विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सोनपूर— बिहार ओरिसा, शरण जिल्हा. गंडकी नदीच्या उजव्या तीरावरील एक गांव. येथें आगगाडीचे कारखाने आहेत. येथें गंगा आणि गंडकी यांच्या संगमाजवळ आश्विन महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशीं मोठी जत्रा भरते. तिला हरिहर मेळा असें म्हणतात. याच ठिकाणीं विष्णूनें गजेंद्राला नक्राच्या जबड्यांतून सोडविलें आणि याच ठिकाणीं रामचंद्रानें सीतास्वयंवराकरितां जनकपुराला जात असतां हरिहरनाथ महादेवाचें देऊळ बांधलें असें म्हणतात. येथील जत्रेंत हत्ती, घोडे आणि इतर गुरेंढोरें विकण्याकरितां आणतात. सर्व हिंदुस्थानांत हत्ती विकण्याचें मोठें ठिकाण हेंच आहे.