विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
साकारिन (कोळशाची साखर)- साकारिन या पदार्थाचा प्रथम शोध अमेरिकेंत बाल्टीमोअर येथें डॉ. रेमसेन व फालबर्ग ह्या गृहस्थांनीं इ. स. १८७९ मध्यें लाविला. प्रथम त्याची गोडी साखरेपेक्षां फक्त ३०० पट अधिक होती व त्याच्या अंगची गोडी बरीशी नव्हती, खाल्ल्यावर मागून तोंड कडवटच होत असे. परंतु हळू हळू त्यांत सुधारणा होतां होतां आतां बहुतेक दोषरहित साकारिन तयार होऊन त्याची गोडीहि साखरेपेक्षां पांचशेंपट अधिक आहे. हा पदार्थ आतां चोहोंकडे तयार करणारे पुष्कळ कारखाने निघाल्यामुळें याची किंमत आतां एक अंसास आठ आण्यांपासून एक रुपया पडते. साकारिनच्या अंगीं इतकी जबरदस्त गोडी असून तो हवेंत अगदीं उघडा वर्षानुवर्ष ठेवला तरी त्याच्या अंगची गोडी यत्किंचितहि कमी होत नाहीं, किंवा त्यास मुंग्या अथवा माशाहि लागत नाहींत. कोळशापासून जे कांहीं अनेक रंगाचे व औषधी पदार्थ तयार करतात त्यांमध्यें साकारिनसारखा अत्यंत शुभ्र व शुद्ध पदार्थ दुसरा नाहींच म्हटलां तरी चालेल. मधुमेहासारख्या रोगांमध्यें जेव्हां साखरेचा उपयोग करण्यास आडकाठी येते तेव्हां गोडीसाठीं साकारिनचा उपयोग करतात. तथपि, व्यापारीरित्या, त्याचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे, खनिज औषधी गुणयुक्त पाण्याच्या किंवा लेमोनेडसारख्या पेयांच्या बाटल्या भरतांना गोडीसाठीं त्यांत साकारिन मिसळतात.