विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
साचिन- मुंबई, सुरत पोलिटिकल एजन्सींतील संस्थान. ब्रिटिश सुरत जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ह्याचा वितार आहे. संस्थानचें क्षेत्रफळ ४९ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) त १९९७७. कापूस व सुताचें कापड येथें तयार होतें. ह्या संस्थानांत दोन फौजदारी काटें असून एक तुरुंग आहे. १९०३-४ सालीं येथील उत्पन्न २ दोन लक्ष रुपयांवर झालें व खर्च दीड लक्ष रु. झाला. साचिनचे नबाब हबशां वंशांतील आहेत. अहमदनगर आणि विजापूर येथील राजाजवळ हे आरमारच्या नोकरींत होते. हीच नोकरी त्यांनीं मोंगलांच्या वेळींहि केली. मोंगलांच्या -हासानंतर हे जंजि-यास राहूं लागले. यानीं मराठे व इंग्रज ह्यांच्याशीं अनेक उलाढाली केल्या; मेजर हिज हायनेस नबाब सिद्दी इब्राहिम महंमद याकुतखान हे आज साचिनच्या गादीवर आहेत. यांनां ११ तोफांची सलामी मिळते.