विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सहदेव- पुरुकुलोत्पन्न पंडुराजा याला माद्रीपासून झालेल्या दोन पुत्रांतील दुसरा. याचा वडील भाऊ नकुल. सहदेवाची ख्याति खड्गयुद्धांत विशेष असे. यास द्रौपदीशिवाय केकयदेशीय राजाची कन्या विजया नावाची स्त्री होती. द्रौपदीला श्रुतकर्मा आणि विजयेला सुहोत्र असे मिळून त्याला दोन पुत्र होते. युधिष्ठिरानें राजसूय यज्ञ केला, त्यांत हा दक्षिण दिशेला जाऊन मोठा दिग्विजय करून आला. इतर पांडवांबरोबर हाहि १२ वर्षें वनांत होता. पुढें हा तंतिपाल नांव धारण करून विराटाच्या अश्वशालेवर राहिला; कारण अश्वचिकित्सा इत्यादि शास्त्रांत हा चांगला निपुण होता. याच्या रथाचे अश्व तित्तिर पक्ष्याच्या रंगाचे असत, व ध्वजावर हंसाचें चिन्ह असे. युद्धकाळीं वाजविण्याचा जो याचा शंख असे, तो मणिपुष्पक नांवानें प्रसिद्ध होता.