विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सागैंग, जिल्हा- उत्तर ब्रह्मदेशांतील सागैंग विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ १८६२ चौरस मैल. ह्या जिल्ह्यांत लांब लांब जलमार्ग पुष्कळ आहेत. इरावती, भू या मुख्य नद्या आहेत. या जिल्ह्यांत एमेट सरोवर आहे. तें पावसाळयांत ९० मैलांचा घेर व्यापितें. परंतु उन्हाळयांत शुष्क असतें. उत्तर ब्रह्मदेशांतील शहरांपैकीं सागैंग हें एक सुंदर, निरोगी व थंड ठिकाण आहे. उन्हाळयांत येथील उष्णमान १०२० वर जात नाहीं. पावसाचें मान ३० इंच असतें.
इतिहासः- ब्रिटिशांनीं काबीज करीपर्यंत या जिल्ह्याचा इतिहास महत्त्वाचा नाहीं. थिबा राजा १८८५ सालीं इंग्रजांच्या स्वाधीन झाल्यानंतर दोन वर्षेपर्यंत या जिल्ह्यांत जिकडे तिकडे बंडाळी माजली होती. आव्हा व सागैंग हे जिल्हे १८८८ सालीं एक केले. सागैंग जिल्ह्यांत सर्वत्र सुंदर व पुष्कळ देवळें असून त्यांपैकीं मिनगन देऊळ सर्वांत प्रसिद्ध आहे. या देवळाजवळच जगांतील सर्वांत मोठी मिनगन घंटा आहे. ही घंटा १२ फूट उंच असून हिचें वजन ९० टन आहे. याच्या खालोखाल महत्त्वाचें असें सिनपुशिन देऊळ आहे. परंतु सर्वांत पूज्य असें जें देऊळ याझामनीसुला हें सागैंगपासून ५ मैलांवर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ सालीं ३२६९०३ होती. येथें मंडालें, भिंग्यन व दक्षिण चिंद्विन या जिल्ह्यांतून पुष्कळ ब्रह्मी लोक आले. १९०१ सालीं शेंकडा ५८ लोक शेतकीवर आपली उपजीविका करीत असत. या देशांत अनेक जातींच्या जमिनी असून पिकेंहि पुष्कळ प्रकारची होतात. नैॠत्येकडील जमिनींत तांदूळ पिकतो. साधारण प्रतीच्या जमीनींत तीळ, ज्वारी व कापूस पिकतो. गहूं हें ह्या देशांतील मुख्य पीक होय. सागैंग, मेनमू व तडाऊ ह्या शहरांत पुष्कळ तलाव असून त्यांचा उपयोग पाटाच्या पाण्याकडे करतात. चीन किंवा संयाम येथून रेशीम आणून तें या जिल्ह्यांत विणण्यांत येतें. जिल्ह्यांतून बाहेरगावीं पिंजलेला कापूस, तीळ, तिळाचें तेल, गहूं, चणे कडधान्यें, तंबाखू , कांदे, मका, बटाटे वगैरे जिनसा जातात. सागैंग मितक्यिन रेल्वे या जिल्ह्याच्या पूर्वसरहद्दीवरून उत्तरेकडे जाते. १९०१ सालीं साक्षरतेचें प्रमाण शेंकडा २४ होतें. जिल्ह्यांत बिनसरकारी शाळा पुष्कळ आहेत.सागैंग तहशिलीचें क्षेत्रफळ ४७४ चौरस मैल. लो. सं. सुमारे ८००००. हींत एक शहर व ८८ गांवें आहेत. सागैंग शहर इरावतीच्या उजव्या किना-यावर आहे. नदीच्या दक्षिणेस सिव्हिल स्टेशन व शहराच्या आग्नेय दिशेस रेल्वेस्टेशन आहे. याची लोकसंख्या १००००. येथें मुसुलमान, हिंदु व मणीपुरी लोकांची वस्ती आहे. हें व्यापाराचें ठिकाण आहे सागैंग हें अथिनखया नांवाच्या राजाच्या वेळीं (१३१५) राजधानीचें ठिकाण होतें. १८८८ म्युनिसिपालिटी स्थापन झाली.