विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सहवासी ब्राह्मण- यांनां कोणी सवाशे ब्राह्मण म्हणतात. यांची एकंदर लोकसंख्या सुमारें १००० च्या आंत आहे. मुख्य वस्तीचीं ठिकाणें कोल्हापूर संस्थान, मिरज, क-हाड (जि. सातारा), हुबळी, हावेरी (जि. धारवाड), म्हैसूर संस्थान, व अदोनी (मद्रास इलाखा); व इतर ठिकाणींहि उद्योगधंद्यासंबंधानें थोडी थोडी पसरलेली आहे. यांचें व देशस्थ ब्राह्मणांचें पूर्ण सादृश्य असून देशस्थांबरोबर अन्नोदक व्यवहार चालतो; परंतु वैष्णव मठभेदामुळें उडपी, राघवेंद्र व व्यासरायमठ या मठांच्या लोकांशीं निरांतक होतो; इतर लोक कित्येक ठिकाणीं कुरकुरतात. या ब्राह्मणांत पोटजाती नाहींत. यांचे स्वतःचेहि भिक्षुक आहेत. सर्व जातिविषयक प्रश्न श्रीमध्वाचार्यांच्या मठांपैकीं श्रीराघवेंद्रस्वामी हे सोडविता (म्हैसूर प्रांतांतील कांहीं सहवासी ब्राह्मण शृंगेरी मठांत असल्यानें तेथील श्री त्यांचे प्रश्न सोडवितात). सहवासी ब्राह्मणवर्ग षट्कर्माधिकारी, पंचद्राविडांतर्गत देशस्थ ब्राह्मणांत अंतर्भूत आहे असें या समाजाचें म्हणणें आहे. हें म्हणणें मान्य असल्याबद्दल जुन्या नव्या पंडितांचे अभिप्राय आहेत ('सहवासी ब्राह्मणप्रशंसा' पहा). यासंबंधी निवाडे शके १६८१ व त्यानंतर कांही वेळां झालेले आहेत. व त्या सर्व निवाडयांतून 'सहवासी' ब्राह्मण हे शुद्ध देशस्थ ब्राह्मण असून त्यांच्या पंक्तिव्यवहार्यत्वाबद्दल कोणी आक्षेप घेऊं नये अशा अर्थाचे निकाल आहेत.
आ ड नां वें.- शिरालकर, सापकर, कोल्हापुरे, जांभळे, सरडे, धोपाडे, वाघमारे, अथणीकर, शिखरे, कातगडे, करनाटकी, कोटबागे, भुरे, लोखंडे, महाजन, बिंदुरकर, चिपडे, इंकर, नखाते, कानडे, गुत्तल, चवटी, हिरेमणी, देवगडे, अष्टपुत्रे वगैरे.
गो त्रें.- उपमन्यु, भारद्वाज, कौशिक, वशिष्ठ, गौतम, वृषगण, श्रावत्स, भार्गव, शार्ङ, लोकाक्ष इत्यादि.
कुलदैवतें, पोषाख व दागिने हीं देशस्थ वैष्णवांप्रमाणेंच आहेत. या समाजांतवैदिक अगर भिक्षुक, इनामदार, सावकार, सराफ, वकील, शिक्षक वगैरे धंद्यांचे लोक आहेत. एकंदर समाज बहुतांशीं साक्षर आहे. (रा. जी. पी. जांबळे, चिटणीस सहवासी ब्राह्मणशाखा, पुणें.)