांत सांपडतात.

(३) नोटोरिक्ट कुल:- यांतील प्राणी दक्षिण ऑस्ट्रेलियांतील वाळवंटांत आढळतात व ते जमीनींत बिळें करून राहतात.

(४) बांडीकुट कूल अथवा पिरॅमिल प्राणी:- हे लहान असून मांस अगर कीटक ह्यांवर आपली उपजीविका करतात. पिरॅमिल प्राण्यांत पोरें जरायुज असतात.

दुसरा गण द्विपूर्वदंती, ह्यांतहि ४ कुलें आहेतः- (१) फ्यास्कोकोमीडी अथवा फ्यास्कोलोमिसकुल:-यांतील प्राणी थोडेसे अस्वलासारखे दिसतात. ते निशाचर असून जमीनींत बिळें करून राहतात. यांचें शेंपूट लहान असतें.

(२) फ्यालान्जीरिडी अथवा फ्लायन्जरकुल:- यांतील प्राणी निशाचर असून झाडावर वास्तव्य करतात. यांच्या अंगावर लोंकर असते. शेंपूट लांब असून त्याचा आधारास उपयोग होतो. यांच्यांत अंधांत्र मोठें असतें.

(३) कांगरूकुल:- यांत पुष्कळ प्रकारचे कांगरू प्राणी आढळतात. कांहीं रानांत राहातात, कांहीं खडकावर मैदानांत राहतात तर कांहींनां झाडावर चढण्यांत मौज वाटते. कांहीं अगदीं लहान म्हणजे सरडयायेवढे असतात व मोठे म्हणजे बक-यायेवढे असतात. मोठी जात कळप करून हिरवळ रानांत राहते. ह्यांनां उपगर्भकोश असतो. ह्यांचे मागचे पाय पुढील पायांपेक्षां फार लांब असतात. ह्यांच्यांत जठर मोठें असतें. त्याचप्रमाणें अंधांत्रहि मोठें असतें. खडकांतील वालावी, कांगरू उंदीर हे प्राणी फार लहान असतात. कांगरू हा प्राणी फार माणसाळतो.

(५) इपनॉर्थीकुल:- या कुलांतील प्राणी बहुतेक नाहींसे झाले आहेत. फक्त एका जातीचे प्राणी दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांत आढळतात. या प्राण्यांत वरचा जबडा बहुपूर्वसमदंती गणांतील प्राण्यांच्या जबडयाप्रमाणें असतो व खालचा जबडा द्विपूर्वदंतींप्रमाणें असतो. ह्या प्राण्यांचें महत्त्व दोन गणांची सांखळी जोडण्यांत आहे.

भाग(आ)पूर्ण सस्तन अथवा जरायुसहित प्राणी:- आपणांस माहीत असलेले सर्व सस्तन प्राणी या वर्गांत येतात. यांची पोरें पूर्णावस्थेंत जन्मास येतात व यांच्यांत गर्भावस्थेचा काळहि जास्त असतो; या उपवर्गाचे अनेक गण आहेत, ते पुढें वर्गीकरणाच्या कोष्टकांत नमूद केले आहेत.

(१) निर्दंन्तगण:- या गणांतील प्राण्यांनां दांत नसतात किंवा असलेच तर बाल्यावस्थेंतच असतात. अगर त्यांची वाढ पूर्ण झालेली नसते. छेदकदंत व श्वदंत हे क्वचितच असतात. दाढांनां मूळें नसून त्यांच्यावर लुकणहि नसतें. हातांस व पायांस पंजे असतात व त्या पंजांचा आधार घेण्यास उपयोग होतो. परंतु त्यांनीं हल्ला करतां येत नाहीं व पंजांच्या नखांनां आंत ओढून घेतां येत नाहीं. मुष्क उदरांतच असतात. या गणाचीं उदाहरणें म्हटलीं म्हणजे नवजगतांतील मैंद, पिपीलिकाद व आर्माडीलो व जुन्या जगतांतील आर्डबार्क व पँगोलिन हीं होत.    

मैंदः- हे प्राणी नांवाप्रमाणें फार आळशी असतात. ते आपलें सर्व आयुष्य झाडावर लोंबकाळून काढतात. ते आपली उपजीविका कोंवळी पानें, कोंब व फळें ह्यांवर करतात. यांच्या अंगावर दाट केंस असतात. पुढचे पाय मागच्या पायांपेक्षां लांब असल्यामुळें त्यांस जमिनीवर चांगलें चालतां येत नाहीं. शत्रूची नजर चुकविण्याकरितां हे आपल्या अंगावर हिरवळ पसरून घेऊन आपला रंग झांकून टाकतात. ह्यांनां लुकण नसलेले दांत असतात.

पिपीलिकादः- ह्या प्राण्यांनां दांत मुळींच नसतात. ह्यांच्या अंगावर बरेच केंस असतात. ह्यांचे पंजे मोठाले असून त्यांच्या योगानें त्यांनां खाण्याकरितां वारुळें खणतां येतात. व आपल्या लांब चिकट जिभेनें ते मुंग्या पकडून खातात.

आर्माडीलो (खवल्या मांजर):- हे प्राणी निशाचर असून अति जलद पळतात व भराभर बिळें खणतात. ह्यांनां दाढा असतात व ह्यांची जीभ चिकट असते. हें आपली उपजीविका फळें, किडे, साप इत्यादिकांवर करतात. ह्यांच्या सर्वांगावर कांसव अथवा मगरीप्रमाणें हाडांचे खवले असतात व त्यांवर सापाप्रमाणें मऊ कात असते. सस्तन प्राण्यांत खवले किंवा कात फक्त ह्याच प्राण्यांत आहे.

आर्डवार्कः- हे प्राणी आफ्रिकेंत आढळतात. हे प्राणी फार भित्रे असून निशाचर वृत्तीचे आहेत, हे बिळें करून राहतात म्हणून बोअर लोक यांस जमिनींतील डुकर असें म्हणतात; हे आपली उपजीविका वाळवीवर करतात. ह्यांनां दांत आहेत.

पँगोलीन- मॅनिस अथवा खवल्या पिपीलिकादः-हे पूर्वआशिया, आफ्रिका व हिंदुस्थानांत आढळतात. हे बहुतेक बिळें करून राहतात. ह्यांनां दांत नसतात. व ह्यांची जीभ लांब असतें. ह्यांच्या खवल्यांचा रंग किंचित् पोपटी असतो. शेंपूट अंगापेक्षां लहान असतें. ह्या प्राण्याची लांबी साडेतीन फूट असते. हिंदुस्थानांत ह्यांच्या तीन जाती सांपडतात. सिकिम, मलायाद्वीपकल्प, ब्रह्मदेश सातपुडा व इतर डोंगरी भाग ह्या भागांत ते आढळतात. सातपुडयांत यांस बुंदरोहू असें म्हणतात. यांस इतर नांवें काळी मांजर, कासोळी मांजर अशी आहेत.

(२) तिमिगिलगण:- ह्यांत जलचर सस्तनप्राणी येतात. यांची शरीररचना त्यांनां पाण्यांत राहण्यास उपयोगी पडावी अशी बनलेली असते. त्यांनां चुकीनें मासे समजले जातें. म्हणून त्यांनां देवमासे वगैरे नांवें दिली गेलीं आहेत. परंतु माशाप्रमाणें त्यांनां जलश्वसेंद्रियें नसतात. तरी फुप्फुसांनींच त्यांची श्वसनक्रिया चालते. म्हणून नाकपुडया (एक अगर दोन) श्वसनक्रियेकरितां डोक्यावरती झालेल्या असतात. त्यांनां मागील पाय नसतात व त्यांच्या पुढील पायांचे वल्हाकार अवयव झालेले असतात व या अवयवांनां बोटें नसतात. यांच्या शरीराला मानेचा भाग बनलेला नसतो. व त्यांच्या कबंधाच्या मध्याला माशांप्रमाणे पर किंवा पंख असतो. शेंपूट माशांप्रमाणें पंखयुक्त असून पुच्छपंख चांगला परंतु सपाट असा वाढलेला असतो. व त्यांच्यांत जबर शक्ति असते. कातडें केंसरहित परंतु जाड असतें व त्याच्या खालीं चरबीचा जाड थर असतो. हे दुस-या प्राण्यांवर आपला उपजीविका करतात. या गणाचे दोन उपगण आहेत ते एक दंतधारी व दुसरा अस्थिधारी हे होत. पहिल्या उपगणांत डॉल्फिन, पॉरपॉईज हे येतात. दुस-या उपगणांत मोठाले देवमासे येतात. गंगेंत सांपडणारा शिशुमार हा दंतधारी आहे. हा सहापासून आठ फूट लांब असतो. हा हुगळी नदींत नेहमीं सांपडतो. डॉल्फिन प्राणी गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांत सांपडतात. बंगालच्या उपसागरांत व मलबार किना-यावर सागर डॉल्फिन सांपडतो. हिंदी महासागरांत मोठया जातीचा एक देवमासा सांपडतो.

(३) मत्स्यांगसम अथवा समुद्रधेनु गण:- हा जलचर सस्तन प्राण्यांचा एक गण आहे. ह्या गणांत विद्यमान दोनच जाती सांपडतात. अटलान्टिक व हिंदी महासागराच्या किना-यावर यांचें वास्तव्य असून ते वनस्पत्याहारी आहेत. यांचीं हाडें जाड असून भरीव असतात. कवटी लांबट असते, चेहे-याच्या अस्थींची वाढ पूर्ण झालेली नसते. ओंठ मोठाले असून हलणारे असतात. पुढील अवयव वल्हाकार असून प्रत्येक सांध्याच्या ठिकाणीं हलणारे असतात. मागील पाय झालेले असतात. पुच्छपंख सपाट वाढलेला असतो. कांतडें किंचित् केंसाळ असून जाड पंखरहित असतें. स्तन वक्षावर असून मादी पोरांस पुढील अवयवांनीं धरून दूध पाजते. यामुळें खलाशांनीं वरुणकन्या अगर सागरकन्या असें नांव दिलें. यांनां तोंडावर मिशा असतात. मॅनेटी व डूगांग हीं यांचीं उदाहरणें होत. मॅनेटीचें डोकें मोठें असतें. हा प्राणी अटलांटिक महासागरांत सांपडतो व अमेरिकेंतील उष्ण कटिबंधांतील नदीमुखापाशीहि आढळतो. हालिकोर डूगांग (सिंहलींत मुराउरा) हा सिलोनजवळ सांपडतो. हा पांचपासून सात फूट लांब असतो. हा प्राणी फार मंद असल्यामुळें त्यास पकडणें सोपें असतें. माणसांनां हे प्राणी मुळीच भीत नांहीत. बेहरींगच्या सामुद्रधुनींत -हेटिना नांवाची एक जात होती पण ती खलाशी लोकांनीं मारून नाहींशी केली.

(४)खुरयुक्त गण:- ह्या गणांतील प्राण्यांनां खूर असतात व त्यांच्या पायांची रचना धांवण्यायोग्य बनलेली असते. हे जमिनीवर राहणारे असून वनस्पत्याहारी आहेत. या गणांतील कांहीं प्राण्यांनां केंस फार असतात व कांहींनीं थोडे असतात. बोटें गात्रांच्या शेवटीं टोंकाशीं असतात व त्यांच्यावर शरीराचा सर्व भार असतो. दुधाचे व चिरकालीन असे दोन प्रकारचे दांत यांच्यांत असतात. श्वदंत लहान असतात किंवा या गणांतील कित्येक प्राण्यांत ते झालेलेच नसतात. दाढा मजबूत असून वलयांकित असतात. जत्रुअस्थि नसते. जरायूच्या पृष्ठवळकटया पसरलेल्या असतात. किंवा त्यांचे स्तबक बनलेले असतात.

वर्गीकरणाच्या कोष्टकांत (लेखाच्या शेवटीं) दिल्याप्रमाणें या गणाचे दोन भाग आहेतः- एक अंगुलीतलचर व दुसरा पादतलचर होत.

(१)अंगुलीतलचर:- यांतील प्राण्यांचे पाय बोटावर टेकलेले असतात व चारांपेक्षा जास्त बोटें उपयोगांत येत नाहीत. मुष्क वृषणांत असतात. स्तनाग्रें चार अगर जास्त असतात. व वक्षस्थलीं नसतात. गर्भाशय दुभागलेला असतो. वार अथवा जरायु पोर जन्मतांच ताबडतोब पडत नाहीं. या भागांत दोन उपगण मोडतात. ते विषमांगुली व समागुली हे होत. (१)उपगण विषमांगुली:-या उपगणांतील प्राण्यात मध्य किंवा तिसरी अंगुली मोठी असते व दुस-या अंगुली विकास पावत नाहींत. यांच्यांत पित्ताशय नसतो. जठर साधे असतें व अंधांत्र लांब मोठें असतें. या उपगणांत तापीरकुल, अश्वकुल, व गेंडाकुल अशीं तीन कुलें मोडतात.

तापीरः- हे प्राणी थोडसें डुकरासारखे दिसतात. नाक सोडेंसारखें पुढें आलेलें असतें पुढील पायाला चार व मागील पायाला तीन बोटें असतात. कातडें जाड असून त्यास केंस नसतात. ते दाट जंगलांत वस्ती करून निशाचर वृत्तीनें राहतात. यांचा प्रसार मध्य, दक्षिणअमेरिका यांमध्यें चार जातिविशेष व मलायाद्विपकल्पांत पांचवा जातिविशेष असा आहे पूर्वी यांचा प्रसार फार होता परंतु हल्ली हें प्राण्यविशेष या दोन दूर असलेल्या भागांत मात्र सांपडतात.

