प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण १ लें.
भारतीय संस्कृतीचें आद्यवाङ्मय.

भारतीय जनता व संस्कृति - आपणांला आज भारतीय जनतेमध्यें चार निरनिराळे सांस्कृतिक थर दिसतात. त्यांतील सर्वांत प्राचीन थर द्राविडांचा होय. पण सांस्कृतिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचा थर आर्यन् लोकांचा होय. यांचा प्रसार सर्व हिंदुस्थानभर असून दक्षिणेमध्यें त्यांच्या संस्कृतींत द्राविड मिश्रण झालें आहे. आज द्राविड संस्कृति ही आर्यन् संस्कृतीची उपसंस्कृति होय. आज ‘द्राविड’ लोक आपणांस सांस्कृतिक पृथक्त्वाचे लोक म्हणून आढळत नसून त्यांचें स्वतंत्र अस्तित्व केवळ भाषाभिन्नत्वानें व्यक्त होतें. यानंतरचा महत्त्वाचा थर म्हटला म्हणजे मुसुलमानी जनतेचा होय. मुसुलमानामध्यें परकीय रक्त बेताचेंच असावें. त्यांचें अस्तित्व सांस्कृतिक रूपानेंच देशांत आहे. यांचा प्रसार उत्तर हिंदुस्थानांत विशेषतः पंजाब, व बंगाल प्रांतांत आढळतो. यानंतर कालानुक्रमानें ख्रिस्ती अथवा यूरोपीयन लोक हिंदुस्थानांत आले. संख्येच्या दृष्टीनें जरी त्यांस विशेष महत्त्व नसलें तरी सांस्कृतिक दृष्टया या लोकांचें महत्त्व विशेष आहे. हिंदुस्थानाचा एकंदर बाह्य जगाशीं संबंध यांच्याचमुळें उत्पन्न झाला आहे. तथापि ख्रिस्त्यांपैकीं थोडे पूर्वी आलेले जे सीरियन ख्रिस्ती त्यांचें आज मुळींच महत्त्व नाहीं म्हटलें तरी चालेल. या खेरीज आज आपणांस भारतीय जनतेमध्यें यहुदी या स्वतंत्र वंशाचें कांही लोक आढळतात. यांच्यामध्येंहि तीन निरनिराळे वर्ग आहेत. एक कोचीनमधील बर्‍याच प्राचीन काळीं आलेल्या यहुद्यांचा; यांच्यांतहि काळे व गोरे अथवा पूर्वकालीन व उत्तरकालीन असे भेद आहेत. दुसरा कोंकणी अथवा बेने इस्त्रायल यांचा; व तिसरा अर्वाचीन कालीं आलेल्या बगदादी नवागतांचा. यांचेंहि, एकंदर भरतखंडाचा विचार करूं गेलें असतां सांस्कृतिक अगर संख्येच्या दृष्टीनें फारसें महत्त्व नाहीं. त्याप्रमाणेंच आपणांस मुंबईच्या आसपास थोडीशी पारशी या मूलतः भिन्न संस्कृतीच्या लोकांची संख्या आढळते. हे लोक हिंदुस्थानांत जरी स्थायिक होऊन राहिले आहेत, तरी त्यांनीं येथील संस्कृतीवर म्हणण्यासारखा कांहींच परिणाम घडवून आणिला नाहीं व आज जें त्यांस थोडेसें महत्त्व आहे तें त्यांच्या व्यापारी साहसामुळें आणि बर्‍याच अंशी भारतीय बनून त्यानीं जीं भारतीय सेवा केली तीमुळें होय.

वरील निरनिराळ्या संस्कृतींचा हिंदुस्थानांतील संस्कृतीवर निरनिराळ्या बाबतींत परिणाम झालेला आहे. आर्यन संस्कृतीचें कार्य आपणांस वाङ्मय, कला, धर्म, शासनशास्त्र, कायदा, वैद्यक, ज्योतिष इ. शास्त्रें यांच्या परिणतींत झालेलें दिसून येतें. व त्याचा इतिहास साकल्याने इतरत्र दिलेलाच आहे. मुसुलमानी संस्कृतीचें कार्य आपणांस विशेषतः वाङ्मय, कला, शासनशास्त्र, कायदा, व धर्म या बाबतींत दिसून येतें. यूरोपीय अगर पाश्चात्त्य संस्कृतीचें कार्यहि अनेकांगी असून ती आज जगाची मुख्य संस्कृति झाली आहे.

आतां आपण थोडक्यांत प्रत्येक संस्कृतीच्या कार्याचा व फलाचा हिशोब घेऊं, व तो घेतांना अर्थात् स्वाभाविकपणें हिंदु संस्कृतीकडे प्रथम लक्ष देऊं. व या संस्कृतीच्या विकासाचा आढावा घेतांना वाङ्मयाकडे अगोदर लक्ष देऊं. भारतीय ग्रंथांत आद्यस्थान वैदिक वाङ्मयास आहे. वेदांचें सविस्तर विवेचन करण्यासाठीं प्रस्तावनाखंडांत एक हजारावर पृष्ठें खर्ची पडलीं आहेत, तर येथें केवळ परिचायक अल्प विवेचन करून पुढील वाङ्मयौघाकडे वळतां येईल. याचें धार्मिक वाङ्मय ‘’श्रुतिस्मृति-पुराणें’’ हे होय. श्रुतींच्या अभ्यासामुळें भारतीय शास्त्रीय वाङ्मयाच्या बर्‍याच शाखांस प्रारंभ झाला. पूर्वमीमांसेखेरीज इतर दर्शने उपनिषदांच्या आभ्यासानें निर्माण झाली. इतिहास पुराणांचें संरक्षण यज्ञसंस्थेमुळें झालें आणि या सर्व प्रयत्नांमुळें जो शास्त्रीय पद्धतीचा विकास झाला त्यानें वैद्यक, शिल्प, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांस शास्त्रीयत्व आणून दिलें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .