विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सह्याद्रि पर्वत (किंवा पश्चिम घाट).- दक्षिण हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यानें मुंबईइलाखा, म्हैसूर, कुर्ग व मद्रास इलाखा यांतून थेट केपकामोग्निपर्यंत हा पर्वत गेला आहे. याची सुरवात खानदेश जिल्ह्यांतील कुंडईबारी घाटापासून होते. ४००० फुटांपेक्षां याची उंची क्वचितच जास्त असेल. हा व समुद्र यांच्यामध्यें २० पासून ६५ मैलापर्यंत रुंदीची पट्टी आहे. त्रिंबकपर्यंत म्हणजे आरंभीचें १०० मैल याचा कल पश्चिमेकडे आहे. तेथून ४० मैलपर्यंत तो पुन्हां पूर्वेकडे किंचित वळतो. भाळसेजपासून खंडाळा-वाघजईपर्यंत ६० मैल तो पुन्हां पश्चिमेकडे वळतो व तेथून पुन्हां किंचित् पूर्वाभिमुख होऊन गिरसप्पाजवळून म्हैसूर संस्थानांत शिरतो. याच्या तीन चार आडव्या शाखा बऱ्याच लांबवर पूर्वदिशेनें गेल्या आहेत. या भागांत मुख्य पर्वत व त्याच्या शाखा यांच्यावर मिळून १०० च्या वर किल्ले आहेत. व ते बहुतेक इतिहास प्रसिद्ध आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे कुंडईवारी, घाट, त्र्यंबकेश्वर, थलघाट, पिंपाघाट, हरिश्चंद्रगड, शिवनेरी किल्ला, चाकण, सिंहगड, पुरंदर, रायगड, महाबळेश्वर, कुंभारलीघाट, आंबेघाट (यानें कोल्हापूरावरून रत्नागिरीला सडक जाते), पन्हाळा, विशाळगड, कॅसलरॉक, गिरसप्पाचा धबधबा वगैरे घाट, किल्ले व ठिकाणें ध्यानांत ठेवण्याजोगीं व महत्त्वाचीं आहेत.
मुंबई इलाख्यांमधून पुढें सरळ म्हैसूरच्या बाजूनें जाऊन कुर्गमधून ही रांग थेट मद्रास इलाख्यांत शिरते. गोवर्धन गिरीपासून देवकोंडापर्यंत समुद्रापासून अंतर फक्त १० मैल उरतें व पुढें हे अंतर वाढत ४५ मैलपर्यंत वाढतें व याहि भागांत ब-याच शाखा पूर्वेकडे पसरतात.
गिरसप्पा, कोलूर, होशनगडी, बुंद वगैरे मार्गांनीं थेट किना-याकडे जाणारे रस्ते करण्यांत आलेले आहेत. मद्रास इलाख्यांत शिरल्यावर पश्चिमघाट तसाच पूर्वेकडे झुकत जातो, व ५० पासून १०० मैलपर्यंत किनारा दूर राहतो. कुर्ग ओलांडल्यावर याला पूर्वघांट मिळतो. या दोहोंच्या सांधीवर नीलगिरीचें मैदान आहे. नीलगिरीचें पठार व मलबार कोइंबतूरकडे गेलेला पश्चिमघांट याच्यामध्यें १६ मैलांचें एक खिंडार आहे. याला पालघाट म्हणतात. याची उंचीहि २००० फुटाहून जास्त नाहीं. यातून मद्रास रेल्वे गेली असून पूर्वपश्चिम किनारे जोडले गेले आहेत. पश्चिम किना-याकडे जाण्यास एवढीच सोपी जागा होती. मलबारमध्यें याची उंची ३००० पासून जवळ जवळ ९००० फुटांपर्यंत आहे. अनई (मुख्य शिखर ८८३७ फूट) हें या पर्वतांतलें व दक्षिण हिंदुस्थानांतलें सर्वांत उंच शिखर होय. हा पर्वत नेहमीं हिरव्या जंगलानें आच्छादित असतो. यांत वाघ, हत्ती व सर्व प्रकारचीं हिंस्त्र जनावरें आहेत.
या पर्वताच्या मद्रास इलाख्यांतील भागावर चहा, काफी, सिंकोना (क्विनाईन), वेलदोडे वगैरेंच्या ब-याच लागवडी आहेत. बाबू, साग वगैरे इमारतीलांकूडहि पुष्कळ आहे. व याच्या जंगलाच्छादित भागांतून कित्येक पूर्ववाहिनी नद्या निघून मधल्या शुष्क मैदानांनां ओलावा देतात. कावेरी व ताम्रपणीं या मुख्य नद्या आहेत. पेरियार नदीचा उपयोग कालव्याकडे केला आहे.
किना-याकडील पट्टी आंतील मुलुखाशीं जोडली नसल्यानें तिकडचे लोक सर्वतः निराळेच आहेत. त्यांच्या रीतीभाती व शरीराची ठेवण वगैरे सुध्दा भिन्न आहेत. मध्यें डोंगरावर रानटी लोक आहेत. आतां निरनिराळे मार्ग झाले आहेत. मद्रास रेल्वे पालघाटानें गेली आहे व दळणवळण वाढत आहे. चमर्डी घाट, सम्पाजी घाट कनोनोर व तेलीचरीचे रस्ते वगैरे मुख्य मार्ग आहेत.