अश्वकुलांत घोडा, गाढव व झिब्रा इत्यादि प्राणी येतात. घोडा हा प्राणी अगदीं आपल्या बोटाच्या टोंकावर चालतो. पुढील व मागील पायांनां हें एकच बोट असतें. बाकी दोन बोटें कातडयांत झांकली गेलेलीं असतात व त्यांचीं हाडें मधल्या बोटास चिकटलेली असतात. श्वदंत लहान असून घोडीमध्यें हे बहुतेक नसतात. घोडयाचा जो आपण गुडघा म्हणून समजतों तो घोटा (किंवा मनगट) व पाय (किंवा हात) यांमधील सांधा होय. खरें कोपर किंवा गुडघे हे शरीरांत झांकलेले असतात. घोडा हा प्राणी फार प्राचीन काळापासून माणसाळलेला आहे. रानघोडे गाढवासारखे असतात व त्यांच्या अंगावर थोडेफार पट्टे असतात. घोडा हा फार उमदा व शहाणा प्राणी आहे. नांगराला जुंपण्यापासून अगर ओझें वाहण्यापासून तों लढाईच्या कामापर्यंत याचा उपयोग होतो. हा प्राणी कष्टाळू, धीट व विश्वासू असून धन्याकरितां प्रसंगीं वाटेल तें धोक्याचें काम करण्यास तत्पर असतो. घोडयाच्या शहाणपणाविषयीं अनेक गोष्टी ग्रंथांतून वाचण्यांत येतात. गाढव हा फार कष्टाळू व इमानी नोकर आहे. त्यास खावयास फारसें घालावें लागत नाहीं. त्याचें डोकें शरीराच्या मानानें बरेंच मोठें असतें व कान लांब असतात. रानगाढवें आफ्रिका व मध्यहिंदुस्थानांतील मैदानांत सांपडतात. झिब्रा हा प्राणी आफ्रिकेच्या दक्षिण भागांत सांपडतो व तेथें तो कळप करून राहतो. हा सहसा माणसाळत नाहीं. त्याचे पाय फार बारीक असतात. त्याच्या अंगावर पट्टे असतात व आयाळ लहान असते.

गेंडाकुलः- गेंडा हा प्राणी ओबडधोबड व जड असतो. त्याच्या पुढील व मागील पायांनां तीन बोटें असतात. कातडें फार जाड असून त्यावर थोडे केंस असतात व सुरकुत्या असतात. नाकावर एक किंवा दोन शिंगें असतात. या शिंगांनां अस्थीचा आधार नसतो. तर ती केंसांच्या एकत्र जमावानेंच झालेलीं असतात. मादीस दोन स्तन असतात. पुढील दात थोडे असून लवकर पडतात. आफ्रिकेत व हिंदुस्थानांत हे प्राणी सांपडतात. त्यांतल्या त्यांत हिंदुस्थानांतील गेंडा सर्वसामान्य माहीत आहे. गेंडयांनां दलदलीच्या जागीं राहणें आवडतें ते आपला निर्वाह झाडांच्या पाल्यावर करतात. आफ्रिकेतील व सुमात्रा बेटांतील गेंडयांनां दोन शिंगें असतात व तीं एक पुढें व दुसरें मागें अशीं असतात यांच्या कातडींचा ढाली करण्याकडे उपयोग करीत असत.

उपगण २ रा, समांगुलीः- यामध्यें दोन भेद आहेतः एक रवंथ करणा-या प्राण्यांचा व दुसरा रवंथ न करणा-यांचा. पहिल्यामध्यें हरिणकुल, उष्ट्रकुल, सांबरकुल, जिराफकुल, मृगशृंगधारीमेष व गोकुल हीं कुलें मोडतात. दुस-यामध्यें वराहकुल, पाणगेंडाकुल व द्विनाभिकुल हीं येतात. या उपगणांतील प्राण्यांत तिसरें व चवथें बोट समाकार व एकमेकांसारखें असून त्यांचें एक युगल झाल्याप्रमाणें दिसतें. हें युगल गात्राच्या ऊर्ध्व अक्षवर्तीरेषेंत आकारसदृश्य रीतींनें छेदल्यासारखें दिसतें. यांच्यांत दुसरी बोटें बनलेलीं नसतात. वक्षःकटिकशेरू एकोणीस असतात. यांच्यांत जठराला पिशव्याप्रमाणें बरेच भाग झालेले असतात. स्तनाग्रे पुष्कळ असलीं तर उदरावर उदरतलाच्या भागीं पसरलेलीं असतात व थोडीं असलीं तर जांघेच्या भागांत असतात. डोक्यावरील पुरःकपालास्थी उंच वाढून शिंगांनां आधार देतात. शिंगांची वाढ बाह्यतः असते. रवंथ करणारे अथवा रोमन्थक हें नांव त्या प्राण्यांनां रवंथ करण्याच्या संवयीमुळें मिळालेलें आहे. यांच्यांत या कारणास्तव जठराचे चार विभाग असतात. अन्ननलिका संपते त्या ठिकाणीं एक मोठी पहिली पिशवी असते तीस ''रूमेन'' असें म्हणतात. दुसरी पिशवी मधाच्या पोळयासारखी असते, तीस ''रेटीक्युसम'' असें म्हणतात. हिच्यामध्यें रूमेन उघडते. तिसरी पिशवी तिच्या पुढें असून तिला आंतून पुष्कळ घडया असतात. तीस ''सालटेरिअम'' अथवा ''मेनी-फ्लाईज'' असें म्हणतात. तिच्या पुढची शेंपटाची चौथी पिशवी, तीस ''आबोमेसम'' असें म्हणतात. रवंथ करणारे प्राणी अन्न फारसें चावल्याशिवाय भराभर गिळतात व तें अन्न लालामिश्रित होऊन पहिल्या व दुस-या पिशवींत जातें व तेथून परत स्नायूंच्या क्रियेनें तोंडांत येतें. नंतर रुंद दाढांनीं नीट चघळल्यावर त्याचा पातळ रस होतो व तो पुनः पोटांत जातांना अन्ननलिकेच्या बाजूस असणा-या पन्हाळानें तिस-या पिशवींतून गाळून चौथ्या पिशवींत जातो, व तेथें त्या पिशवींत असलेल्या पचनपिंडापासून स्त्रवणा-या पाचक रसाशीं मिसळून जाऊन पचन पावतो. यांच्या दांतांस कोनाकृति उंचवटे नसतात तर चंद्रकोराकृति लुकणाचीं वलयें असतात म्हणून या समूहास चंद्रकोरदंती असेंहि म्हणतात. वरील जबडयांत पुढील दांत अथवा छेदक दंत नसतात. परंतु त्यांच्या जागीं कठिण भाग असतो. त्यांवर खालच्या दांतांच्या योगानें अन्नाचें चर्वण केलें जातें. पायांची रचना धांवण्याजोगी असते तिस-या व चवथ्या अंगुलीचे अनुकूर्चास्थी एकवटलेले असतात. ह्यांच्या बाहेरच्या अंगुली निवळ गेळीं म्हणून राहतात व त्या जमिनीस केव्हांहि टेकत नाहींत.

हरिणकुलः- यामध्यें हिंदुस्थानांत व आफ्रिकेत सांपडणारें कांहीं लहान प्राणी येतात. त्यांचीं बाहेरील बोटें (दुसरें व पांचवें) पूर्ण असतात परंतु ती फार बारीक असतात. जठराला तीन पिशव्या असतात. पुष्कळ घडीची पिशवी नसते. हे प्राणी पाण्याच्या आश्रयानें राहतात. नापू व पिसाई अशी त्यांचीं हिंदुस्थानांतील नांवें आहेत. हे मलाया, मध्यप्रांतांतील बांबूवन वगैरे भागांतून सांपडतात.

उष्ट्रकूलः- या कुलांत उंट व लामा हे प्राणी येतात त्यांच्या पायांनां खुराऐवजीं उशीसारखें कातडयाचें वेष्टण असतें. म्हणून त्यांनां उपधानपाद असेंहि नांव दिलेलें आहे. ऊर्वस्थि लांब असते व गुडघे पुष्कळ खालीं असतात जठरास तीन पिशव्या असतात. त्या रूमेन, सालटेरिअम व आबोमसम ह्या होत. शेवटच्या दोन पिशव्या एकमेकीपासून बाह्यतः स्पष्ट रीतीनें व्यक्त होत नाहींत. रूमेनच्या कांहीं भागांवर मधाच्या पोळयाप्रमाणें दिसणारे अनंत जलविमोचक पेशीयुक्त ''सूक्ष्मकुहर'' अथवा ''जलकुहर'' असतात. उंटाच्या पाठीवर एक किंवा दोन मदारी असतात व त्या मदारींत एक प्रकारचा अन्नाचा सांठा असतो. या मदारींत चरबीयुक्त पेशी पुष्कळ असतात व त्या शरीराशीं तंतूंच्या योगानें जोडलेल्या असतात व ही चरबी हिंवाळयांत दडून राहणा-या प्राण्यांच्याप्रमाणेंच अन्न म्हणून शरीरांत शोषिली जाते. दोन मदारीचे उंट मध्यआशियांत सांपडतात.

उंट हा प्राणी लाबलांबच्या पल्ल्यावर ओझें वाहण्यास फार उपयोगी पडतो. पूर्वी टपालाच्या कामाकडे ह्याचा फार उपयोग करीत असत. उंटाच्या विशिष्ट रचनेवरून असें दिसून येईल कीं या रचना त्याच्या वाळवंटांतील राहणीला फार अवश्य अशाच आहेत. कातडयाच्या उशीमुळें यास वाळूंतून चालणें सोपें जातें. तसेंच अरण्यांतील दूर दूर असणा-या पाणथळ प्रदेशाकडे जाण्यास मदारींतील अन्न व पोटातील पाणी याचा फार उपयोग होतो. उंट हा कुरकुरणारा, असंतुष्ट व दुर्मुखलेला प्राणी असून लादल्यावरच कुरकुरत काम करतो. लामा व अल्पाका हे प्राणी लहान असून त्यानां मदार नसते. त्याच्या अंगावर लांब लोंकर असते. तिचा कापड विणण्याकडे उपयोग होतो. हे प्राणी दक्षिण अमेरिकेंत सांपडतात व उंटाप्रमाणेंच हट्टी व मूर्ख असतात.

साबरकुल किंवा मृगकुल:- यांच्या शिंगांना कपालास्थीचा आश्रय असतो व शिंगें दरवर्षी गळतात. बहुतकरून शिंगांनां शाखा असतात व त्यांनां भारशिंग असें म्हणतात. हीं बहुतेक नरांनांच असतात. ही शिंगें पोकळ नसतात. शिंगें गळून गेलीं म्हणजे तेथें गाठी येतात व त्यांपासून नवी पण जास्त जोराची अशी वाढ होते. ह्या प्राण्यांनां वरचे सुळे असतात. उदाहरणें - सांबर, रेड डीअर, कस्तुरीमृग व इतर मृग जाती होत. कस्तुरीमृग हा हिमालयांत व तिबेटांत सांपडतो. ह्याचे वरचे सुळे मोठाले असून खालीं वांकलेले असतात. नराच्या उदरतलभागीं कस्तुरीची पिशवी असते. रेड डीअर हा उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशांत सांपडतो व त्यांत नर व मादी या दोहोंनांहि शिंगें असतात. ह्यांच्या पायाला केंस असतात म्हणून त्यांचे पाय बर्फावरून घसरत नाहींत. हा प्राणी तेथील लोकांच्या फार उपयोगी पडणारा आहे.

जिराफकुलः- जिराफ हे अतिशय लांब मानेचे रवंथ करणारे प्राणी आहेत व हे फक्त आफ्रिकेंतील हिरवळ मैदानांतच सांपडतात. यांची मान जरी बरीच लांब असते तरी तिला सातच मणके असतात. यांनां दोन लहान शिंगें असून तीं केसांनीं आच्छादिलेलीं असतात. त्यांचे पायहि फार लांब असतात. हे कळप करून राहतात व झाडांच्या पानांवर उपजीविका करतात. ह्या कुलांतील दुसरा प्राणी ओकापि, याची मान लहान असते.

मृगशृंगधारीमेषकुलः- ह्या कुलांत प्राँगबक नांवाचे प्राणी मोडतात व ते उत्तरअमेरिकेंत सांपडतात. त्यांच्या शिंगांनां एक शाखा असते व ती शाखा नियमितपणें गळून पडते म्हणून यांनां मृगशृंगधारी मेष असें म्हटलें आहे. कारण यांची बाकी सर्व रचना बक-याप्रमाणेंच असते.

गोकुलः- कुलांत पोकळ शिंगांचे रवंथ करणारे प्राणी येतात. दक्षिणअमेरिका व आस्ट्रेलिया या देशांत हे मूळचे रहिवाशी नव्हते. बाकी सर्व जगभर ते पसरलेले आहेत. नर व मादी ह्या दोघांनांहि शिंगें असतात, त्यांतल्या त्यांत नराची शिंगें मोठालीं असतात. जठराच्या चार पिशव्या असतात व दांत वगैरे पूर्णपणें रवंथ करण्यास योग्य असे असतात. या कुलांत शेळया, बकरीं, मेंढया बैल, गाई, म्हशी, हरणें, नीलगाई, गवे कस्तुरीवृषभ इत्यादि प्राणी येतात. हरिण, रानगाई, रानम्हशी हे प्राणी शिकारी लोकांचे फार आवडते आहेत. इतर माणसाळलेल्या प्राण्यांचा बहुजन समाजाला फार उपयोग होतो.

भाग २ रा पादतलचर अथवा उपखुरिन्ः- ह्या भागांतील प्राण्यांच्या पायांनां पांच बोटें असतात व हे प्राणी तळपायावर चालतात. या भागांत दोन उपगण मोडतात ते रोमन्थक व शुंडाधारी हे होत.

उपगण १ ला, रोमन्थक अथवा हि-याकॉईडिआ:- ह्या लहानशा उपगणांत हिरेक्स जातीचाच प्राणी फक्त येतो. ह्या प्राण्याच्या अंगावर मऊ केंस असतात. पुढील पायांनां पूर्ण वाढलेलीं चार बोटें असतात व मागील पायांनां तीन बोटें असतात. यांनां श्वदंत नसतात. वरच्या जबडयांतील छेदक दन्त लांब असून वळलेले असतात आणि सारखे वाढत असतात. खालच्या जबडयाचे दांत पुढें आलेले असतात. यांचें शेंपूट फार लहान असतें. पाठीचे मणके पुष्कळ असतात. जत्रुअस्थि नसते. जठराचे दोन भाग झालेले असतात. बृहदात्राला दोन अंधांत्रें असतात. पित्ताशय नसतो. मुष्क बाहेर वृषणांत आलेले नसून उदरांतच असतात. या प्राण्यांनां बहुतेक सहा स्तनाग्रें असतात. हे प्राणी आफ्रिकेंत सांपडतात ते खडकांच्या खबदडींत किंवा झाडांच्या ढोलींतून वास्तव्य करतात.

उपगण, २ रा, शुंडाधारीः- या उपगणांत हत्ती येतात. हे प्राणी सर्वांस माहीत आहेत. विद्यमान प्राण्यांमध्यें हेच सर्वांत मोठे प्राणी आहेत. ह्यांची अवयवरचना पुष्कळशीं आदिकालिक आहे. ह्यांचे गात्रादि अवयव ओबडधोबड असून स्तंभासारखे असल्यामुळें शरीराचें अवाढव्य ओझें त्यांच्यावर तोलून धरतां येतें. पायाला पांच बोटें असून तीं कातडयानें जोडलेलीं असतात व प्रत्येक बोटाच्या शेवटीं खूर असतो. नासिका लांब नळीसारखी असून ती स्नायुयुक्त असल्याकारणानें वाटेल तशी वळवितां येतें. हिलाच सोंड असें म्हणतात. हिच्या शेवटीं बाह्यनासाद्वारें असतात. या सोडेंच्या योगानें त्यास कोणताहि पदार्थ उचलून घेतां येतो. छंदक दंत एकाच द्रव्याचे म्हणजे हस्तिदंताचे असून त्यांचे मोठाले सुळे (हस्तिदंत) बनतात. यांनां श्वदंत नसतात. दाढा मोठाल्या असून त्यांच्यांवर वलयें असतात. जठराचे निरनिराळे भाग नसतात. मुष्क वृषणांत उतरलेले नसतात. या प्राण्यांत दोन स्तनाग्रें असतात व तीं वक्षाच्या उदरतलावर असतात. अंगावर बारीक लव असते. कातडी जाड असते. हे प्राणी वनस्पत्याहारी आहेत. हत्तीचे दोन जातिविशेष सांपडतात. एक हिंदुस्थानांत व दुसरा आफ्रिकेंतील. हत्तीचें डोकें फार मोठें असतें व त्याच्या कपालास्थींतील पोकळया मोठया असून त्यांत पुष्कळ मोकळी जागा असते. त्याचे कानहि मोठे असतात. हत्ती हा प्राणी कळप करून राहतो. म्हैसूर व बंगालच्या बाजूकडील जंगलांत तो बराच आढळतो.

गण ५ वा, मांसभक्षक अथवा क्रव्यादः- या गणांतील प्राणी मांसावर उपजीविका करणारे आहेत व यांतील विशिष्ट प्राणी दुस-या प्राण्यास मारून त्यांचें ताजें मांसच खातात. हे प्राणी धीट व हिंस्त्र असतात. ह्यांचें घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतें व हे दिसण्यांस फार सुंदर असून ह्यांचें शरीर बहुतेक चित्रित असतें. हे प्राणी त्यांच्या दंतरचनेवरून तेव्हांच ओळखतां येतात. पुढील दांत बारीक असून श्वदंत फार मोठाले व तीक्ष्ण असतात. दाढांनां अणकुचीदार टोंकें असतात. वरील जबडयांतील शेवटला पूर्वचर्वणक दांत व खालील जबडयांतील पहिला चर्वणक दांत हे एकमेकांत कात्रीच्या पात्याप्रमाणें बसतात. यांचीं नखें तीक्ष्ण असतात व पंजे वळलेले असतात; पायाला चोहोंपेक्षां कमी बोटें नसतात. करोटीला पश्चिमालिका व मध्यमालिका असतात. खालील जबडयाचे स्नायू फार मजबूत असतात. जत्रु अस्थि मुळींच बनलेली नसते किंवा लहान असते. मेंदूची वाढ बरीच झालेली असते. पूर्वमस्तिष्क वलयांकित असतो. जठर साधें असून अंधांत्र लहान असतें, अथवा मुळींच नसतें. स्तनाग्रें उदरावर असतात, पिलें जन्मल्याबरोबरच वार पडते. या प्राण्यांचा विस्तार सर्व जगभर आहे. ह्या गणाचे दोन उपगण आहेत ते (१) स्फुटांगुली व (२) जालपाद अथवा संयुतांगुली हे होत.

उपगण १ ला,स्फुटांगुली- ह्या उपगणांतील प्राण्यांचीं बोटें जोडलेलीं नसतात. हे प्राणी जमिनीवर वास्तव्य करणारे मांसभक्षक होत. ह्याचे तीन विभाग करतात. पहिला विभाग मांजरासारखे मांसभक्षक प्राणी होत. हे पायांच्या बोटांवर चालतात. या विभागांत पुढील कुलें येतात.

मार्जारकुलः- या कुलात सिंह, वाघ, चित्ता मांजर व रानमांजर इत्यादि प्राणी येतात. यांचे श्वदंत मोठाले असतात. करोटी साधारण गोल असते. नखें आंत मिटवितां येतात. खरखरीत जिभेनें व दाढांच्या टोकांनीं हाडांपासून त्यांनां मांस तेव्हांच मोकळें करतां येतें. घ्राणेंद्रिय व श्रवणेंद्रिय हीं फार तीक्ष्ण असतात. हे प्राणी कळप करून रहात नाहींत. सिंहः-ह्यांच्या अंगावर पट्टे वगैरे नसतात, परंतु नराला मोठी आयाळ असते. आफ्रिका व हिंदुस्थान ह्या देशांत हे प्राणी सांपडतात. काठेवाडचा सिंह प्रसिद्धच आहे. ह्याची गर्जना मोठी असते. वाघः-ह्याच्या अंगावर पट्टे असतात. हा दबा धरून भक्ष्य पकडण्यांत मोठा तरबेज असल्यामुळें फार भयंकर प्राणी आहे. चित्ता व बिब्या वाघः-हे अंगानें इतके स्थूल नसतात. ह्यांच्या पुष्कळ जाती आहेत. ह्यांनां ठिपके व पट्टे यांमुळें झाडींत दबून बसण्यास फार सोईचें होतें.

गंधमार्जारकुलः- यांत गंधमार्जार अथवा जव्हारीमांजर, मुंगूस व ऊद इत्यादि प्राणी येतात. यांचें मुस्कट जरासें लांबट असतें व शरीर लांब असून पाय आंखूड असतात.

विभाग २ रा, तरसकुलः- तरस हे कांहीसें कुत्र्यासारखे दिसतात व ह्यांचे पुढील पाय व मागील पाय सारखे नसल्यामुळें हे लंगडत चालल्यासारखे दिसतात. त्यांच्या अंगावर पट्टे असतात. हे प्रेतें उकरून खातात. हे फार क्रूर दिसतात. हें आफ्रिकेंत व दक्षिण आशियांत सांपडतात.

प्रोटिलसकुलः- ह्यांत प्रोटिलस नांवाचा प्राणी येतो. हा जवळ जवळ तरसासारखाच दिसतो. हा दक्षिण आफ्रिकेंत सांपडतो. ह्यास इंग्रजींत जमिनींतील लांडगा असें म्हणतात.

स्फुटांगुली उपगणांतील तिसरा विभाग श्वानविभाग होय. ह्यांत प्राण्याचें तोंड लांबट असून त्याला दांत पुष्कळ असतात. पाय लांब असून त्यांचा धांवण्यास उपयोग होतो. नखें आंत मिटलीं जात नाहींत. ह्यात एकच कुल आहे तें श्वकुल होय. याचीं उदाहरणें कुत्रा, लांडगा, कोल्हा, खोकड वगैरे होत. हे सर्व प्राणी कळप करून राहतात. कोल्ह्याच्या कळपाची कुई सर्वत्र ऐकूं येते व रशियांतील लांडग्याच्या कळपाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. ह्यांतील कुत्रा हा फक्त माणसाळलेला प्राणी आहे.

उपगण२रा, जालपाद अथवा संयुतांगुलीः- ह्यांत समुद्रांतील मांसभक्षक प्राणी येतात. यांनां जमिनीवर सहज चालतां येत नाहीं. पुढील व मागील पायांचीं बोटें जोडलेलीं असल्यामुळें त्यांस वरील नांव पडलें आहे. अवयवाचे वरील भाग शरीरांत झांकले गेलेले असतात व फक्त पंजे बाहेर असतात. मागील पाय वळलेले असून माशांच्या पुच्छपंख्याप्रमाणें त्यांचा उपयोग होतो. शेंपूट लहान असतें. केंस दाट व जाड असतात. हे प्राणी विशेषतः उत्तरध्रुवाकडे जास्त सांपडतात, उष्णकटिबंधांत कधींच नसतात. हे प्राणी माशांवर व समुद्रांतील लहान प्राण्यांवर आपली उपजीविका करतात. यांचीं उदाहरणें म्हटलीं म्हणजे कर्णयुक्त सील, सील व वालरस हीं होत. कर्णयुक्त सील अथवा सागरसिंह यास कानाचीं पाळीं असतात व त्याला मागील पायांवर चालतां येतें. हे पासिफिक महासागरांत सांपडतात. वालरस हा उत्तरध्रुवाकडे सांपडतो. याचे वरचे सुळे दोन दोन फूट लांब वाढतात व बाहेर येतात, त्यामुळें हा भयंकर दिसतो. हे कळप करून राहतात. हे आपला निर्वाह शिंपातील प्राण्यांवर करतात. ह्यांनांहि मागील पायांवर चालतां येतें. सील ह्याच्या शरीराची रचना पूर्णपणें पाण्यांत राहण्याजोगी बनलेली असते व हा जमिनीवर उडया मारीत चालतो. ह्याच्या अंगावर केंस असतात. त्यांचा ग्रीनलंडमधील लोक लोंकरीसारखा उपयोग करितात.

गण ६ वा, निकृंतक:- ह्या गणांतील प्राणी सर्व जगभर पसरले आहेत व ह्यांच्या अनेक जाती आहेत. हे सर्व वनस्पत्याहारी आहेत व बहुतेक लहान आकाराचे असतात. बहुतेक सर्व प्राणी जमिनीवर वास्तव्य करणारे आहेत. कांहीं बिळें करण्यांत फार पटाईत आहेत, कांहीं झाडांवरून राहणारे आहेत तर कांहीजण जलचर आहेत. ह्यांच्या अंगावर मऊ केंस असतात किंवा क्वचित् कांटे असतात. हे पायांच्या तळव्यावर चालतात व यांच्या पायांना पांच बोटें असतात व त्यांस बोथट नखें असतात. यांच्यांत दंतरचना विशिष्ट प्रकारची असते. छेदक दंत पटाशीच्या आकराचे असतात व त्यांच्या बाहेरील बाजूवरच फक्त लुकण असतें. या दंतांनां मुळें नसतात व ते सारखे वाढणारे असतात. खालच्या जबडयांत छेदक दंतांची एकच जोडी असते व बहुतेक प्राण्यांत वरच्याहि जबडयांत एकच असते. श्वदंत मुळींच नसतात. दाढा व हे पुढील दांत ह्यांमध्यें बरीच रिकामी जागा किंवा फट राहते; त्या फटींत कातडयाचा भाग उशीप्रमाणें आंत बसतो. जत्रुअस्थि लहान असते. अंसफलकाला लांब अंसकूट असतो. पूर्वमस्तिष्क वलयांकित नसतो व तो पश्चिममस्तिष्कास झांकून टाकीत नाहीं. मुष्क बाहेर वृषणांत उतरलेले असतात किंवा आंत उदरांत असतात. स्तनाग्रें उदरावर असतात. गर्भाशय दोन असतात व पिलें जन्मतांच वार पडते. यांचा विस्तार सर्व जगभर आहेच तथापि दक्षिण अमेरिकेंत हे प्राणी विपुल आहेत. यांचीं उदाहरणें म्हटलीं म्हणजे ससा, खार उंदीर, चिचुंद्री, गिनिपिग व पांढरे उंदीर, सायाळ, बीव्हर, जेरोबा किंवा नाचणारा उंदीर इत्यादि.

ससे व रानससेः- ह्यांनां वरच्या जबडयांत छेदक दंतांची एक अधिक जोडी असते म्हणून हे द्विगुणदंती होत, पण हे दांत लहान असतात व त्यांचा त्या प्राण्यांस कांहींच उपयोग होत नाहीं. त्यांचें शेंपूट लहान असतें व कातडीवर मऊ केंस असतात. पांढरे ससे फार गोजिरवाणे दिसतात. बाकीच्या सर्व प्राण्यांत छेदक दंतांची एकच जोडी असते, म्हणून त्या सर्वांनां ''एकैकदंती'' असें म्हणतात. ह्यांत बरीच कुलें येतात, त्यांचे तीन विभाग केले आहेत.

(१) खारविभाग:- ह्यांत खारी, बीव्हर इत्यादि प्राणी येतात. खारीचें शेंपूट झुपकेदार असतें, मागील पाय लांब असतात. हे प्राणी आनंदी असतात व नेहमी झाडांवरून बागडतांना आढळतात. ह्यांच्या जातीमध्यें अनेक प्रकार आहेत: तांबडी खार, करडी खार, उडणारी खार इत्यादि. उडणा-या खारीला कबंधाच्या दोन्ही बाजूंस छत्रीवजा कातडीच्या घडया असतात; त्या त्यांनां उडया मारतांना शरीर तोलून धरण्यास उपयोगी पडतात. त्यांचें शेंपूटहि चपटें असतें. बीव्हर हा प्राणी पाण्याच्या जवळ राहतो व त्यास पाण्यांत पोहतां येतें. ह्याच्या मागील पायाचीं बोटें जोडलेली असतात व शेंपटीवर खवले असतात. तो नदी व नाले यांच्या कांठचीं झाडाचीं खोडें आडवी पाडतो व सर्व प्रदेश दलदलीचा करून टाकतो व आपल्या बिळापर्यंत पाणी येईलसें करतो.

(२)मूषकविभाग:- ह्यात उंदीर, घुशी, चिचुंद्रया, पाणउंदीर व जेरोबा हे प्राणी येतात. ह्याचें शेंपूट लांब असतें. हे प्राणी बिळें करण्यांत फार पटाईत असतात. उंदराच्या नखांवर कातडें नसतें व त्यांच्या खालच्या बाजूस खवले असतात.

(३)सायाळविभाग:- ह्यांत सायाळ, गिनिपिग व अमेरिकेंतील पाण्यांतील क्यापिबारा हे प्राणी येतात. सायाळ हे प्राणी निकृतंक गणांतील मोठे प्राणी होत. ह्यांच्या अंगावर सळईसारखे कांटे असतात व त्यांचा त्यांनां पिसारा करतां येतो.

गण ७ वा, कीटभक्षकः- ह्या गणांत पुष्कळ लहान प्राणी येतात. हे आपली उपजीविका किडे, जीवजंतू, आळया वगैरेंवर करतात. ह्याची एकंदर शरीररचना खालच्या दर्जाची आहे. ह्यांचें मुसकट कोनाकोप-यातून व बिळातून खुपसण्याजोगें लांबट व लहान असतें. यांच्या पायांना पांच बोटें असून त्यांनां नखें असतात. हे जमिनीवर वास्तव्य करणारे प्राणी आहेत, पण कांहीं बिळें करून राहतात तर कांहीं झाडांवर राहतात. ह्याच्या अंगावर मऊ केंस असतात परंतु हेजहॉग (शेरो अथवा कांटेरी उंदीर) ह्यांच्या अंगावर काटे असतात. जत्रुअस्थि झालेली असते, करोटी लहान असते व आंतील पोकळीहि लहान असते. मेंदू वलयांकित नसतो व तो लहान असतो. दांत लहान असतात परंतु दाढा बळकट असतात. मुष्क वृषणांत उतरलेले नसतात. स्तनाग्रें पुष्कळ असून उदरावर असतात. ह्यांनां एका वेळेस पुष्कळ पोरें होतात. ह्यांचा विस्तार आस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका ह्या देशांखेरीज सर्वत्र आहे. ह्या गणांतील उदाहरणें म्हटलीं म्हणजे मोल, श्रू, हेजहाँग इत्यादि होत. (१) उडणारी श्रूः-ह्या प्राण्याला छत्रीवजा कातडीचें वेष्टण असतें व यांचीं बोटें जुळलेलीं असतात. (२) झाडावरील श्रूः-ह्या प्राण्यास छत्री नसते. (३) नाचणारी श्रूः-ह्या प्राण्याचे पाय लांब असतात व हा उडया मारीत चालतो. (४) पाण्यांतील श्रूः-ह्यास पोहतां येतें. (५) श्रू उंदीर-हे प्राणी उंदरासारखे दिसतात व ह्यांच्या अंगावर मऊ लव असते. (६) हेजहाँग शेरो-ह्यांच्या अंगावर कांटेरी केंस असतात. हे प्राणी फार भित्रे आहेत. हे आपल्या शरीराचें चेंडूसारखें वेटाळें करून पडून राहतात. हे काठेवाड व गुजराथ या प्रांतांत सांपडतात. (७) मोलः-हे प्राणी बिळें करून रहातात व ह्यांच्या नख्याहि बळकट असतात. (८) रशियांतील डेसमानः-हा प्राणी पाण्याजवळ बिळें करून राहतो. याच्या मागील पायाचीं बोटें जुळलेलीं असतात. व याचें शेपूट मोठें असतें, त्यामुळें यांस पोहतां येतें. याच्या अंगावरचे केंस मऊ व सुंदर असतात. म्हणून याची शिकार करितात. (९) सोनेरी मोल.-या प्राण्याचे केस चमकणारे असतात म्हणून त्यास सोनेरी मोल असें म्हणतात. ही वर दिलेली या गणांतील निरनिराळीं उदाहरणें होत. यांच्या रहाणीचे प्रकार निरनिराळया त-हेचे आहेत. जर आपण वरच्या दर्जाच्या सस्तन प्राण्यांचे अश्मीभूत शेषावयव पाहिले तर असें ध्यानांत येईल कीं त्यांच्या नष्टपूर्वजांची शरीररचना कीटभक्षक प्राण्यांप्रमाणेंच साधारण होती; म्हणून आपणांस असें म्हणतां येईल कीं पूर्ण सस्तनप्राण्यांचें पहिले अवतार हे एक जातीचे कीटभक्षक प्राणी होते व या आद्य कीटभक्षक प्राण्यांपासून निरनिराळया दिशेनें इतर प्राण्यांचीं उत्पत्ति झाली असावी.

गण ८ वा, जतुकागण (वटवाघुळ):- या गणांतील प्राण्यांस ओळखण्याची मोठी खूण म्हणजे यांच्या हाताची पंखाप्रमाणें रचना झालेली असते परंतु हे पंख पक्ष्यांच्या पंखांप्रमाणें पिसांचे बनलेले नसून ते नुसते कातडयाच्या पातळ वेष्टणाचे झालेले असतात. हें कातडयाचें वेष्टण खांद्यापासून सुरू होऊन हाताच्या वरच्या बाजूनें जाऊन आंगठयापर्यंत पोहचतें. नंतर तें प्रत्येक बोटास जोडून कबंधाच्या बाजूनें मागें जाऊन पश्चिम अवयवास व शेंपटास सुद्धां जोडतें. ही कातडी पातळ असते व ती छत्रीप्रमाणें पसरतां येते. सस्तन प्राण्यांत याच गणांतील प्राण्यांस फक्त उडतां येतें. यांचा आंगठा लहान असून तो स्वतंत्र असतो व त्यास आंकडीवजा नखी असते. गुडघे मागें व बाहेरच्या बाजूस वळलेले असतात अशी स्थिति कोणत्याहि प्राण्यांत नसते. कारण त्या योगानें श्रोणिमंडल मोडून जाईल परंतु या प्राण्यांत श्रोणिमंडल पूर्णत्वानें विकास पावलेलें नसतें व भगास्थींचा संधि झालेला नसतो. यांचे डोळे लहान असतात परंतु कान मोठाले असतात. कित्येक प्राण्यांत नाक पानासारखें लांब झालेलें असतें, मेंदु वलयांकित नसतो. स्पर्शेंद्रिय फार तीक्ष्ण असतें व हवेंतील साधारण फेरफारहि यांच्या लक्षांत येतात. स्तनाग्रें दोन असून तीं वक्षांवर असतात. जठर साधें असतें व फक्त रक्त पिणा-या वटवाघुळांत रक्त सांठविण्यास एक पिशवी असते. त्यांनां एका वेळीं एकच पोर होतें. मुष्क वृषणांत उतरलेले नसतात. या प्राण्यांनां उडतां येत असल्यामुळें यांचा विस्तार चोहोंकडे झालेला आहे. दक्षिण व मध्यअमेरिकेंत रक्त पिणारी वाघुळें सांपडतात. त्यांचे मागील दांत अगदीं लहान असतात. परंतु पुढील दांत वस्त-याप्रमाणें तीक्ष्ण धारेचे असतात. उडणारें खोकडवाघुळ हें मादागास्कर व हिंदुस्थानांत आढळतें. हें सर्वांत मोठें वाघूळ होय. हें फलाहारी आहे. लांब कानाचें वाघूळ, कल्लेवालें वाघूळ, नालाकृति वाघूळ वगैरे अनेक प्रकारची वाघुळें सांपडतात. लहान वाघुळांस आपण पाकोळी म्हणतों. हे सर्व प्राणी निशाचर आहेत.
 
गण ९ वा प्रधान गणः- हा सस्तन प्राण्यांतील अगदीं वरचा गण होय. या गणांत लिमूर. वानर व मनुष्य हे प्राणी येतात. या गणांतील प्राणी झाडांवर वास्तव्य करणारे आहेत, म्हणून यांचे अवयव लोंबकळण्याच्या उपयोगी असतात. हे प्राणी हातांच्या व पायांच्या तळव्यावर पूर्णपणें चालतात. यांच्या हातापायांनां पांच बोटें असतात व नखें बहुतेक सपाट असतात. पायाचा आंगठा इतर बोटांपेक्षां आंखूड असतो व मनुष्यप्राण्याखेरीज इतरांनां त्याचा आंकडीसारखा उपयोग होतो. हाताच्या अंगठयाचाहि तसाच उपयोग होतो. डोळे इतर प्राण्यांप्रमाणें करोटीच्या बाजूस नसतात तर पुढच्या भागास त्यांची ठेवण असते. स्तनाग्रें दोन असतात व तीं वक्षावर असतात. यांचे दोन उपगण आहेत ते (१) लिमूरसमूह व (२) कपिमानवसमूह हे होत.

उपगण लिमूरसमूहः- या उपगणांत वानरासारखें दिसणारे प्राणी येतात. हे सर्व निशाचर आहेत व यांच्या हालचाली फार मुकाटयानें होतात व डोळे मोठाले असल्यामुळें यांनां लिमूर म्हणजे भूत किंवा पिशाच्च असें नांव दिलें आहे. यांनां आदिवानर असेंहि म्हणतात. ह्यांतील बहुतेक जाती मादागास्कर बेटांत सांपडतात व बाकीचे हिंदुस्थानांत व मलायाद्वीपकल्प यांत आढळतात. यांच्या अंगावर दाट लोंकर असते व यांचें तोंड कोल्ह्याप्रमाणें असतें; बाकीं हें माकडाप्रामणेंच दिसतात. पूर्वमस्तिष्क किंवा गुरुमस्तिष्क अनुमस्तिष्कास झांकून टाकीत नाहींत. स्तनाग्रांची एक जास्त जोडी वेळेवर उदरावर बनलेली असते. या प्राण्यांतील बहुतेकांचा आवाज मोठा असतो. हे प्राणी फळें, पानें व अंडीं ह्यांवर आपली उपजीविका करतात. ह्या प्राण्यांनां एका वेळीं बहुतकरून एकच पोर होतें. ह्या उपगणांतील लिमूर, पटाईत शेंपटीचे लिमूर, आयआय, इत्यादि प्राणी मादागास्करमध्यें सांपडतात व टारसियस किंवा दीर्घपाद हा प्राणी मलायाद्वीपकल्पांत सांपडतो. स्लोलॉरिस हा बंगलोर (निलगिरी) व सिलोनकडे सांपडतो.

उपगण-कपिमानवसमूहः- या उपगणांत वानर व मनुष्यें मोडतात. ह्यांतील प्राण्यांच्या अंगावर दांट केंस असतात. परंतु मनुष्यप्राण्यांत केंस कमी असतात. छेदक दंत दोहोंपेक्षां जास्त नसतात. कपालविवर मोठें असतें. जत्रुअस्थि चांगली वाढलेली असते. अक्षकास्थि व कूर्परास्थि हे एकमेकांवर फिरते असतात व त्यामुळें यांनां हात पालथा व उलथा करतां येतो. नखें बहुतेक सर्व प्राण्यांत सपाट असतात. गुरुमस्तिष्कार पुष्कळ वलयें असतात व अनुमस्तिष्क गुरुमस्तिष्कानें झांकला जातो. वक्षावर दोनच स्तन असतात. मुष्क वृषणांत असतात. जरायूच्या पृष्ठवळकटया प्रथम पसरलेल्या असतात व त्या नंतर गर्भाच्या एकाच भागी बिंबाकार स्तबक करून राहतात. मूल जन्मतांच वार पडते. एका खेपेस एकच पोर होतें. ह्या उपगणांतील बहुतेक प्राणी एकत्र राहणारे असतात.

ह्या उपगणांत पांच उपकुलें येतातः- (१) मार्मोसेट (अथवा हापेल), (२) सीबिडी, (३) सर्कोपिथीसिडी, (४) सिमैडी व (५) होमिनीडी अथवा मनुष्यकुल.

मार्मोसेट व सीबिडीः- ह्या कुलांतील वानर फक्त  दक्षिण व मध्यअमेरिका या देशांतच सांपडतात. ह्यांची नाकें चपटीं असतात म्हणून ह्यांनां अवनाट अथवा चिपिटनासिक असें नांव देऊन त्यांचा नवजगांतील वानर म्हणून एक विभाग करतात. सर्कोपिथीसिडी व सिमैडीः-ह्या दोन कुलांनां जुन्या जगांतील वानरें असा विभाग करून अचिपिट नासिक असें नांव देतात. ह्या चिपिट नासिक विभागांतील वानरांनां एक पूर्वचर्वणक दांत जास्त असतो व त्यांचें शेंपूट विळखा घेण्यास उपयोगी पडतें. ह्यांच्या तोंडांनां पिशवीसारखे वाढलेले भाग नसतात व नितम्ब भागाच्या कांतडीला चट्टें पडलेले नसतात.

(१) मार्मासेट (हापेल) कुल:- मार्मोसेट वानर हे खारीएवढें लहान असतात. हे ब्राझील व कोलंबिया ह्यांतील अरण्यांत कळप करून राहतात. हे प्राणी आपली उपजीविका फळें व किडे यांवर करतात. यांच्या पायाचा अंगठा लहान असतो व त्यालाच फक्त सपाट नख असतें व बाकीच्या बोटांची नखें वळलेली असतात, शेंपूट लांब व झुपकेदार असतें परंतु ते विळखा घालण्यास उपयोगी पडत नाही. मेंदूवर वलयें फार नसतात. ह्या प्राण्यांनां एका खेपेस तीन पोरें होतात.

(२) सीबिडीकुल:- ह्या कुलांतील वानर अमेरिकेंतील उष्णकटिबंधांत सर्वत्र आढळतात. त्यांतल्यात्यांत ब्राझीलमध्यें फार सांपडतात. ह्यांच्या शेंपटया लांब असतात व त्यांचा विळखा घेण्यास उपयोग होतो. यांच्या बोटांचीं नखें सपाट असतात. जबडयाच्या प्रत्येक बाजूस सहा दाढा असतात. या कुलांतील उदाहरणें: हुप्पेवानर-ह्यांनां मोठमोठयानें हूप हूप असा आवाज करतां येतो. कारण त्यांचे जिव्हाधर अस्थि पसरट रीतीनें बरेंच वाढलेले असतात व त्यांचा ध्वनियंत्राशीं संयोग झालेला असतो व यामुळे त्याचा एक अस्थींचा नगाराच बनतो. साकी ह्या वानराची शेंपटी कांहींमध्यें फार लांब असते व वळणारी नसते. कोळी वानरांची शेंपटी विळखा घालण्याच्या उपयोगी असते व त्यांची बोटें लहान व बारीक असतात.

सीवस वानरांच्या शेंपटया फेंसाळ असतात. वर म्हटल्याप्रमाणें सर्कोपिथीसिडी व सिमैडी ह्या दोन कुलांचा एक विभाग करतात व त्यांस अचिपिट नासिक असें नांव देतात. ह्या प्राण्यांनां पूर्वचर्वणक दांत दोन दोन असतात व चर्वणक दांत तीन असतात. हे प्राणी आफ्रिकेंत व आशियांत जास्त आढळतात.

(३) सर्कोपिथीसिडीकुल:- ह्या प्राण्यांचा उर:फलक लांब असून अरुंद असतो. यांचे हात पायापेक्षां लहान असतात व हे बहुतेक सर्व चारी गात्रांवर टेकून चालतात. नितंबाच्या भागावर कांतडीला घट्टे असतात व त्या घट्टयांवर केंस नसतात व त्यांचा रंग चांगला लाल असतो. गालांत अन्न सांठविण्यास पिशव्या झालेल्या असतात. अंधांत्राला आंत्रलांगूल बनलेलें नसतें. यांतील उदाहरणें:-आफ्रिकेंतील बाबून वानर. ह्याचें मुसकट जरासें लांबट असतें व ह्यांच्या तोंडाचा रंग तांबूस असतो.

मॉकाक्यूस वानर जिब्राल्टरजवळ सांपडतात. काळया तोंडाचे हिंदुस्थानांतील वानर हे पूज्य मानिले जातात व ह्यामुळें त्यांचा विस्तार फार झालेला आहे. बोर्निओमधील काहूर वानरांचें नाक फार लांब वाढलेलें असतें म्हणून ह्यांस सोंडेचे वानर असें म्हणतात. कोलोबस वानर फक्त आफ्रिकेंत सांपडतात.

(४) सिमैडीकुल अथवा नररूपी वानरकुल:- ह्यांची शरीररचना पुष्कळशी माणसाच्या जवळ येते म्हणून त्यांस नररूपी असें म्हणतात. यांनां शेंपूट मुळींच नसतें, यांचे हात पायांपेक्षां लांब असतात. उर:फलक पसरट आणि लहान असतो. यांच्या गालाला पिशव्या नसतात व श्रोणिभागास घट्टे पडलेले नसतात. अधांत्राला आंत्रलांगूल असतें. हे प्राणी साधारणपणें अर्धवट दोन पायांवर चालतात. याचीं उदाहरणें म्हणजे गिबन, गॉरिला, चिम्प्यान्झी व ओ-यांगउटांग हीं होत.

गिबन (हैलोबेट) या जातीचे वानर दक्षिणआशिया व मलायाद्विपकल्प या प्रदेशांत सांपडतात. यांचे हात फार लांब असतात. हे दोन पायांवर सरळ धांवू शकतात. यांच्या नितंबावर थोडेसे घट्टे असतात. हे झाडांवरूनच बहुतेक राहातात व फळांवर, अंडयांवर व किडयांवर आपली उपजीविका करतात. यांचा आवाजहि मोठा असतो. सायामंग हा यांतील मोठा वानर होय. हा सुमात्रा व मलाया प्रदेशांत आढळतो.

ओ-यांगउटांगः- या जातींत एकच जातिविशेष आहे याची उंची चारपूर्णांक एकतृतीयांश फूट असते. हे प्राणी बोर्निओ व सुमात्रा या बेटांतून सांपडतात. यांच्या करोटीला मध्यभागीं शिखरासारखा उंचवटा असतो. यांचे श्वदंत मोठाले असतात. हे बोटांच्या पे-यांवर चालतात. हे झाडांवर फांद्यांचें घरटें करून राहतात. यांच्या मेंदूची वाढ बरीच झालेली असते व तो जवळ जवळ माणसाच्या मेंदूसारखा असतो. हे केवळ वनस्पत्याहारीच आहेत.

गोरिला:- हे वानर विषुववृत्ताचा आफ्रिकेंतील पश्चिमभाग यांत आढळतात. यांची एकच जात आहे. हे सर्व वानरांतील मोठे वानर होत. यांची उंची  फूट असते. हे झाडांवर घरटीं बांधून व कळप करून राहतात. यांचे हात लांब असतात व हे हातांच्या मुठीवर व पायांच्या तळव्यांवर चालतात. नराचे श्वदंत मोठाले असतात. करोटीला डोळयाच्या वरील भागास शिखरें असतात व तसेंच तिच्या मध्यभागीहि उंचवटा असतो. हे प्राणी धिप्पाड असून हिंस्त्र असतात. चिम्प्यान्झी हेहि पश्चिमआफ्रिकेंतच सांपडणारे प्राणी आहेत, तरी यांची वस्ती अॅबिसीनियाच्या बाजूसहि आहे. यांची उंची पांच फुटांपेक्षां जास्त नसते. यांचे हात फार लांब नसतात व ते गुडघ्याच्या खालीं फारसे येत नाहींत. करोटीला मोठाले शिखरवजा उंचवटे नसतात. यांचे श्वदंतहि लहान असतात. यांनां ध्वनिकोश असतात. हे प्राणी झाडांवरच घरटीं बांधून व कळप करून राहातात व फळांवर आपली उपजीविका करतात. टक्कल पडलेला चिम्प्यान्झी म्हणून यांची एक आणखी जात आहे.

(५) मनुष्यकुल:- यांत फक्त मनुष्यप्राणी येतो. मनुष्य आपल्या पायांवर सरळ उभा राहतो. याच्या पायाची रचना याच्या शरीराचें सर्व ओझें वाहण्याजोगी असते. याच्या पायाचा उपयोग पदार्थ धरण्याकडे होत नाहीं. हात पायापेक्षां लहान असतात. हाताचा अंगठा बोटांच्या समोर वळल्यामुळें त्याचा पदार्थ धरण्याकडे पुष्कळ उपयोग होतो. पायाचा तळवा पूर्णपणें टेकतो. याच्या दातांत कोठेहि फट नसते. याच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते व त्याच्या पृष्ठावर पुष्कळ वलयें असतात. याच्या करोटीला शिखरासारखे उंचवटे नसतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धिमत्तेनें प्राणिकोटोचा राजा बनला आहे.

केंसांच्या रचनेवरून व चेहेरेपट्टीप्रमाणें मनुष्यप्राण्याचे निरनिराळे मानववंश करतात व यांतील कांहीं मानववंश एकमेकांपासून स्पष्टपणें ओळखतां येतात तरी हे वंश इतर प्राण्यांच्या जातींप्रमाणें भिन्नभिन्न जाती मात्र नव्हेत. कारण या निरनिराळया वंशांत लग्नें झाली असतां चालतात व अशी लग्नें वंध्य होत नाहींत. अशीं लग्नें झाल्यामुळेंच अनेक मिश्र वंश निर्माण झाले आहेत.

ससा:- सपृष्ठवंशांतील पूर्णवंशाच्या सशीर्ष भेदांतील सस्तन वर्गाच्या अनेक गणांपैकी नकृंतक गणामध्यें ससा मोडतो. सस्तनप्राण्यांतील ससा हा एक उत्कृष्ट प्रतिरूप कल्पून त्याचें शास्त्रीय दृष्टया पुढें विस्तृत वर्णन दिलें आहे.

ससा हा चतुष्पाद प्राणी आहे. त्याच्या सर्व अंगावर मऊ केंस असतात. हें जनावर दिसण्यात फार गोजिरवाणें दिसतें. तें जात्याच फार भित्रें असतें व जलद पळण्यापलीकडे त्याला आत्मरक्षण करण्याचें दुसरें कांहीं साधन नाहीं. तरी तें दिसतें इतकें कांहीं निरुपद्रवी नसतें. ससा हा प्राणी शाकाहारी आहे. ससे बहुतकरून कळप करून असतात व जमिनींत बिळें करून राहातात. एकदां हीं जनावरें बागेंत अगर मळयांत शिरलीं म्हणजे फळांचा व भाजीपाल्यांचा चांगलाच फडशा पाडतात. कुत्र्यांचा आणि ह्यांचा जणूं कांहीं उभा दावाच आहे असें वाटतें. तथापि हीं जनावरें चाणाक्ष, चपळ आणि हुषार असल्यामुळें ती बहुधां कुत्र्यांच्या आणि शिका-यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाऊं शकतात. ससे निरनिराळया रंगांचे आढळतात. जसें– उदी, काळे, पांढरे, पांढरे किंवा काळे ठिपके असलेले इत्यादि. हा प्राणी बहुप्रसव आहे. वर्षांतून तीन चार वेळां त्यांची वीण होते. सस्तनप्राण्याच्या शरीराचे तीन ठोकळ विभाग या प्राण्याच्या शरीरांत दिसून येतात; ते-डोकें किंवा शीर्ष, ग्रीवा किंवा मान व कबंध किंवा बाकी सर्व शरीराचा भाग हे होत. शीर्षाच्या पूर्वभागीं ओठांनां आच्छादिलेलें मुख असतें. त्याचा वरचा ओंठ मधोमध नाकापर्यंत उभा फाटलेला असल्यामुळें वरच्या जबडयाच्या पुढचे दांत दिसतात. मुखाच्या वरती कमानदार अशा दोन भेगा दिसतात त्या नाकपुडया होत. मस्तकाच्या बाजूस दोन मोठे पाणीदार डोळे दिसतात. प्रत्येक डोळयाला तीन पापण्या असतात. एक वरची पापणी, दुसरी खालची पापणी व तिसरी वरच्या पापणीच्या आंतल्या पडद्याप्रमाणें केशरहित असलेली होय. डोळयाच्या वरच्या आणि खालच्या भागावर तसेंच मुसकटावर तुरळक पण लांब व इंद्रियगोचर असे केंस आढळतात.

डोळयाच्या मागील अंगास व मस्तकाच्या शिरोभागीं दोन लांब कान असतात. ते वाटेल त्या दिशेस फिरवितां येतात. शीर्ष आणि कबंध हीं एकमेकांशीं मानेच्या द्वारें जोडली जातात. कबंधाचे दोन विभाग करतातः-पूर्वभाग ऊर होय व पश्चिम भागाला उदर म्हणतात. कबंधाच्या उदरतलावर मादीमध्यें ४ अथवा ५ स्तनांच्या जोडया असतात. कबंधाच्या पश्चिमशेवटीं शेंपूट असतें व तें आंखुड असून मऊ केंसांच्या झुपक्यांनीं आच्छादिलेलें असतें. शेंपटीच्या खालच्या अंगाला गुदद्वार असतें. गुदद्वाराच्या किंचित् पुढच्या बाजूला शिश्न असतें व त्याच्या दोन्ही बाजूंनां दोन वृषण आढळतात. मादीमध्यें गुदाच्या पुढच्या अंगाला स्त्रीजननेंद्रियाचा शेवटचा भाग असतो. ह्या भागांत सशामध्यें कांहीं पिंडग्रंथी आढळतात. व त्यांच्या रसाला एक प्रकारचा विशेष वास येतो. शरीराचें वजन चारी पायांवर पडतें. पुढचे पाय मागच्या पायांपेक्षां बरेच आंखूड असतात. तरी ससा चारी पायांवर चालतो. सशाच्या गात्रांची रचना सरडयाच्या गात्रानुरूप असते पुढच्या गात्राला ५ बोटें असतात व प्रत्येक बोटाच्या शेवटाला नख असतें, मागच्या गात्राला ४ बोटें असतात व त्यांनांहि नखें असतात.

अस्थिपंजर अथवा सांगाडा:- सशाच्या पृष्ठवंशाचे पांच ठोकळ विभाग करतात ते असेः-(१) ग्रीवाकशेरूः - ह्यांत सात कशेरू असतात. (२) वक्षःकशेरूः-यांत बारा किंवा तेरा कशेरू असतात (३) कीटकशेरूः-ह्यांत ७ किंवा ८ कशेरू असतात. (४)त्रिकास्थीः-हा विभाग कांहीं त्रिकशेरू जुळून झालेला असतो. व (५) पुच्छकशेरू. पृष्ठवंशाचा पहिला कशेरू म्हणजे पहिला ग्रीवाकशेरू, हा वर्तुळाकार असून त्याला कशेरूघन मुळींच नसतो. त्याच्या कमानीवर पुढच्या बाजूला दोन सखल संधिभाग असतात. त्यामध्यें  करोटीच्या पश्चिम कपालास्थीचीं संध्यर्बुदें नेमकीं असतात. दुस-या कशेरूच्या कमानीवर पूर्वभागी एक खुंटीवजा टोक असतें, तें पहिल्या कशेरूच्या कमानीच्या पश्चिमभागांत घट्ट बरोबर असते. ह्या कशेरूचा कंटक फार दबलेला असतो व तो बरोबर दिसत नाहीं. कशेरूबाहू देखील आंखूडच असून रंध्रयुक्त असतो व त्यामधून कशेरूधमनी आरपार निघून जाते. वक्षःकशेरूपैकीं एखाद्याचें परीक्षण केलें असतां असें आढळून येईल कीं त्याचा कशेरूकंटक लांबट व खालीं लवलेला असून पश्चिमाभिमुखी असतो. कशेरूबाहू आंखूड परंतु जाड असतात व प्रत्येकाच्या अंतिमशेवटीं लहानसा संधिभाग असतो व त्याच्याशीं पर्शुकाचा फांटा जोडला जातो. तसेंच दोन कशेरू ज्या ठिकाणीं एकमेकांशीं कशेरूघनानें जोडले जातात त्या ठिकाणीं कशेरूघनावर पूर्व व पश्चिमशेवटीं दोन सखल संधिभाग दिसतात, त्यांच्याशीं पर्शुकाचें शीर्ष जोडलेलें असतें. त्रिक्‍कशेरू एकमेकांशीं संलग्न होऊन त्या सर्वांचें हाड बनतें त्याला त्रिकास्थि असें म्हणतात. सशाला एकंदर बारा पर्शुका अथवा फांसळया किंवा बरगडया असतात. त्यापैकीं पहिल्या सात पर्शुका उरःफलकाला मिळतात म्हणून त्यांनां ख-या पर्शुका हें नांव देतात. बाकीच्या पांच पर्शुका उरःफलकाला पोहोचूं शकत नाहींत, म्हणून त्यांनां खोटया पर्शुका असें म्हणतात. सशाचें उरःफलक हें सहा अस्थींच्या तुकडयांचें बनलेलें असून पहिला तुकडा सर्वांत मोठा असतो.

सशाची करोटी लांबट असते व विशेषतः मुसकटाचा भाग फार लांबट असतो. डोळयाचे खळगे किंवा अक्षिकोश हे एकमेकांनां अगदीं भिडून असतात व त्यांच्यामध्यें एक पातळ अस्थीचा पडदा असतो. करोटीचे अस्थी हे एकमेकांशीं कधींच एकजीव होत नाहींत व ज्या ठिकाणीं दोन किंवा अधिक अस्थी एकमेकांशीं संलग्न होतात त्या ठिकाणीं त्यांच्या सीमंत-रेघा किंवा रेषा स्पष्ट दिसतात. त्या सरळ किंवा वांकडया किंवा नागमोडी अशा असतात. सशाचा खालचा जबडा किंवा हनु करोटीशीं प्रत्यक्ष रीतीनें संयोग पावतो म्हणजे खालच्या जबडयाच्या अस्थि व करोटी यांच्या दरम्यान दुसरी एखादी अस्थि बनून तिच्या द्वारें संधि घडून येत नाहीं. करोटीच्या पश्चिमशेवटीं कपालमहाविवर आहे ह्याच्या दोन्ही बाजूंवर एक एक पार्श्व किंवा बाह्य पश्चिम कपालास्थि असून त्या प्रत्येकावर एक एक संध्यर्बुर्द आहे. कपालमहाविवरांतून सृषुम्णा बाहेर पडते. याच्या उर्ध्वभागीं ऊर्ध्व पश्चिमकपालास्थि असते. या चारी अस्थी मिळून पश्चिमकपालास्थि झालेली असते. करोटीच्या पृष्ठभागीं पश्चिम कपालास्थीच्या पुढच्या अंगास पार्श्वकपालास्थि जोडीनें असतात; आणि त्यांच्या पुढील अंगास पुरःकपालास्थींची जोडी असते. पुरःकपालास्थीच्या पुढें नासास्थीची जोडी असते व ती वरच्या जबडयाच्या मुखास्थि व पूर्वमुखास्थीनां लागलेली असते. करोटीच्या उदरतलीं पश्चिमशेवटीं अधःपश्चिमकपालास्थि असते व त्याच्या पुढें अधःकीलाकारास्थि अथवा भूमिकीलाकारास्थी असून त्याच्या पुढील अंगास पुरःकीलाकारास्थि असते. करोटीच्या मस्तिष्ककोशाच्या उदरतलाचा भाग येणेंप्रमाणें: साधारणतः पुरः (पूर्व) कांलारास्थि, अधः(भूमि) कीलाकारास्थि व अधः (भूमि) पश्चिमकपालास्थि यांचा बनलेला आहे. पुरः (पूर्व) कीलाकारास्थि व अधःकीलाकारास्थि ह्यांच्यापासून दोहों बाजूंस ऊर्ध्वगामी अशा दोन पसरट अस्थी पार्श्वभागीं बनून त्यांच्यामुळें साधारणतः या मस्तिष्ककोशाच्या दोन बाजू बनतात. या मस्तिष्ककोशाची पूर्व बाजू एका छिद्रयुक्त पसरट अस्थीची बनलेली असते, तिला नासागतविरलास्थि म्हणतात. करोटीच्या पश्चिम शेवटाला साधारण कर्णप्रदेशावर पार्श्वकपालस्थीच्या खालीं प्रत्येक बाजूस एक पसरट अस्थि असते, तीस स्क्वमोझल हें नाव आहे. ह्याच्यापासून पूर्व दिशेस जाणारा एक फांटा बनलेला असतो. या फांटयाच्या आरंभाला त्याच्या उदरतलीं एक संधिभाग झालेला असतो, त्याच्याशीं खालचा जबडा जोडला जातो. मस्तिष्ककोशाच्या पुढचा भाग घ्राणेंद्रियांचा झालेला असून प्रत्येक घ्राणेंद्रियाच्या पृष्ठाव एक एक नासास्थि असते. दोन्हीं घ्राणेंद्रियांच्या जिवरांमध्यें एक उभा अस्थीचा पडदा असतो. नासास्थींच्या पुढें जोडीनें असणा-या व मोठया वाढलेल्या पूर्वमुखास्थी होत. बहुतेक मुसकटाचा पूर्व शेवट ह्यांच्याचमुळें बनलेला असतो. वरच्या जबडयाला लागलेल्या दांतांपैकीं यांच्यावर छेदकदंत लागलेले असतात. वरच्या जबडयाला पूर्वमुखास्थीच्या पाठीमागें मुखास्थीची जोडी असते व त्या प्रत्येकीला पूर्वचर्वणक व चर्वणक दांत लागलेले असतात. ह्या मुखास्थींपासून अंतर्भागीं आडवे पसरट अस्थींचे भाग वाढलेले असतात. त्यामुळें मुखांतील टाळूचा कठिण भाग बनतो. प्रत्येक मुखास्थीच्या बाह्यांगापासून एक बळकट फांटा प्रथम बहिर्दिशेत वाढून नंतर पश्चिम दिशेस गति घेऊन जातो व स्क्वेमोझेल अस्थीच्या फाटयांस मिळतो. एकंदरींत करोटींत तीन विवरें दिसून येतात तीं मस्तिष्ककोशविवराच्या पुढच्या शेंवटीं असलेलीं, डावें व उजवें मिळून दोन घ्राणेंद्रियांचीं व मस्तिष्ककोशविवरें अशीं होत. करोटीची एकंदर ठेवण मस्तिष्काच्या वाढीवर अवलंबून असते. खालचा जबडा किंवा हनु प्रत्येक बाजूस एक अशा दोन हाडांचा झालेला असतो ह्याला हन्वस्थि म्हणतात. प्रत्येक हन्वास्थे पूर्वशेवटी एकमेकांशीं संयुक्त झालेली असते व प्रत्येकीचा पूर्व भाग आडवा दंतयुक्त असतो व पश्चिम शेवटाचा भाग ऊर्ध्वगामी बनलेला असून त्याच्या टोंकाला एक संध्यर्बुद झालेलें असतें. तें स्क्वेमोझलच्या फांटयाच्या संधिगतेंशीं संयोग पावतें.

शाखागत अस्थिपंजरापैकीं अंसमंडळाला अस्थींची संख्या कमी असते. अंसफलक रुंद, पातळ तिकोनी असून त्याच्या बाह्यपृष्ठावर एक स्पष्ट दिसणारी रेषेसारखी सुरकुती असते व तिच्या शेवटीं टोंकाला अंसकूट बनलेलें असतें. अंसफलकाच्या अरुंद खालच्या टोंकाला एक बाह्यगोल अंसर्गत बनलेले असतें, त्यांत प्रगंडास्थीचें शीर्ष बरोबर रीतीनें संयोग पावतें.

पूर्वगात्रांतील आदिम हाड म्हणजे प्रगंडास्थि होय. याच्या खालच्या टोंकाला अक्षक व कूर्परास्थि लागलेले असतात. हे एकमेकांनां घट्ट चिकटून बनलेले असतात तरी ते एकजीव असे झालेले नसतात. मणिबंधाला लहान लहान अशीं निरनिराळया आकाराच्या नऊ कूर्चशिरोस्थी बनलेल्या असतात. या कूर्चशिरोस्थीनंतर हाताला पाच करभास्थी बनलेल्या असतात व त्यांच्यापुढें अंगुलीय अस्थी असतात. अंगुलीय अस्थींच्या अंतिम टोंकाला नखें असतात. सशाचें श्रोणिमंडल प्रत्येक बाजूवर तीन हाडाचें बनलेलें असून तें त्रिकास्थीशीं घट्ट रीतीनें संयोग पावलेलें नाहीं हीं तीन हाडें म्हटली म्हणजे कटिकपाल, ककुंदरास्थि व भगास्थि होत. कटिकापाल व ककुंदरास्थि ह्याचे भाग मिळून उर्वस्थिसंधिविवर बहुताशीं झालेलें असतें. भगास्थि त्या उर्वस्थि संधिविरांत मिळालेली नसते. परंतु तिच्याऐवजीं त्याच्या दरम्यान एक जास्त अस्थि झालेली असते. दोन्ही भगास्थींचा संधि झालेला असतो. भगास्थि व ककुंदरास्थि यांच्या दरम्यान एक मोठें छिद्र बनलेलें असतें त्याला ऑबचुरेटर छिद्र असें म्हणतात.

पश्चिमगात्रांतील आदिम हाड म्हणजे उर्वास्थि होय. ह्याचें शीर्ष उर्वस्थिसंधिविवरांत बसलेलें असतें. याच्या अंतिम टोंकाला जंर्घास्थी व बहिर्जंघास्थी लागलेले असतात. बहिर्जंघास्थि ही अगदीं बारीक असून ती अंतिमशेवटीं जंघास्थीशीं जुळून गेलेली असते. घोटयाला सहा निरनिराळया आकाराचीं हाडें दोन ओळांनीं बनलेलीं आहेत. त्यापैकीं आदिमओळांतील दोन हाडें पार्ष्णी आणि पादकूर्चशीर्ष हीं जंघास्थीच्या अंतिम टोंकाला जुळलेली असतात. यांच्यानंतर तळपायाला (पायाच्या तळाला) चार पादकरभास्थी बनलेले असून ते पादांगुलीच अस्थींमध्यें शेवट पावतात.

सशाच्या शरीरगुहेंत व पक्षी वगैरे खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या शरीरगुहेंत जो फरक आहे तो हा कीं, सशाची शरीरगुहा एका आडव्या पडद्यानें विभागली गेली आहे. ह्या पडद्याला 'डायाफ्राम' म्हणतात. शरीरगुहेच्या वरच्या विभागाला उरोगुहा व खालच्या विभागाला उदरगुहा असें म्हणतात. उरोगुहेंत हृदय व त्याच्याशीं जुळलेल्या मोठया धमन्या व शिरा, तसेंच फुप्फुसें आणि महाश्वासनलिका व अन्ननलिकेचा पश्चिमभाग हीं आढळतात. खालच्या उदरगुहेंत आमाशय, आंत्र, यकृत, पक्वपिंड, प्लीहा, वृक्क तसेंच वृक्कस्त्रोतसें, मूत्राशय आणि जननेंद्रियें हीं आढळतात.

पचनेंद्रियव्यूहः- सशाची पचनेंद्रियनलिका फार लांब असते. तिचा उगम मुखकोडापासून होतो. मुखाच्या दोन्ही जबडयांनां दांत लागलेले असतात. त्यांनां अनुक्रमें ऊर्ध्वदंत व अधोदंत असें म्हणतात. सामान्यतः दातांचे चार प्रकार गणले आहेत ते असें:-छेदकदंत, श्वदंत, पूर्वचर्वणक व पश्चिम चर्वणक वरच्या जबडयांतील ऊर्ध्वदंत तपासले असतां असें आढळून येईल कीं, अगदीं समोरच्या बाजूला मधोमध दिसणारे चार छेदकदंत एकापाठीमागें एक असे जोडीनें लागलेले असतात. पहिली पूर्व जोडी लांब व वाकलेल्या दातांची झालेली असून त्या प्रत्येकीवर एक उभी खाचणी दिसते. पाठीमागील जोडीने दांत लहान असतात. सशाला श्वदंत मुळींच नसतात. त्यामुळें छेदकदंत व पूर्वचर्वणकदंत ह्याच्यामध्यें बरीच रिकामी जागा राहाते. पूर्वचर्वणक तीन असतात. त्याच्या पाठीमागें पश्चिमर्वणकहि तीन असतात. खालच्या जबडयांतील अधोदंत पाहिले असतां समोरच्या भागांत दोन छेदकदंत आहेत. श्वदंत मुळीच नाहींत. पूर्णचर्वणक दोनच असतात व पश्चिमर्वणक तीन असतात. जनावराचे दात एकंदरींत कोष्टकरूपानें मांडण्याची रीति आहे. त्याप्रमाणें सशाच्या दांताचें कोष्टक पुढें दिलें आहेः - छें.   , श्व. , पू. च   प. च   †   म्हणजे वरच्या जबडयांतील मध्याच्या प्रत्येक बाजूला उर्ध्वदंत ८ होत, तसेंच खालच्या जबडयांतील अधोदंत सहा होत; तेव्हां एकंदर दांत १६ + १२ = २८ आहेत. मुखक्रोडांत चार लालापिंडांची स्त्रोतसें उघडतात. त्यांतून लाळ बाहेर पडून अन्नाशीं मिसळते व तीमुळें अन्नपचन होतें. मुखक्रोडाच्या तलावर एक जिव्हा आढळते. व त्यांत मागच्या बाजूस घ्राणेंदियांची आतलीं किंवा पश्चिम नासांद्वारें उघडतात. मुखक्रोडाच्या पश्चिमशेवट गलविवरांत अंतर्भूत होऊन त्यापासून पुढें अन्ननलिका होते. गलविवराच्या या पश्चिम शेवटीं उदरतलावर अन्ननलिका सुरू होण्यापूर्वी कंठमणिद्वार अथवा ध्वनिद्वार असलेलें दिसतें. व तें ध्वनिमंजुषा व तीपासून पुढें झालेली महाश्वासनलिका यांत उघडतें. ह्या ध्वनिद्वाराच्या वरच्या अंगाला एक पानाच्या आकाराचें कलाच्छादित तरुणास्थीचें झांकण झालेलें असतें. त्याला ध्वनिद्वारावरण म्हणतात. तें ध्वनिद्वारावरण घट्ट बसलें म्हणजे मुखक्रोडांतून गलविवराच्या द्वारें अन्ननलिकेंत जाणारें अन्न नीट अन्ननलिकेंत जातें. जेव्हां हें आवरण ध्वनिद्वारावर पडलेलें नसतें, तेव्हां महाश्वासनलिकेचा मुखक्रोडाच्या द्वारें बाहेरील वातावरणाशीं खुला संबंध झालेला असतो व श्वसनक्रिया मोकळया रीतीनें चालू असते. अन्ननलिका अरुंद, लांबलचक पण विस्तार पावेल अशी असून पश्चिम दिशेस गति घेत मानेच्या भागांतून व उरोभागांतून डायाफ्राम स्नायूला वेध पाडून पार निघते व आमाशयामध्यें उघडते. आमाशय एखाद्या रुंद पिशवीप्रमाणें अथवा पखालीप्रमाणें असून त्याचें अन्ननलिकेच्या बाजूचें टोंक रुंद असतें परंतु पुढचें टोंक अरुंद होऊन त्यापासून तन्वांत्र सुरू होतें. तन्वांत्र बारीक नलिकेप्रमाणें असून फार लांब असतें व त्याचीं पुष्कळ वेटोळीं झालेलीं असतात तन्वांत्राच्या सुरवातीच्या भागाला पक्वाशय म्हणतात. तन्वांत्राच्या पुढचा पचनेंद्रियनलिकेचा भाग रुंद नलिकेप्रमाणें असून त्याला बृहदांत्र म्हणतात. याच्या शेवटच्या भागाला ॠज्वांत्र म्हणतात. तन्वांत्र व बृहदांत्र यांच्या संयोगाच्या भागापासून एक स्वतंत्र अंधनलिका बनलेली असते तिला अंधांत्र म्हणतात. तिचा पृष्ठभाग पुष्कळ ठिकाणीं आकुंचन पावलेला दिसतो व तिच्या अंतिमशेवटीं एक मांसल अंगुलीसारखा भाग असतो त्याला आंत्रलांगूल म्हणतात. उदरगुहेच्या पृष्ठभागाला सर्व आंत्राचा भाग आंत्रकलेच्या योगानें लागलेला आहे.

यकृत उदरगृहेमध्यें उदरगृहाकलेच्या योगानें डायाफ्राम स्नायूला लागलेलें असतेंो त्याचे पाच विभाग झालेलें असून त्याच्या पश्चिम पृष्ठावर पित्ताशयाची पिशवी बनलेली असते. यकृताच्या भागांतून निघालेले सर्व स्त्रोतस तसेच पित्ताशयापासून निघालेले स्त्रोतस एकवटून त्याचे एक पित्तस्त्रोतस बनतें व तें पक्वाशयाच्या आदिमशेवटीं पक्वाशयांत उघडतें. पक्वपिंड अनेक ग्रंथिरूपी पसरून झालेले पिंड असून तें पक्वाशयाला लागलेल्या आंत्रकलेवर चिकटलेलें असतें. त्यापासून निघालेलें पित्तस्त्रोतस पक्वाशयांत त्याच्या अंतिमभागीं उघडतें.

रुधिराभिसरणसमूहः- सशाचें हृदय उरोगुहेंत मध्याच्या थोडेसें डावीकडे स्थापित झालेलें असतें. त्याच्या दोन्हीं बाजूंवर फुफ्फुसकलाच्छादित दोन फुफ्फुसें असतात. ह्या दोन फुफ्फुसांमध्यें जी थोडी मधोमध जागा राहते तिच्या मध्यभागीं हृदयाची ठेवण झालेली असून त्याला हृत्‍कलेचें वेष्टण झालेलें असतें. हें वेष्टण दुहेरी असून त्याचा बाहेरचा पडदा उरोगुहेच्या पृष्ठाला लागलेला असतो व मधला पडदा हृदयाला चिकटून गेलेला असतो. ह्या दोन पडद्यांत जी अरुंद पोकळी बनलेली असते तिला हृत्‍कलाविवर म्हणतात व तिच्यांत लसीकाद्रव सांठतो. हृदयाला पूर्वभागीं दोन संचयकर्ण व पश्चिमभागीं दोन निःसारकर्ण झालेले असतात. उजव्या बाजूला उजवा संचयकर्ण असून तो उजव्या निःसारकर्णांत उघडतो, तसेंच डाव्या बाजूला डावा संचयकर्ण असून तो डाव्या निःसारकर्णांत उघडतो. हृदयाची डावी बाजु व उजवी बाजू ह्यांचा एकमेकांशीं स्वतंत्र संबंध नाहीं. डावी बाजू विशेष मांसल असते. संचयकर्ण व निःसारकर्ण ह्यांच्या संयोगद्वारीं पडदे झालेले असून ते निःसारकर्णांतच उघडतात. उजव्या बाजूचा पडदा तीन दलांचा असतो व डाव्या बाजूकडील पडदा दोन दलांचा झालेला असतो.

उजव्या संचयकर्णांत तीन मोठया शिरा उघडतातः- त्या एक उजवी ऊर्ध्वमहाशिरा, दुसरी डावी ऊर्ध्वमहाशिरा व तिसरी अधोमहाशिरा ह्या होत. डाव्या संचयकर्णांत उजव्या व डाव्या फुफ्फुसशिरा एकत्र होऊन उघडतात. उजव्या निःसारकर्णापासून फुफ्फुसधमनी निघते. हिच्या उगमस्थानीं तीन अर्धचंद्राकृति पडदे आहेत व ते तिच्यामध्यें उघडतात. हिचे दोन फांटे फुटून ते उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाकडे जातात. डाव्या निःसारकर्णांतून महाधमनी निघते. तिच्याहि उगमस्थानीं तिच्यामध्यें उघडणारे असे तीन अर्धचंद्राकृति पडदे आहेत. महाधमनीच्या उगमस्थानाजवळूनच दोन लहान हृद्धमन्या निघतात. त्या हृदयाच्या स्नायूला रक्त पुरवितात. महाधमनीचा उगम डाव्या निःसारकर्णांच्या तळाशीं होऊन ती नंतर वरच्या बाजूस येते व डाव्या श्वासनलिकेवरून कमान घेऊन खालीं पश्चिमदिशेस गति घेते. ह्या कमानीला महाधमनीकमान म्हणतात. नंतर ऊर आणि उदर ह्यांतून ही सरळ पश्चिमशेवटीं (फाटे फोडीत) पृष्ठमहाधमनी अशी पृष्टवंशाला लागून गेलेली आढळते. महाधमनीच्या कमानींतून दोन फांटे फुटतात ते एकः अनामिका व दुसरी डावी जत्रुधमनी हे होत. अनामिकेपासून उजवी जत्रुधमनी, उजवी ग्रीवाधमनी व डावी ग्रीवाधमनी अशा निघतात. उजवी जत्रुधमनी उजव्या पूर्वगात्रांत गेल्यावर तिला बाहुधमनी असें म्हणतात. उजवी ग्रीवाधमनी दुभागून जाते व त्या दोन फांटयास अंतर्ग्रीवाधमनी व बाह्यग्रीवाधमनी असें संबोधितात. डाव्या ग्रीवाधमनीचा आणि डाव्या जत्रुधमनीचा प्रसार व त्यांचे फांटे फुटणें हें जवळ जवळ उजव्या ग्रीवाधमनी व उजव्या जत्रुधमनीप्रमाणेंच आहे. उरोभागांतून खालीं जात असतांना महाधमनी पुष्कळ लहान लहान जोड फांटे फोडते. ते पर्शुकांच्या मध्यंतरांत रक्त नेतात. उदरांत आल्यावर पहिली मुख्य शाखा म्हटली म्हणजे जठरधमनी होय. पुढें आंत्रधमन्या, वृक्कधमन्या इत्यादि शाखा फोडून ती कबधाच्या शेवटीं दुभागली जाते. या प्रत्येक फांटयास उभयोरूगामीधमनी हें नांव आहे व ती पश्चिमगात्रांत जाऊन तेथें शुद्ध रक्त पुरविते. सर्व धमन्या केशवाहिन्यांत शेवट पावतात व पुढें केशवाहिन्यांपासून शिरा उगम पावतात. वर सांगितल्याप्रमाणें उजवी ऊर्ध्व महाशिरा, डावी ऊर्ध्वमहाशिरा व अधोमहाशिरा ह्या सर्व शरीरभर अभिसरण पावलेलें व त्यामुळें अशुद्ध झालेलें रक्त उजव्या संचयकर्णांत नेतात. उजवी किंवा डावी ऊर्ध्वमहाशिरा बहुतकरून त्या बाजूवरील ग्रीवाशिरा व जत्रुशिरा व कांहीं किरकोळ शिरा यांच्या संयोगानें झालेली असते.,

अधोमहाशिरेचा उगम कबंधाच्या पश्चिमशेवटीं पश्चिमगात्रांच्या जोडींतून येणा-या ऊरूशिरांच्या संयोगानें होतो व पुढें तिला निरनिराळया भागांतील सर्व शिरा येऊन मिळतात, जसें जननेंद्रियांतील शिरा, वृक्कशिरा व यकृतशिरा इत्यादि. उदरांतील पचनेंद्रियनलिकेंतून निघालेल्या सर्व शिरा एकवटतात व त्यांची एक मुख्य यकृतोन्मुखी शिरा बनते. ही शिरा यकृतामध्यें शेवट पावते.

रुधिर हें रंगरहित रुधिरद्रव व रुधिरपेशी ह्यांचें बनलेलें आहे. रुधिरपेशी दोन प्रकारच्या आहेत. त्या श्वेतरुधिरपेशी व रक्तरुधिरपेशी अशा होत. रक्तरुधिरपेशी या वर्तुलाकार, दोन्हीं बाजूंनीं बाह्यगोल व चैतन्यकेंद्ररहित अशा असतात. उजव्या संचयकर्णांतून रक्त उजव्या निःसारकर्णांत येतें. व नंतर फुफ्फुसधमनीवाटे फुफ्फुसांत जातें. फुफ्फुसांत तें शुद्ध होऊन फुफ्फुसशिरांच्या वाटे डाव्या संचयकर्णांत येतें व त्यांतून लगेच डाव्या निःसारकर्णांत जातें. डाव्या निःसारकर्णांतून तें रुधिरधमनीवाटे निघून तिच्या शाखांतून सर्व शरीरभर अभिसरण पावतें. हृदयांत व मुख्य रुधिरवाहिन्यांच्या उगमस्थानीं पडद्यांची योजना झाली असल्याकारणानें रुधिर परत उलटया वाटेनें जाऊं शकत नाहीं.

श्वासोच्छ्‍वासेंद्रियें:- ध्वनिमंजूषा अथवा कंठमणी ही एक पेटीवजा पांच तरुणास्थींच्या आवरणानें बनलेली पोकळी आहे. ध्वनिमंजूषा ध्वनिद्वारानें गलविवरांत उघडते. हिच्यापासून पश्चिमभागीं महाश्वासनलिकेचा आरंभ होतो. व महाश्वासनलिका उरोगुहेंत प्रवेश केल्यावर दुभागलीं जाते. तिच्या प्रत्येक शाखेला श्वासनलिका म्हणतात व ही प्रत्येक श्वासनलिका प्रत्येक फुफ्फुसांत त्याच्या तळाशीं जाऊन पोहोंचते. फुफ्फुसांच्या आंत शिरून ती अनंत शाखा फोडते. ह्या शाखा लहान लहान होत जाऊन शेवटीं त्यांचें शेवट म्हणजे वायु वाहिन्या एका पातळशा कलेच्या अगदीं लहान लहान वायुकोशांत शेवट पावतात. तेव्हां फुफ्फुस म्हणजे केवळ ह्या अनंत वायुवाहिन्या, त्यांच्या शेवटीं असलेले वायुकोश व श्वासनलिकेच्या लहान लहान शाखा यांचा गुंतागुंतीनें झालेला एक जमाव होय. फुफ्फुसाचा आकार निमुळता असून त्यांचे शिखर पूर्वदिशेस झालेलें असतें व त्याच्या तळाचा भाग अंतर्गोल असून जेव्हां फुफ्फुस हवेनें पूर्ण विस्तृत झालेलें असतें तेव्हां तो डायाफ्रान स्नायूच्या बाह्यगोल पूर्वपृष्ठावर बरोबर वसलेला असतो. फुफ्फुसाच्या सभोंवती फुफ्फुस कलेचें वेष्टण असतें. हें दुहेरी असल्याकरणानें त्या कलेचा बाह्यपदर उरोगुहेच्या पृष्ठाला लागलेला असून दुसरा अंतरपदर परिवर्तन पावून फुफ्फुसाच्या पृष्ठावर लागलेला असतो. या दोन पदरांत जी थोडीशी पोकळी बनते तिला फुफ्फुसकलागुहा म्हणतात.

ज्ञानेंद्रियव्यूहः- मस्तिष्ककोशांत असलेला मस्तिष्क अथवा मेंदू व पृष्ठवंशांत स्थापित झालेली सुषुम्णा हीं मध्यवर्ती ज्ञानेंद्रियें होत. मस्तिष्काचे नेहमींचे भाग म्हटले म्हणजे पूर्वमस्तिष्क, मध्यमस्तिष्क, अनुमस्तिष्क व सुषुम्णाशीर्ष हे आहेत. पूर्वमस्तिष्क हें घ्राणमस्तिष्क व गुरुनस्तिष्क मिळून झालेलें असतें. सशाच्या मेंदूमध्यें विशेष कांहीं फरक खालच्या दर्जाच्या वर्गांतील प्राण्यांच्या मेंदूपेक्षां दिसून येतात ते पुढें दिले आहेतः -

सशाच्या गुरुमस्तिष्काचीं दोन शकलें पूर्वपश्चिम दिशेनें तुलनात्मक रीत्या लांब परंतु अरुंद असतात व त्यांच्या पृष्ठभागावर थोडयाशा वळया बनलेल्या असतात. तेव्हां पृष्ठभाग सपाट व गुळगुळीत नसतो. प्रत्येक गुरुमस्तिष्कशकलाच्या पार्श्वभागीं एक खांचणी असते तिला सिलव्हियन खांचणी म्हणतात. तिच्या योगानें गुरुमस्तिष्कलाचा एक भाग निराळा झाल्यासारखा दिसतो. त्याला शंखखंड म्हणतात. गुरुमस्तिकशकलांच्या पूर्वशेवटीं घ्राणखंड झालेले असतात, त्यांचा आकार मुद्रुलासारखा असतो. गुरुमस्तिष्काचीं दोन्हीं शकलें थोडीशीं वरच्या अंगाला एका आडव्या पडद्यानें जोडलीं जातात त्या पडद्याच्या भागाला पूर्वमस्तिष्कसंधि असें म्हणतात. हा संधिभाग पक्षीवगैरे खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या मेंदूंत नसतो. प्रत्येक गुरुमस्तिष्क शकलामध्यें एक विवर असतें. त्याला पार्श्वमस्तिष्कविवर असें म्हणतात. पूर्वमस्तिष्क संधिभाग हा या विवरांच्या उर्ध्वभागीं असतो. प्रत्येक पार्श्वमस्तिष्कविवरामध्यें एका रंध्रानें उघडतें या रंध्राला 'मनरोचें' रंध्र असें म्हणतात. या तृतीय मस्तिष्कविवराचा पृष्ठभाग मस्तिष्क अंतःकलेच्या पातळ पडद्याचा बनलेला असून त्यावर सूक्ष्म रक्तवाहिन्यांचें जाळें पसरलेलें असतें. याच्या दोहोंकडेला दोन घन भाग असतात. त्यांस ऑप्‍टिक थ्मालोमै म्हणतात. परिपूर्तितावस्थेंतून विकास पावत असलेल्या मेंदूच्या पूर्वमस्तिष्कशेषखंडाचा राहिलेला भाग हे दर्शवितात. ह्या विवराच्या पृष्ठाच्या पश्चिम भागापासून तृतीयमस्तिष्कनेत्रछायेचे (अथवा शेषाचे) देंठ निघतात. तसेंच ह्याच्या उदरतलाच्या भागापासून मध्याला एक दाडयाप्रमाणें भाग वाढलेला असतो व त्या दांडयाच्या शेवटाला मस्तिष्कमुखक्रोडसंधिशेषाचा भाग लागलेला असतो. मस्तिष्काच्या उदरतलावर ह्या दांडयाच्या पूर्वभागीं एक आडवा ज्ञानरज्जूंचा पट्टा झालेला असतो त्यांतून आलोचक रज्जू निघतात.

मध्यमस्तिष्काचा पृष्ठभाग पाहिला असतां असें आढळून येईल कीं दोन्ही चक्षुमस्तिष्क एका आडव्या रेषेनें विभागले जाऊन त्यांचीं चार खंडें झालेलीं असतात. तेव्हां सशामध्यें चक्षुमस्तिष्काच्या २ जोडया झालेल्या असतात. पश्चिममस्तिष्कापैकीं अनुमस्तिष्क फार मोठें बनलेलें आहे व त्याचे तीन भाग असतात: एक मध्यम भाग; त्याला व्हर्मिस म्हणतात व दोन त्याच्या बाजूचे भाग; ह्या बाजूच्या प्रत्येक भागास एक एक विशेष वर आलेला कोप-याचा भाग असतो त्याला लॉक्युलस म्हणतात. अनुमस्तिष्काच्या उदरतलभागीं हे तिन्ही भाग एका ज्ञानरज्जूच्या आडव्या पट्टयानें जोडलेले दिसतात. ह्या जोडणा-या पट्टयाला पश्चिम मस्तिष्कसंधि म्हणतात. अनुमस्तिष्काच्या मागचा भाग म्हटला म्हणजे सुषुम्णाशीर्ष हा होय. सुषुम्णाशीर्षाचा पश्चिम शेवट निमुळता होत जाऊन त्याच्यापासून सुषुम्णा आरंभ पावते. ही पाठीच्या कण्याच्या वलयांत स्थापित झालेली असते.

सशाच्या मस्तिष्कापासून पक्ष्यांप्रमाणें बारा मस्तिष्करज्जूंच्या जोडया निघतात त्यांचीं नांवें पुढीलप्रमाणें.-(१)घ्राणरज्जू, (२)आलोचकरज्जू, (३)नेत्रचेष्टारज्जू, (४)नेत्रोर्ध्वस्नायुमीरज्जू, (५)त्रिमुखरज्जू, (६)षष्ठरज्जू, (७)मुखरज्जू, (८)कर्णरज्जू, (९)जिव्हागलरज्जू, (१०)दशमरज्जू, (११)साहाय्यकपृष्ठवंशीयरज्जू, (१२)अधिजिव्हाचालकरज्जू.

इतर पूर्णवंशीय प्राण्यांमध्यें सशालाहि सहकारी ज्ञानेंद्रियव्यूह किंवा ज्ञानकंदसमूह असतो. हा समूह ज्ञानकंदांचे गुच्छ जोडीनें बनून झालेला असतो व ते गुच्छ रांगेनें लागलेले असून एकमेकांशीं ज्ञानरज्जूंनीं संयोजित झालेले असतात. त्यांच्यापासून इंद्रियज्ञानरज्जू निघून त्या निरनिराळया अवयवांकडे गेलेल्या असतात.

वृक्कजननेंद्रियव्यूहः- सशाला दोन वृक्क असतात. प्रत्येक वृक्क चपटलेला, अंडाकार असून त्याच्या आंतल्या धारेला एक कात्रा असतो. ते उदरगुहेच्या पृष्ठाला चिकटून बनलेले असतात व उजवा वृक्क डाव्या वृक्कापेक्षां किंचित वरच्या अंगाला झालेला असतो. प्रत्येक वृक्कापासून एक एक वृक्कस्त्रोतस निघतें व तें मूत्राशयांत उघडतें. मूत्राशयाची पिशवी फार लवचीक अथवा स्थितिस्थापक अशा कातडीची झालेली असते.

पुजननेंद्रिय:- नरामध्यें दोन मुष्क असतात व ते पक्वदशेंत शरीराच्या बाहेरील बाजूस वृषणांमध्यें उतरलेले असतात. अगदीं बाळपणीं हे मुष्क उदरगुहेंतच असतात. वृषणकोश व उदरगुहा ह्यांचा संयोग एका छिद्राद्वारें झालेला असतो. शुक्रस्त्रोतस हे बस्तिस्त्रोतसाला येऊन मिळतात व बस्तिस्त्रोतस मुत्राशयाच्या मुखापासून निघालेला असतो. शुक्र बीजें हीं अति सूक्ष्म असून पेशींचीं रूपांतरें होऊन झालेलीं असतात. प्रत्येक शुक्रबीजाचे दोन भाग असलेले दिसतात: एक शीर्षाचा अंडाकृति भाग चैतन्यकेंद्राचाच बहुतेक झालेला असून त्याला जोडलेला दुसरा केंसासारखा भाग होय. हा केंसाचा भाग चैतन्यद्रव्याचा बनलेला असून त्याच्या चलनानें शुक्रबीजाची हालचाल होत असते.

स्त्रीजननेंद्रिय:- मादीमध्यें दोन अंडाकार अंडकोश झालेले असतात. हे अंडकोश वृक्काच्या खालच्या अंगाला उदरगुहेच्या पृष्ठाला चिकटलेले असतात. प्रत्येक अंडकोशाला एक अंडस्त्रोतस लागलेलें असतें. तें आरंभींच्या भागीं चिंचोळें व किंचित नागमोडी असें असतें. तरी अंडीकोशाखालीं तें एका रुंद गळणीच्या मुखाप्रमाणें रुंद झालरयुक्त मुखानें उदरगुहेंत उघडतें. प्रत्येक अंडस्त्रोतसाचें पश्चिमशेवट एका गर्भाशयांत अंतर्भूत होतें व हे दोन्ही गर्भाशय एकाच मध्यवर्ति योनीमध्यें उघडतात. (लेखक प्रो. हाटे व प्रो. टी. जी. येवलकर)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .