प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण २ रें.
भरतखंड वर्णन.

भरतखंडाचें वर्णन अनेक प्रकारें द्यावयास पाहिजे. ते प्रकार असेः- (१) ऐतिहासिक, (२) सांस्कृतिक, (३) नैसर्गिक, (४) ब्रिटिश शासनसत्तात्मक उर्फ सांप्रतचें, (५) भावी उर्फ राष्ट्रीय शासनसत्तात्मक.

ऐतिहासिक - हिंदुस्थान हें पृथ्वीवरील चीन, असुरिया, बाबिलोनिया, पॅलेस्टाईन, ईजिप्त, वगैरे पांचसहा अत्यंत प्राचीन राष्ट्रांपैकी एक आहे. त्याचा ऐतिहासिक काळ अद्याप निश्चित झाला नाहीं, कारण प्राचीन शहरें, इमारती, इतर वस्तू, खोदलेख वगैरेंचें संशोधन काहीं झालें असलें तरी अद्याप बरेंच व्हावयास पाहिजे हिंदुस्थानच्या नैसर्गिक मर्यादा प्राचीन व अर्वाचीन सारख्याच आहेत. पण प्राचीन काळातले जे वाड.मय आज उपलब्ध आहे त्याच्या कर्त्यांना हिंदुस्थानची भौगोलिक माहिती कितपत होती हें पहावयाचें आहे. ख्रिस्तपूर्व निदान चार हजारवर्षापासून अलीकडल्या निरनिराळ्या काळांतील मर्यादा समजण्यास वाङ्मयात्मक पुरावा बराच आहे. या पुराव्यावरून हिंदुस्थानाचें प्राचीन भूवर्णन पुढील कालांत विभागलें आहे. वेदकाल, महाभारतकाल, शिकंदरकाल, अशोककाल, कनिष्ककाल, गुप्तकाल, हूणकाल, हर्षकाल, चालकाल, चव्हाणकाल, यादवकाल, विद्यारण्यकाल.

वेदकाल- वेदकालापूर्वीहि हिंदुस्थानांत आर्य व द्रविड या कांहीशा सुसंस्कृत लोकांची वस्ती होती. पण वेदकालापूर्वीचें सदरहू लोकांचे वाङ्मय आज उपलब्ध नाहीं. रामायणांत वर्णन केलेलें रामरावणयुध्द कदाचित वेदकालापूर्वीचें असेल व स्वतः रामानें अयोध्येपासून सीलोनपर्यंत सर्व हिंदुस्थानचा प्रवास केला असेल. तथापि ही वीरकथा कितीहि प्राचीन असली तरी आजच्या उपलब्ध रामायणग्रंथातलें वर्णन हें वेदपूर्वकालीन भरतखंडाचें वर्णन म्हणून मान्य करतां येणार नाहीं. कारण महाभारताप्रमाणें रामायण हा ग्रंथ निरनिराळीं संस्करणें होऊन वेदग्रंथांनंतर बराच उत्तरकालीं पूर्ण तयार झालेला आहे. वेदग्रंथांचे-विशेषतः ॠग्वेद-संहितेचें- तसें नाहीं. त्यांतील बुतेक सूक्तें दाशराज्ञ युद्धानंतर लवकरच तयार झालेली मूळ स्वरूपांतच आज उपलब्ध आहेत व ही गोष्ट सूक्तांच्या भाषेवरूनहि ग्राह्य करण्यासारखी आहे.

वेदकालीन हिंदुस्थानचे भौगोलिक, ज्ञान देणारें स्वतंत्र वर्णन वेदग्रंथांत अर्थातच नाहीं, पण वर्णनानुधोरानें देश, गांवें, नद्या, पर्वत यांचे उल्लेख जे सांपडतात त्यांची यादी पुढें दिली आहे.

देशांचीं नांवे ॠग्वेदांत १४, अथर्ववेदांत १५ व संहितेतर वैदिक वाङ्मयांत २१ (विभाग ३, पान २०७ पहा) आणि जातीकुलवंश उर्फ राष्ट्रनामें सुमारें २०० (वि. ३, पा. ३६३) आलीं आहेत, पण त्या सगळ्यांचा मेळ भारतकालीन किंवा प्रचलित देशनामांशीं लावतां येत नाहीं. गंधारि किंवा गंधार किंवा गांधार हें देशमान ॠग्वेदापासून रूढ असून हाच हल्लींचा वायव्य सरहद्दप्रांत होय. सिंधु हें नांवहि ॠग्वेदादि सर्व प्राचीन ग्रंथांत आहे. पंचनद हें संहितेतर वैदिक वाङ्मयांत येतें. सिंधु व पंचनद मिळून हल्लीचें पंजाब व सिंध हे प्रांत दर्शविले जातात. याच मोठ्या प्रदेशाला नीच्य असें वैदिक नांव असून त्यांत बाल्हिक, दस्यु, तुर्वश, अनु, भरत, यदु, केकय, वगैरे वंश उर्फ राष्ट्रें राहत होतीं. त्याच्याच जरा दक्षिणेला सरस्वतीवत् नांवाचा ॠग्वेदोल्लिखित देश असून सरस्वती नदी या प्रेदशांतून वाहात असल्यामुळें यास हें नांव पडलेलें दिसतें. मरु देशनाम संहितेतर वाङ्मयांत आहे व हाच हल्लींचा राजपुताना व मारवाड मिळून होणारा वालुकामय प्रदेश होय. पंचनद देशाच्या पूर्वेकडे कुरुक्षेत्र व कोसल हे देश म्हणजे हल्लींचा दिल्लीप्रांत व संयुक्तप्रांत हे होत. हल्लींच्या संयुक्त प्रांतांतील गंगा-यमुना या नद्यांमधील व त्यांच्या दक्षिणेकडील मोठ्या प्रदेशाला मध्यदेश नांव असून या देशाच्याच कांहीं भागांत मद्र नांवाचे राष्ट्र होतें. कोसल देशाच्या पलीकडे पूर्वेस विदेह म्हणजे हल्लीचें भूतानसंस्थान, मगध म्हणजे हल्लींचा बिहार व ओरिसा व त्याच्या पलीकडे वंग म्हणजे हल्लींचा बंगाल याप्रमाणें देश होते. कीकट हें देशमान ॠग्वेदांत आहे व मगध देशाच्याच कांहीं भागाला हें नांव होतें. दक्षिणेकडील देशांचीं फक्त दोनच नांवें वैदिक वाङ्मयांत आढळतात, तीं दक्षिणापथ व विदर्भ हीं होत. दक्षिणापथ यानें सर्व दक्षिण हिंदुस्थानचा निर्देश होत असे. ‘दक्षिणापदा’ असा शब्द ॠग्वेदांत आहे व त्याचा अर्थ हद्दपार केलेला मनुष्य (परावृज्) जिकडे हांकलून दिला जातो तो देश असा असावा. विदर्भ म्हणजे हल्लींचा वर्‍हाड देश होय. ऐतरेय ब्राह्मणांत राज्याभिषेकप्रकरणांत जें आर्यावर्ताचें वर्णन आहे (८. १४) व तैत्तिरीय ब्राह्मणांत जी देवांची यज्ञभूमि म्हणून वर्णन केली आहे (१.८) यावरून वेदकालीन आर्यास फक्त विंध्योत्तर भरतखंड परिचित असून दक्षिणदेश त्यांस आपल्या संस्कृतीच्या बाहेरचा वाटत असे एवढेंच नव्हे तर कीकट देशांतील लोकांस इंद्राची पूजा न करणारे व नीच असे मानलें आहे व व्रात्याचीं फक्त वस्त्रेंमगधास देत यावरून बहारओरिसा हा भागहि तत्कालीन वैदिक संस्कृतीच्या बाहेरचा समजला जात असावा.

महाभारतकाल- पुराणांतून वर्तमान वराहकल्पाच्या आरंभी नारायणानें ब्रह्मरूप धारण करून सृष्टिरचना पूर्वकल्पाप्रमाणें केली, असे उल्लेख आढळतात. त्यांत पृथ्वीचे द्वीपसंज्ञक सात भाग केले-

भुवि भागं ततः कृत्वा सप्तद्वीपान् यथा तथा।
भूराद्यांश्चतुरो लोकान् पूर्ववत् सकल्पयत्॥
(विष्णुपुराण, अंश १ अध्याय ४, श्लोक ४९)
या द्वीपांचीं नांवें वगैरेहि सांगितलीं असतांत.
जंबुप्लक्षाह्वयौ द्वीपो शाल्मलिश्चापरो द्विज।
कुशः क्रौंचस्थथा शाकः पुष्करश्चैव सप्तमः॥४॥
एते द्वीपा: समुद्रेस्तु सप्त सप्तभिरावृत्त:।
लवणेक्षु सुरासर्पिर्दधिदुग्धजलैःसमं॥५॥
(विष्णु. अंश २, अ. २)

जंबु, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक व पुष्कर हे सात द्वीप होत. ह्या प्रत्येकास एकेका समुद्राचें आवरण आहे. असे लवण, इक्षुरस, सुरा, सर्पि (तूप), दधि, दुग्ध व जल यांचे सात समुद्र आहेत.

जंबु- द्वीपाच्या मध्यभागीं मेरूपर्वत आहे व भोंवती क्षारसमुद्र आहे. हिमवत्, हेमकूट, निषध, नीलश्वेत, शृंगवान, माल्यवान आणि गंधमादन हे दुसरे पर्वत आहेत. त्यांच्या योगानें जंबूद्वीपाचे नऊ विभाग झाले आहेत. त्या प्रत्येकास वर्ष म्हणतात. त्यांचीं नावें- भारतवर्ष, किंपुरुषवर्ष, हरिवर्ष, इलावृत्, रम्यक, हिरण्मय, उत्तरकुरु, भद्राश्व व केतुमाल. यांत भारतवर्ष हें सर्वाच्या दक्षिणेस आहे. त्याच्या उत्तरेस हिमालय पर्वत आहे. भारतवर्षास अजनाभ असेंहि नांव आहे.

भारतवर्षाचे नऊ विभाग आहेत. त्यांस खंडें म्हणतात. त्यांचीं नावें- इंद्रद्वीप, कसेरू ताम्रपर्ण, गभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व, वारुण व कुमारिका.

अशा तर्‍हेचें पुराणांतील वर्णन बरेचसें कल्पनामिश्र असल्यामुळें प्रचलित वर्णनाशीं त्याची संगति लावणें फारसें उपयुक्त होत नाहीं, पण महाभारतरामायणांतील वर्णन अधिक सुसंगत दिसतें.

महाभारतांत ज्या राष्ट्रांचा उल्लेख केला आहे त्यांची लांबलचक यादी ‘बुद्धोत्तर जग’ या विभागांत (पृ. १९-२१) दिलेली आहे. त्याच्याच पुढें बृहत्संहितेंतील देशनामें दिलेलीं आहेत.

महाभारतकालाची पुढील भौगोलिक माहिती रा. चिं. वि, वैद्य यांच्या जीमन्महाभारत- उपसंहार यांतून सारांश रूपानें घेतलेली आहे. महाभारतकाळीं सर्व देशांची संपूर्ण माहिती असली पाहिजे असें महाभारतावरून दिसतें. पाणिनीच्या काळीं दक्षिणेंतील देशांची माहिती विशेष नव्हती असा कित्येकांनीं तर्क केलेला आहे तो संभवनीय दिसतो. पाणिनीचा काळ ख्रिस्तपूर्व ८००-९०० मानण्यास हरकत नाहीं. या काळानंतर बुद्धाच्या काळापर्यंत दक्षिणेस थेट कन्याकुमारीपर्यंत भारतीय आर्याचा प्रसार झाला होता. त्यांचीं राज्येंहि स्थापित झालीं होतीं. विशेषतः चंद्रवंशी आर्य मोज व यादव यांनी दक्षिणेस वसती केली. त्यावेळीं दक्षिणेमध्यें वैदिक धर्म पूर्णपणें प्रस्थापित झाला होता. बौध्दधर्माच्या पूर्वी वैदिक धर्माचा दक्षिणेंत पूर्ण अंमल बसला होता, ही गोष्ट निर्विवाद आहे. प्रो. र्‍हीस डेव्हिड्स यानें आपलें असें मत लिहून ठेविलें आहे कीं, दक्षिण देशांत सिलोनपर्यंत आर्यांचा प्रसार ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत झाला नव्हता. कारण, निकाय ह्या बौध्द ग्रंथांत विंध्याच्या दक्षिणेकडच्या कोणत्याहि लोकांचें नांव नाहीं. निकाय ग्रंथांत दक्षिणेकडील देशांचीं नांवें आलीं नाहींत यावरून दक्षिणेकडील देश माहीत नव्हते ही विचारसरणी मुळींच चुकीची आहे. उल्लेखाचा अभाव हें प्रमाण मोहक असलें तरी अगदी लंगडे आहे. ज्या ग्रंथांत उल्लेख नाहीं त्या ग्रंथांत उल्लेख आलाच पाहिजे असा जोपर्यंत निश्चय नाहीं तोपर्यंत या प्रमाणास कांहीच किंमत नाहीं. बौद्धांचे निकाय किंवा विनय हे ग्रंथ धार्मिक ग्रंथ आहेत. हे इतिहासाचे किंवा भूगोलाचे ग्रंथ नाहींत यामुळें या ग्रंथांत उल्लेख नसणें हा कोणताच सिद्धांत काढण्यास प्रमाणभूत आधार होऊं शकत नाहीं. पण अलेक्झांडरच्या पूर्वीपासून दक्षिणेची माहिती भारतीय आर्यास होती याचा अस्तिपक्षीं पुरावा सबळ असल्याचें आपण पूर्वीच पाहिलें आहे. कारण अलेक्झांडरबरोबर आलेले इरॅटॉस्थनीस वगैरे भूगोल- ग्रंथकार असें लिहून ठेवतात कीं, हिंदुस्थानची कच्ची माहिती लांबीरुंदीच्या परिमाणासह अलेक्झांडरला पंजाबांत मिळाली होती. ती माहिती इरॅटॉस्थनीसनें आपल्या ग्रंथांत लिहून ठेविली आहे. कन्याकुमारीपासून सिंधुनदीच्या मुखापर्यंत लांबी त्यानें जी दिली आहे, ती हल्लींच्या प्रत्यक्ष स्थितीशीं बहुतेक तंतोतंत जुळते, हें पाहून जनरल कनिंगहॅम यास मोठें आश्चर्य वाटलें व सिंदरकाळींहि भारतीय लोकांस आपल्या देशाच्या आकाराची व लांबीरुंदीची संपूर्ण माहिती होती असें त्यानें लिहून ठेविलें आहे. म्हणजे पाणिनीनंतर शिकंदराच्या पूर्वी दक्षिणेंत आर्याचा प्रसार होऊन पांड्य वगैरे आर्य राज्ये दक्षिणेंत स्थापित झालीं होतीं. महाभारताच्या भीष्मपर्वातील भारतवर्षाच्या वर्णनांत हिंदुस्थानांतील कन्याकुमारीपर्यंतची सर्व राज्यें दिलेलीं असून हा भाग भूगोलवर्णनाचाच आहे. या महाभारतांतील (भीष्मपर्व आध्याय ९) भरतखंडाच्या वर्णनांत संपूर्ण देशांतील नद्या, पर्वत व देश यांची यादी दिली आहे.

हिंदुस्थानांतील लोक अथवा राज्यें- एकंदर १५६ देश भरतखंडांत म्हणून सांगितले आहेत. दक्षिणहिंदुस्थानांत ५० देश सांगितले आहेत, व उत्तरेकडील म्लेच्छ याशिवाय २६ सांगितलेले आहेत.

पूर्वेकडील देशः- (१) वरील यादींत कुरुपांचालाची गणना पूर्वेकडील देशांत केली आहे. याची राजधानी हस्तिनापूर ही होती. ती गंगेच्या पश्चिम किनार्‍यावर होती. यांच्या पूर्वेस पांचालांचे राज्य होतें. या देशाचा अर्धा भाग द्रोणानें जिंकून कौरवांच्या राज्यांत सामील केला, असें आदिपर्वात वर्णन आहे. पांचालदेश गंगेच्या उत्तरेस व दक्षिणस यमुनेपर्यंत होता. (२) यानंतर पूर्वेकडे दुसरें राज्य कोसल होतें. याचेहि दोन भाग (उत्तर कोसल व दक्षिणकोसल असे) होते उत्तरकोसल गंगेच्या उत्तरेस व दक्षिणकोसल दक्षिणेस, विंध्य पर्वतापर्यंत होता. अयोध्या नष्ट झाल्यावर उत्तरकोसलाची राजधानी श्रावस्ती होती व दक्षिण कोसलाची राजधानी विंध्य पर्वतांत कुसावती ही होती. (३) याच्या पूर्वेस मिथिल राज्य होतें. (४) गंगेच्या किनार्‍यावर काशीचें राज्य होते. (५) काशीच्या दक्षिणेस मगधांचे राज्य फारच सुपीक व माणसांनीं गजबजलेलें होतें. या मगधांची राजधानी पाटलीपुत्र नसून राजगृह अथवा गिरिव्रज ही होती. याच्या भोंवताळी पांच टेंकड्या आहेत. त्यांजवरील जुन्यापुराण्या इमारतींवरून अजूनहि त्या ओळखूं येतात. येथें आर्य देशांची मर्यादा संपली. (६) याच्या पूर्वेस म्हणजे हल्लींच्या बंगालप्रांतांत मिश्र आर्य होते असें स्पष्ट दिसतें. हे देश अंग, वंग, कलिंग या नांवांनीं प्रसिध्द आहेत. या देशांत गेल्यानें ब्राह्मण पतित होतो असें मानलें जात होतें. अंग, वंग, कलिंग या देशांचीं नावें चंपारण, मुर्शिदाबांद व कटक अशीं मानतां येतील. पौंड्र आणि सुह्य हे दोन्ही देश महाभारतांतील यादींत सांपडत नाहींत हें आश्चर्यकारक आहे. कदाचित् महाभारतकालीं हे देश भरतखंडाच्या बाहेरचे मानले जात असावे. याशिवाय पूर्वेकडचे देश आणखी सांगितलेले आहेत, ते ताम्रलिप्तक व ओड्र म्हणजे हल्लीचें ओरिसा होय. उत्कल हेहि लोक ओरिसाजवळच वसत होते व हल्ली पंचगौड ब्राह्मणांत उत्कल ब्राह्मणांची एक जात आहे, त्याजवरून उत्कल लोकांचें अस्तित्व बंगाल्याकडे अजूनहि दृष्टोत्पत्तीस येतें. प्राग्ज्योतिष यांचा राजा भगदत्त हा भारतीयुद्धात होता. प्रागज्योतिष देश म्हणजे हल्लींचा आसाम होय.

दक्षिणेकडील देशः-(१) कुरुक्षेत्राहून दक्षिणेकडे चाललें असतां आपणांस प्रथम शूरसेन देश लागतो. याची राजधानी मथुरा यमुनेच्या किनार्‍यावर असलेली प्रसिध्द आहे. (२) त्याच्या पश्चिमेस मत्स्यदेश हा होता. मत्स्यदेश जयपूरच्या किंवा अलवारच्या उत्तरेस होता. याची राजधानी कोठें होती हें सांगतां येत नाहीं. यावरून दशार्णदेश यकृक्लोमदेश हे येथेंच जवळपास असावेत, असें दिसतें. (३) यानंतर कुंतीभोजांचा देश चर्मण्वती नदीकांठीं होता, तो हल्लींच्या ग्वाल्हेर प्रांतांतला होय. (४) नंतर निषधदेश हा आपल्या लक्षांत यतो. हा निषध देश म्हणजे नलराजाचा देश होय. हा देश हल्लीं नरवरप्रांत जो शिंदेसरकारच्या ताब्यांत आहे तो होय, असें मानलें जाते. निषधापासून दक्षिणेकडे जो रस्ता दाखविला आहे, तो अवंती व ॠक्षवान्पर्वत यांना ओलांडून विंध्यमहाशैल व पयोष्णी नदीपर्यंत असा दाखविला आहे. ॠक्षवान्पर्वत राजपुतान्यांत असून त्याच्या शाखा निषध देशाच्या दक्षिणेस बर्‍याच गेलेल्या आहेत. (५) त्या शाखा ओलांडल्यावर अवंतीदेश लागतो. अवंती देश म्हणजे हल्लींचा माळवा होय. अवंतीदेश ओलांडल्यानंतर विंध्यपर्वत येतो. व विंध्याच्या पलीकडे नर्मदानदी आहे. पण येथें नर्मदा नदी हें नांव सांगितलें नसून पयोष्णी हें सांगितलें आहे व तें विदर्भाच्या जवळची म्हणून सांगितलें असावें. अवंती म्हणजे माळवा व उज्जयिनी, याबद्दल मुळींच शंका नाहीं (६) परंतु विदर्भ हा देश कोणता याजबद्दल शंका आहे किंवा मतभेद आहे. हल्लीचें वर्‍हाड म्हणजे विदर्भ होय, असें कित्येक मानतात. या विदर्भाची राजधानी भोजकट म्हणून मानलेली आहे व यांतील नदी पयोष्णी मानलेली आहे. भोजकट, पयोष्णी व विदर्भ हीं तिन्हीं ठिकाणें विंध्याच्या पश्चिमेस व नर्मदेच्या उत्तरेस मानली जातात. (७) परंतु महाराष्ट्राचे नांव सबंध महाभारतांत कोठेंच नाहीं, यावरून महाराष्ट्राचा जन्म त्यावेळेस नव्हता असें मात्र मानतां येत नाहीं. परंतु महाराष्ट्रास अद्याप मोठें स्वरूप आलें नव्हतें; त्याचे लहान लहान भाग त्यावेळीं होते. या भागांचीं नांवें महाभारतांत देशांच्या यादींत आलीं आहेत. तीं नांवें म्हणजे रूपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र या तीन राष्ट्रांचें मिळून महाराष्ट्र पुढें बनलें यांत मुळींच शंका नाहीं. भोजांचे जसे महाभोज झाले तसे राष्ट्राचे महाराष्ट्रिक झाले. अश्मक हा देश देवपीरीच्या भोंवतालच्या प्रदेशालाच धरून होता असें पुढील अनेक लेखांवरून सिध्द झालें आहे. तात्पर्यं, महाराष्ट्रांतील लोकांपैकीं अश्मक हे एक मुख्य होते. गोपराष्ट्र हा नाशिकच्या भोंवतालचा प्रदेश होय असें कित्येक ताम्रपटांतील लेखांवरून सिध्द झालेलें आहे. पांडुराष्ट्रहि त्याच्याच जवळ असावें. मल्लराष्ट्रहि महाराष्ट्राचा एक भाग असावा. या चारपांच लोकांचे एक राष्ट्र बनून तें महाराष्ट्र या नांवानें प्रसिध्दीस आलें. (८) आतां गुजराथी लोक व गुजराथ देश यांचा विचार करूं. यांचें नांव या यादीत मुळींच नाहीं. यावरून गुर्जरलोक गुजराथेंत महाभरतकाळापर्यंत आले नव्हते असें मानावें लागतें. हल्लींच्या गुर्जर देशांतील जे देश या यादींत दिसतात, ते आनर्त व सुराष्ट्र एवढेच दिसतात. कारण सुराष्ट्र हें नांव महाभारतांत अनेक ठिकाणीं आलेलें आहे. वनपर्वातील धौम्यानें सांगितलेल्या तीर्थयात्रेंत सुराष्ट्र देशांत समुद्रकिनार्‍यावर प्रभासतीर्थ असल्याचा उल्लेख आहे. (दाक्षिणात्य प्रतभारत वन. अध्याय ८७ श्लोक १८-२०) यावरून सुराष्ट्र म्हणजे काठेवाडच होय. आनर्त देश कोणता याच्याविषयी थोडासा मतभेद होईल. परंतु आनर्त म्हणजे हल्लींचा गुजराथ देश होय. कारण धौम्यॠषीनें सांगितलेल्या तीर्थाच्या वर्णनांत पश्चिमेकडील आनर्त देशांत पश्चिमवाहिनी नर्मनदा नदी सांगितलेली आहे (वनपर्व अ. ८९ श्लोक २). तेव्हां हल्लींच्या गुजराथेंतील मुख्य देश आनर्त व सुराष्ट्र हे त्यावेळचे प्रसिध्द देश होत. नर्मदेपर्यंत समुद्रकिनार्‍यानें आर्याची वस्ती झाली होती. इतकेंच नव्हे तर महाभारताकालीं ती नर्मदेच्या दक्षिणेस हल्लींच्या ठाणें प्रांतापर्यंत झाली होती. या बाजूचे दोन देश महाभारतांत देशांच्या यादींत परिगणित केले आहेत. परान्त व अपरान्त हे ते दोन देश होत. (९) अपरांताचें नां महाभारताच्या अलीकडच्या अनेक प्रतींत येतें. अपरांत म्हणजे उत्तरकोंकण होय, असें या अनेक ग्रंथांवरून दिसतें, अपरांतांतील मुख्य शहर प्राचीन काळीं शूर्पारक हें होते, त्यास हल्लीं सोपारें असें म्हणतात. परशुरामाच्या वस्तीचें ठिकाण पूर्वेस महेंद्र पर्वतावर होते व तेथें वैतरणी नदी व भूमीची वेदी होती असें वर्णन मात्र तीर्थयात्रेंत आलेलें आहे. परंतु परशुरामाला अन्य ठिकाण पश्चिम किनार्‍यावर याच वेळेपूर्वी दिलेलें होतें, असें या वरील वर्णनावरून दिसतें. अजूनहि या ठिकाणीं म्हणजे सोपार्‍याच्या पूर्वेस डोंगरांमध्यें वैतरणी नदी व परशुरामाची वेदी (वज्रेश्वरीजवळ) लोक दाखवितात. तात्पर्य, शूर्पारकक्षेत्र फार जुनें असून तें अपरांतांत मुख्य होतें. अपरांत म्हणजें ठाणें जिल्हा यांत बिलकुल शंका नाहीं. आणि याच दृष्टीनें परांत म्हणजे हल्लीचा सुरत जिल्हा मानला पाहिजे. यावरून ठाणें जिल्ह्याच्या जंगलामध्यें त्यावेळीं हत्ती पुष्कळ असून त्यांची ख्याति लढाईच्या कामांत असें दिसतें. हल्लींहि कानडा जिल्ह्यांतील व म्हैसूरच्या जंगलांत हत्तीं सांपडतात. परशुरामाचें क्षेत्र व परशुरामाकरितां समुद्रानें दिलेली जागा हल्लीं शूर्पारक ही न मानतां दक्षिणेस कोंकणांत चिपळूण येथें व चिपळूणच्या भोंवतालीं मानितात. व परशुरामाचें मंदिरहि डोंगरांत चिपळूणाजवळ आहे. यामुळें दक्षिणकोंकण हें परशुरामाचें क्षेत्र मानलें आहे. महाभारतकाळीं कोंकणामध्यें आर्यांची वस्ती झालेली नव्हती. उत्तरेकडून शूर्पारक देशांतून दक्षिणेकडे कोंकणांत आर्याची वस्ती पसरत गेली, त्यावेळीं आर्यानीं परशुरामाचें स्थान शूर्पारक येथून हालवून दक्षिण कोंकणात नेलें. यामुळें हल्ली शूर्पारक येथें परशुरामाचें क्षेत्र राहिलें नाहीं. हल्लीचें सोपारा हें क्षेत्र असून तें वसईजवळ आहे. म्हणजे वसईकडून चिपळुणाकडे ख्रिस्तपूर्व ३०० नंतर ब्राह्मणांची वस्ती होत गेली. चमत्कार असा आहे कीं, यानंतर मुसुलमानांच्या व पोर्तुगीज लोकांच्या त्रासामुळें या देशांत ब्राह्मणवस्ती मुळींच राहिली नाहीं. ती पुढें मराठ्यांच्या अमलांत दक्षिण कोंकणांतून आली. इतिहासांत हें परावर्तन लक्षांत ठेवण्यासारखें आहे. असो. दक्षिणेकडचे जे देश सांगितले आहेत, त्यांत कोंकण व मावळ हे देश आपल्या ओळखीचे आहेत. मालव म्हणजे घाटमाथ्यावरील मावळे हे लोक असावेत.

दक्षिणेंतील आणखी प्रसिध्द लोक म्हटले म्हणजे चोल, द्रविड, पांड्य, केरल व माहिषक हे होत. यांची नांवे अनुक्रमानें पूर्व- पश्चिम किनार्‍यानें वर सांगितल्याप्रमाणें अजूनहि प्रसिध्द आहेत. चोल म्हणजे मद्रास; चोलमंडल म्हणजे हल्लीचें कारोमांडेल; त्याच्या दक्षिणेस तंजावर हें द्रविड होय; पांड्य म्हणजे हल्लीचें तिनेवेल्ली; केरल म्हणजे त्रावणकोर; माहिष म्हणजे म्हैसूर; इतकीं नांवें आपणांस निश्चयानें ठरवितां येतात. वनवासी हेंहि नांव अजून प्रसिध्द आहे. हा देश म्हैसूराच्या उत्तरेस आहे. वनवासी ब्राह्मण अजूनहि माहीत आहेत.

पश्चिमेकडील देश- पश्चिमेकडील देशांच्या यादींत सिंधु, सौवीर, कच्छ हे देश आहेत सिंधु म्हणजे हल्लींचा सिंधप्रांत, सौवीर ह्याच्या व काठेवाडाच्या दरम्यानचा प्रांत ही समुद्रकिनार्‍याला लागून आहे. यांतच हल्लीचें कराची बंदर असावें. कच्छ देश हल्लींचा कच्छ प्रसिध्दच आहे. यास अनूप असेंहि नांव दिलेलें आहे. सिंधु, सौवीर आणि कच्छ यांच्या उत्तरेस गांधार हा देश सिंधूच्या पलीकडे असलेला प्रसिध्द आहे. याची हल्लींची राजधानी पेशावर ही होय. पेशावर अथवा पुरुषपुर याचें नांव महाभारतांत आलेलें नाहीं. परंतु गांधाराचें नांव वारंवार येतें. गांधाराच्या उत्तरेस व सिंधूच्या पलीकडील काश्मीर देश हाहि प्रसिध्द आहे.

आतां, यांच्या अलीकडे कुरुक्षेत्राच्या पश्चिमेस मरू म्हणजे मारवाड व पंजाब हे दोन हल्लींचे मोठमोठाले प्रांत आहेत, मद्रदेशामध्यें शाकल नगरास जाऊन नकुलानें आपल्या मामास म्हणजे शल्यास वश करून घेतलें. महाभारतकाळीं शाकलनगर हें प्रसिध्द होतें असें यावरून दिसतें. या नगरीचा उल्लेख ग्रीक लोकांनींहि केला आहे. या नगरांत पुढें मोठमोठाल्या यवन राजांनीं व कनिष्कादिकांनीं राज्य केल्याचा इतिहासांत दाखला आहे. पंजाबांतील शाल्व व केकय हे आणखी लोक महाभारतांत वारंवार उल्लेखित होतात व तक्षशिला नगरीचाहि उल्लेख वारंवार उल्लेख वारंवार येतो. परंतु याचें नांव भीष्मपर्वातील देशांच्या यादींत दिसत नाहीं. बाल्हिकांचें नांव महाभारतांत वारंवार येतें. तसेंच क्षुद्रकांचें नांवहि वारंवार येतें.

उत्तरेकडील देश- कुविंद, आनर्त, तालकूट इत्यादि देशांचें वर्णन झाल्यावर शाकलद्वीप वगैरे सप्तद्वीपांतील राजांशीं सहदेवाचें युध्द झाल्याचें वर्णन आहे. भगदत्त प्राग्ज्योतिष येथील राजा त्यानें जिंकिला असें येथें वर्णन आहे. अंतर्गिरि व बहिर्गिरि वगैरे लोकांस त्यानें जिंकिले. नंतर त्रिगर्त, दार्व, कोंकण, कांबोज, दरद वगैरे लोकांस त्यानें जिंकिलें. कांबोज व दरद हे अफगाणिस्तानांत व पश्चिम तिबेटांत राहणारे लोक आहेत.

बुध्दकाली हिंदुस्थानचे राजकीय विभाग कोणते होते त्याची माहिती बुध्देत्तर जग विभागांत (पृ. १७६-१७८) सांपडेल तिची येथें पुनरुक्ती करीत नाहीं.

शिकंदरकालीन हिंदुस्थान (ख्रिस्तपूर्व ३ रें - ४थें शतक)- अलेक्झांडरच्या कालापूर्वी नर्मदानदीच्या वरील बाजूस हिमालयापर्यंतच्या प्रदेशांत अनेक स्वतंत्र राज्यें होतीं. कांही राजसत्ताक तर कांहीं जातिसत्ताक किंवा प्रजासत्ताक होतीं. सम्राट् किंवा या सर्व राज्यांनां कक्षेंत ठेवणारा असा सार्वभौमन राजा कोणीहि नव्हता. ख्रिस्तपूर्व ४ थ्या किंवा ५ व्या शतकापूर्वी गांधार देशापासून अवन्तीपर्यंत पुढील १६ राष्ट्रें होतीं असें बौध्द ग्रंथांवरून दिसतें; अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वंश, कुरु, पंचाल, मच्छ, शूरसेन, असक्क, अवन्ती, गंधार आणि कंबोज. या राष्ट्रांचें वर्णन बुध्देत्तर जग विभागांत (पृ. १७६- १७७) केलेंच आहे. अयोध्या, वाराणशी, चंपा, कांपिल्ल, कौशांबी, मथुरा, मिथिला, राजगृह, रोरुक, सागल, साकेत, उज्जयिनी, व वैशैली हीं त्यावेळीं भरभराटीचीं शहरें होतीं. अलेक्झांडरच्या काळीं सिंधुनदी ही इराणी साम्राज्य आणि हिंदुस्थान यांच्यामधील सरहद्द होती. व पंजाब आणि सिंध या भागांत बरींच देशी संस्थानें नांदत होतीं. तेव्हां पंजाबांतील नद्यांचे प्रवाहमार्ग आतांपेक्षां अगदीं निराळे असें असून आज जे तिकडील प्रदेश नापीक दिसतात ते पूर्वी सुपीक होते. अलेक्झांडरनें बहुतेक ओहिंद (अटकपासून १६ मैलांवर) याठिकाणीं सिंधु ओलांडिली. आजच्या रावळपिंडीच्या वायव्येस असणारें ताक्षशिला शहर अलेक्झांडर येण्यापूर्वीच पडलें. हायडॅस्पीझ (झेलम) आणि अकेसिनीझ (चंद्र- भागा-चिनाब) यांमधील प्रदेशावरचा राजा पोरस याचा अलेक्झांडरनें पराभव केला व त्याला आपला मांडलिक केला. यानंतर अलेक्झांडर परत फिरला. जातांना त्यानें सिंधूच्या पूर्व आणि पश्चिम शाखांचें संशोधन केलें. या अलेक्झांडरच्या प्रवासाचें वर्णन ज्ञा. को. वि. ४ पृ. ६४- ७३ या स्थळी सांपडेल.

अलेक्झांडरला इकडील हिंदूंनीं हिंदुस्तानविषयीं चांगली माहिती दिल्याचें ग्रीक ग्रंथांवरून दिसून येतें. हिंदुस्थानचा आकार विषमसमचतुर्भुज (र्‍हॉम्बॉईड) सारखा असून त्याच्या पश्चिमेस सिंधुनद, उत्तरेस हिमालय आणि पूर्वेस आणि दक्षिणेस समुद्र आहे; पश्चिम बाजू सर्वांत लहान असल्याचें लिहिलें आहे. सिंधूपासून पालिबोधापर्यंतचे अंतर १० हजार स्टेडिआ (११४९ इंग्लिश मैल); गंगामुखापासून कन्याकुमारीपर्यंत १६ हजार स्टेडिआ (१८३८ मैल). याप्रमाणें ग्रीकांनीं अंतरें सांगितलीं आहेत. हीं साधारणतः हल्लींच अंतराशीं जुळतात. तथापि अलेक्झांडर व त्यावेळचे ग्रीक हे पंजाब व सिंध या दोनच प्रांतांत फिरले असल्यानें त्यांनां इतर हिंदुस्थानची विशेष माहिती नव्हती. ग्रीक ग्रंथकारांनीं अलेक्झांडरच्या स्वारीचें वर्णन करतांना जीं राज्यें, शहरें, किंवा इतर भूप्रदेश उल्लेखिले आहेत त्यांचा थोडक्यांत गोषवारा देऊन पुढील काळाच्या भूगोलाकडे वळूं.

अलेक्झांडरनंतरचे सर्व ग्रीक ग्रंथकार देखील सिंधु ही हिंदुस्थानची पश्चिम सीमा मानीत नाहींत. पूर्व एरिआना म्हणजे सांप्रतच्या अफगाणिस्तानचा बराच भाग ते हिंदुस्थानांतच धरतात. शिकंदरच्या इतिहासकारांनीं कबूल हें नांव मुळींच उल्लेखलें नाहीं. काबूल हें नांव प्रथम टॉलेमीच्या भूगोलंत आढळतें. अलेक्झांडरनें हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याजवळ अलेक्झांड्रिया शहर बसविलें. तें कोठें होतें याविषयीं अद्याप वाद आहे.

शिकंदराच्या इतिहासकारांनीं गांधार देशाचा उल्लेख केला नाहीं. पुष्कलावती ही शिकंदराच्या वेळींहि गांधार देशाची राजधानी होती. शिकंदरनें ही पुष्कलावती घेतल्यावर दुसरीं लहान लहान शहरें घेऊन तो एमबोलिम (ओहिद) येथें आला. त्यानें ओर्नास नामक किल्ला घेतला असें वर्णन आहे. पण तो कोणता याविषयी वाद आहे. तक्षशिलेचें वैभव आणि विस्तार याविषयीं सर्व ग्रीक ग्रंथकारांनीं पुष्कळ वर्णन केलें आहे. एरियन लिहितो कीं, तें सिंधु व बेहात यांच्यामध्यें सर्वाहून मोठें, जास्त वस्तीचें, आणि संपत्तिमान शहर होतें. स्ट्राबो म्हणतो कीं, याच्या आसपासचा प्रदेश दाट वस्तीचा व सुपीक होता. सांप्रतचें थेडा शहर झेलमच्या डाव्या किनार्‍यावर आहे. शिकंदराच्या वेळच्या सोफिटी राजांचा प्रांत कोणता याविषयीं सर्व ग्रीक ग्रंथकारांचें ऐकमत्य नाहीं स्ट्राबोनें त्याच्या प्रांतांत मिठाचा डोंगर आहे, त्यांतून सर्व हिंदुस्थानास पुरण्याजोगें मीठ निघतें असें लिहिलें आहे. ह्या राजाच्या पुष्कळ कथा ग्रीकांनीं लिहिल्या आहेत. तो फर सुंदर व सहा फुट उंच होता. त्याची प्रजाहि फार सुंदर होती. कुरूप संततीस तो मारून टाकीत असे. त्यानें शिकंदरास एक कुत्रा दिला होता; तो सिंह, हत्ती यांबरोबर लढत असे. जलालपूर येथें शिकंदराची छावणी होती; व पोरसची छावणी त्याच्यासमोर नदीच्या दुसर्‍या तीरीं निकोई येथें म्हणजे सांप्रतच्या मांग गांवाजवळ होती. छावणीपासून नदीच्या कडेनें सुमारें १० मैल जाऊन शिकंदर झेलम नदी उतरला व पोरसच्या छावणीच्या बाजूस आला. तेथें लढाई झाली. शिकंदरचा घोडा बुकेफाला हा लढाईत मोठी जखम होऊन मेला. त्याच्या स्मरणार्थ त्याच्या नांवानें बुकेफाला हें शहर बसविलें. तेंच सांप्रतचें जलालपूर असावें. शिकंदराचें संगल, बौद्धांचें सागर, व भारतांतील शाकल हीं एकच होत.

शिकंदरानें संगलवर हल्ला केला तेव्हांचें जें वर्णन आहे तें हल्लीं संगल म्हणून जी टेंकडी रावी नदीच्या पश्चिमेस आहे, तिच्याशीं बरोबर जुळते. रावीच्या उजव्या तीरावर एकीकडच्या एका उंचवट्यावर कमालिया हें जुनें शहर आहे. शिकंदरानें माली लोकांचें शहर अगदीं प्रथम घेतलें तें हें असावें. या कोट कमालियाच्या आग्नेय पूर्व दिशेस १६ मैलांवर हरपा आहे. अलेक्झांडर कोट कमालिया घेत असतां त्यानें आपला एक सरदार पुढें पाठविला. त्यानें एक शहर घेतलें तें हें असावें. अजुधान किंवा पाकपतन सतलजच्या जुन्या पात्रावर व हल्लींच्या प्रवाहापासून १० मैलांवर, डैलापुरच्या नैर्ॠत्येस २८ मैलांवर आहे. ग्रीक ग्रंथकारांनीं उल्लेखिलेले सुराकसी किंवा सुद्रीक लोक येथलेच असावे. यांचा देश व सुद्रीक लोकांचा देश व बियास नदीच्या पूर्व तीरावरील उंच प्रदेश येथपर्यंत शिकंदराच्या स्वारीची हद्द प्लीनीनें सांगितली आहे. शिकंदरानें माली लोकांच्या स्वारींत जें तिसरें शहर घेतलें व जें ब्राह्मणाचें होतें व ज्यांतील लोकांनीं फार पराक्रम केला असें लिहिलें आहे तें अतारी असावें. शिकंदर या शहराभोंवती होंडींतून फिरला असें वर्णन आहे, आणि अतारीच्या किल्ल्याभोंवती खंदक आहे त्यावरून हें संभवतें. शिकंदरनें घेतलेलें माली लोकांचें मुख्य शहर, मुलतान हें फार बळकट होतें, व तें त्या प्रांताची राजधानी होतें हें सर्व वर्णन मुलतानशीं जुळतें.

शिकंदराच्या स्वारींत वरील सिंधमधील पुढील शहरें आलीं आहेतः- शिकंदराच्या वेळीं सिंदोमान आणि हरमाटेलिया नांवाचें एक ब्राह्मणांचें शहर अशीं दोनच डायोडोरसनें लिहिलीं आहेत. सिंदोमान किंवा सेहवान अक्झिकानस या शहरापासून शिकंदर यानें आपलें सैन्य सांबूस याजवर नेलें. तो हिंदुस्थानांतील डोंगरी लोकांचा मुख्य आहे असें शिकंदरास वाटलें होतें. त्यानें आपली राजधानी सिंदोमान ही सोडिली ती त्याच्या नातलगांनीं शिकंदरास दिली असें एरियन म्हणतो. ब्राह्मण किंवा ब्राह्मणाबाद हेंच मोडकें शहर शिकंदराच्या इतिहासकारांनीं वर्णिलेलें ब्राह्मणांचें शहर असावें. म्यूझिकानसचें राज्य सर्व हिंदुस्थानांत संपत्तिमान् असें शिकंदरानें जें ऐकलें त्याच्याशीं हें जुळतें. शिकंदराच्या वेळीं लारमध्यें प्रसिध्द असें पटल हें एकच शहर होतें. शिकंदराच्या इतिहासकारांनीं लिहिलेलें पट्टल- जें सिंधुमुखाच्या शिरोभागीं होतें असें म्हणतात- तें हैदराबाद होय. शिकंदर आणि निआर्कस ह्यांच्या वेळीं जींतून गलबतें चालत असत व ते जींतून गेले अशी जी सिंधूची अगदीं पश्चिमेची शाखा ती सांप्रतचें घाराचें उत्तरचें पात्र होय. शिकंदरच्या वेळच्या दिलेल्या अंतरावरून कराची हें आराबीच्या पूर्वहद्दीवर असावें. शिकंदर ओरिटी प्रांतांत आल्यावर आंतल्या भागीं गेला, तेव्हां त्यास रामबाकिया शहर लागलें तेंच याचें मुख्य शहर होतें. तेथें वसाहत केली असतां तें संपत्तिमान् होईल असें वाटल्यावरून त्यानें ती कामगिरी एका सरदारास सांगितली. रामबाग हें नांव शिकंदरच्या वेळीं आढळतें, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

अशोककाल( ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांतील हिंदुस्थान)- अलेक्झांडरनंतर हिंदुस्थानावर ग्रीकांचा फारसा ताबा राहिला नाहीं. ग्रीकांपासून हिंदुस्थान सोडविण्यांत प्रमुख राजा चंद्रगुप्त होता (ख्रि. पू. ३०५). हाच मगधाच्या मौर्य घराण्याचा संस्थापक होय. त्याला हिंदुस्थानाचा पहिला सम्राट असें अन्वर्थक नांव देतां येईल. कारण त्याचें साम्राज्य बंगालच्या उसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलें होतें. हिंदुकुश पर्वत प्रथमच हिंदु साम्राज्याची सरहद्द बनून राहिला. त्याची राजधानी पाटलीपुत्र (पाटणा) होती. याचा नातू अशोक (ख्रिस्तपूर्व २७२-२३२) यानें तर अफगाणिस्तान, बलुचिस्तान व सिंध हीं आपल्या साम्राज्यांत समाविष्ट केली. उत्तरेस श्रीनगर व नेपाळांतील ललित- पाटण मिळून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत सरहद्द भिडविली. वंग(बंगाल), कलिंग व दख्खन हे त्याच्या सत्तेखालीं होते. आंध्र (कृष्णा आणि गोदावरी यांच्यामधील राज्य) हेंहि त्याचें मांडलिक असावें. चोल, पांड्य, सतीय व चेर हीं तामिळ राज्यें मात्र स्वतंत्र होतीं. अशोकाच्या साम्राज्याचा नकाशा ज्ञा. को. विभाग ४ (पृ. १११ समोर) यांत दिला आहे.

कनिष्ककाल (इ.स. २ रें शतक)- अशोकाच्या मृत्यूनंतर त्याचें साम्राज्य घटत जाऊन पुढें फक्त मगधावरच त्याच्या वंशजांचा ताबा चालू राहिला. आंध्र व कलिंग या राष्ट्रांनीं प्रथम स्वातंत्र्य मिळविलें. पुढें आंध्र राज्य फार वाढत गेलें. हिंदुस्थानचा द्वीपकल्पीय भाग अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत बहुतेक त्याच्या सत्तेखालीं आला. याची राजधानी पैठण येथें असे. इ. स २ र्‍या शतकांत शकांनीं सिंध आणि सुराष्ट्र (काठेवाड) व्यापिलें. या परकीयांशिवाय यवन आणि पल्लव यांनीं पश्चिम हिंदुस्थान पादाक्रांत केला. पण आंध्रांनीं यांनां जिंकलें. मौर्य साम्राज्यानंतर वायव्यभागास कनिष्काचें साम्राज्य प्रबल झालें. परूषपूर (अर्वाचीन पेशावर) ही त्याची राजधानी होती. याखेरीज बाकीचा हिंदुस्थानचा भाग लहान लहान हिंदु राजांच्या अंमलाखालीं होता. कनिष्ककालीन हिंदुस्थानचा नकाशा ‘बुद्धोत्तर जग’ विभागांत (पृ. १११) दिला आहे.

गुप्तकाल (इ.स. ४ थें शतक)- तिसर्‍या शतकाच्या प्रारंभीं आंध्र आणि कुशान घराणीं नष्ट होऊन त्यांच्या मुलुखांत लहान लहान राज्यें निर्माण झालीं. इ.स. ४ थ्या शतकाच्या मध्यांत गुप्त आणि पश्चिम सत्रप (शक) हीं दोन प्रबल साम्राज्यें उदयास आलेलीं दिसतात. रुद्रदाम सत्रप व समुद्रगुप्त हे समकालीन होते. समुद्रगुप्तानें आपलें राज्य हुगळीपासून यमुना आणि चंबळा नदीपर्यंत व हिमालयापासून नर्मदेपर्यंत वाढविलें. गंगेच्या बेचक्यांतील समतट, कामरूप (आसाम), आणि इतर लहान राज्यें त्याचीं मांडलिक होतीं. उत्तर राजपुतान्यांतील घराणीं त्याच्याच संरक्षणाखालीं आलीं होतीं.

दक्षिण हिंदुस्थानावरहि समुद्रगुप्तानें मोहीम नेली होती पण त्याला अखंड विजय मिळवितां आला नाहीं. त्यानें पहिला हल्ला दक्षिण कोसल व महानदीचें खोरें यांवर केल्यानंतर ओरिसाचा जंगली मुलुख पादाक्रांत केला, गंजकमधील कोट्टर व महेंद्रगिरी हे डोंगरी किल्ले घेतले. पिष्टापुर (आधुनिक पिठापुरम्) जिंकलें, व वेंगीचा राजा कांचीचा पल्लव राजा आणि पालखाचा (आजचें पालघाटचेरी) चा राजा यांनां नामोहरम केलें. नंतर दख्खनच्या पश्चिम भागाकडून येऊन त्यानें देवराष्ट्र (हा मराठ्यांचा मुलुख असावा) व एरंडपल्ल (खानदेश) जिंकून घेतलें. अलाहाबादच्या किल्ल्यांतील शिलालेखांत वरील समुद्रगुप्तासंबंधी माहिती मिळते. पश्चिम सत्रपाचा मुलुख चवथ्या शतकाच्या अखेरीस गुप्तसाम्राज्यांत समाविष्ट झालेला दिसतो. गुप्तकालीन हिंदुस्थानचा नकाशा व त्यांतील समुद्रगुप्ताच्या स्वारीचा मार्ग ‘बुद्धोत्तर जग’ विभागांत (पृ. ३२१ च्या समोर) दिला आहे.

हूणकाल( सहावें शतक)- पांचव्या शतकाच्या अखेरीस गुप्त साम्राज्याचा श्वेत हूणांनीं नाश केला. या श्वेतहूणांनीं काबूलचें कुशान राज्य मोडून ते हिंदुस्थानांत शिरले. ६ व्या शतकाच्या आरंभीं यांचा अधिपति मिहिरकुल होता. त्याची राजधानी पंजाबांत सकल येथें होती. माळव्यारहि एक हूण राजा असून वल्लभी आणि इतर राष्ट्रें मिहिलकुलाच्या अंकित होतीं. इ.स. ५२८ च्या सुमारास मगधराजाच्या नेतृत्वाखालील हिंदु राजमंडळाने मिहिरकुलाचा पराभव केला. पुढें लवकरच श्वेतहूणांचें आशियांतील साम्राज्य मोडलें.

हर्षकाल (सातवें शतक)- श्वेतहूणांचा पाडाव झाल्यानंतर ७ व्या शतकाच्या आरंभापर्यंत हिंदुस्थानांत कोणतेंच वरिष्ठ साम्राज्य नव्हतें. पुढें ठाणेश्वराचा राजा हर्षवर्धन (६०६- ६४८) यों ३५ वर्षे झुंजून उत्तर हिंदुस्थानांत आपलें साम्राज्य प्रस्थिपित केलें. इकडे दक्षिण हिंदुस्थानांत चालुक्याराजा २ रा पुलिकेशी हा प्रमुख होता. हर्ष राजा वारला तेव्हां त्याचा अधिकार, हिमालयापासून नर्मदेपर्यंतचा गंगेचा मैदानी मुलुख यावर चालत असून, कामरूप (आसाम), वल्लभी (काठेवाडांत) आणि नेपाळ यांचे राजे त्याचे मांडलिक होते. [हर्षाच्या राज्याचा नकाशा ‘बुध्दपूर्वजग’ विभागांत (पृ. ३२१) दिला आहे तो पहावा]. यावेळीं कलिंगांतील लोकवस्ती नाहींशी होत जाऊन त्याचा बहुतेक भाग जंगलमय बनला होता. सिंध हें स्वतंत्र राज्य असून त्यावर शुद्र राजे राज्य करीत होते. पंजाब व मुलतान हीं एकाच अंमलाखालीं होतीं.

सहाव्या शतकाच्या मध्यांत चालुक्य घराणें उदयास आलें. यानें दख्खनमधील द्रविड लोकांवर आपला अंमल गाजविण्यास सुरुवात केली. याची राजधानी वातापी (बदामी) येथें होती. कृष्णा आणि गोदावरी यांमधील पल्लवांनां चालुक्यांनीं हुसकावून लाविले पण कांचीच्या पल्लवांनीं स्वातंत्र्याकरितां मोठ्या चिकाटीनें बरेच दिवस युध्द चालविलें होतें.

हर्षानंतर पुन्हां लहान लहान संस्थानांचा हिंदुस्थानांत बुजबुजाट झाला. तथापि ११ व्या शतकापर्यंत परकीय स्वार्‍यांपासून (सिंधवरील अरबांची छोटी मोहीम सोडल्यावर) हिंदुस्थान अगदीं मुक्त होतें.

हर्षकालीन भारताची स्थिति व त्याचें भौगोलिक वर्णन ह्युएनत्संग या चिनी प्रवाश्याच्या वृत्तावरून चांगलें कळतें. त्या प्रवाशानें उल्लेखिलेलीं सर्वच स्थळें निश्चित करतां येतात असें नाहीं. पण सेंट मार्टिन, कनिंगहॅम, व्हि. स्मिथ, ज्यूलिएन, वाटर्स वगैरे संशोधकांनीं ह्युएनत्संगाचा प्रवासमार्ग नक्की करून त्यावरचीं स्थळेंहि नोंदलेलीं आहेत [ह्युएनत्संगाचा प्रवासमार्ग ‘हर्षकालीन हिंदुस्थान’ या नकांशांत (ज्ञा. को. वि. ४ पृ. ३२१) दिला आहे.]

ह्युएनत्संगनें हिंदुस्थानचें पांच भाग केले आहेत. त्यानें सांगितलेला या देशाचा एकंदर घेर वास्तविक घेराच्या दुप्पट आहे. ह्युएननें हिंदुस्थानांतील एकंदर ८० राज्यें उल्लेखिलीं आहेत. ह्युएनच्या वर्णनावरून उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व व दक्षिणहिंदुस्थान यांची भौगोलिक स्थिति कशी होती यांची थोडक्यांत माहिती पुढें देत आहो.

उत्तर हिंदुस्थानः- ह्युएनत्संगनें उत्तर हिंदुस्थान हा जो भाग केला आहे त्यांत स्थूलमानानें सांप्रतचा पंजाबप्रांत व सुमारें तितक्याच विस्ताराचा त्याच्या पश्चिमचा काबूलचा भाग येतो. या भागांत त्यानें कौफू (आफगाणिस्तान), काश्मीर आणि टाकी (पंजाब) असें मुख्य तीन विभाग सांगितले आहेत. पहिल्यांत १० व दुसर्‍यांत ६ आणि तिसर्‍यांत ३ राज्यें होतीं.
कौफू किंवा अफगाणिस्तानः- कापिसेन, कोकिनी (काबूल), अरकॉशिआ (गिजनी), लंघन, नरहार (जलालाबाद), गांधार, उद्यान (स्वात), बोलर (बालटी) फालाना (बानू), आणि आपोशिन (अफगाणिस्तान).

काश्मीरः- काश्मीर, उरस, टाक्सिला (तक्षशिला), सिंधपुर (केटास), पुनय, राजपूर (राजुरी).

टाकी किंवा पंजाब- टाकि (उत्तर पंजाब) , बुकेफाला (दिलावर), शारकोट.

पश्चिम हिंदुस्थान- सिंध, गुर्जर आणि वल्लभी हीं तीन राज्यें त्यावेळीं पश्चिम हिंदुस्थानांत होतीं. पहिल्यांत सिंधु नदीचा सर्व प्रदेश (पंजाबपासून समुद्रापर्यंत) कच्छ बेटासुद्धा येतो. दुसर्‍यांत काठेवाड द्वापकल्प व त्याच्या शेजारचा कांहीं प्रदेश व तिसर्‍यांत पश्चिम राजपुताना आणि त्या जवळचें मोठें वाळवंट येतें. सिंधचे ४ विभाग होते. वरील सिंध भागाचा घेर ११६७ मैल असून त्यांत कच्छगंडावा प्रांताचा सर्व पश्चिमभाग असण्याचा संभव आहे.

मध्यसिंधचा घेर ४१७ मैल सांगितला आहे. यांत ब्राह्मण किंवा ब्राह्मणाबाद येतें. ह्युएनत्संग पिटाशिला किंवा पटल हें एकच शहर सांगतो. तो राजधानी कोटेश्वर एथून उत्तरेस ११७ मैलांवर पिटोशिले येथे गेला. सिंधचा चवथा प्रांत कच्छ हा सिंधची राजधानी आलर हिच्या नैर्ॠत्येस २६७ मैलांवर असून याचें नांव ओरीन पोललो असें दिलें आहे. या प्रांताचा घेर ८३३ मैल. राजधानी कटीसशिफाली. ह्याचा घेर ५ मैल होता याशिवाय कोटेश्वर (देवस्थान) व ओरिटी हीं दोन स्थळें सांगितलीं आहेत.

गुर्जर- पश्चिम हिंदुस्थानांतील दुसरें राज्य किंचेलो किंवा गुर्जर हें ह्युएनत्संगनें वल्लभीच्या उत्तरेस ३०० मैल व उज्जनीच्या वायव्येस ४६७ मैल सांगितलें आहे. याची राजधानी पिबोमिलो म्हणजे बालमीर ही होती. या राज्याचा घर ८३३ मैल होता. त्यांत हल्लीचीं बिकानेर जेसलमीर, जोधपूर हीं संस्थानें येत असावीं. गुजराथ हें नांव ह्युएनत्संगच्या वेळीं पश्चिम राजपुतान्यास होते. भडोच हें त्यावेळीं वल्लभीच्या ताब्यांत असावेसे दिसतें. सुराष्ट्र राज्य वल्लभीच्या ताब्यांत होतें. त्याची राजधानी वल्लभीच्या पश्चिमेस ८.३ मैल होती.

मध्य हिंदुस्थान- मध्यहिंदुस्थान या भागांत सतलज पासून गंगेच्या मुखापर्यंत व हिमालयापासून नर्मदा व महानदी येथपर्यंत प्रदेश येत असे. बंगाल खेरीजकरून बाकी हिंदुस्थानांतील सुपीक व भरभराटीच्या प्रांतांपैकीं बहुतेक प्रांत यांत येत असत. ह्युएनत्संगच्या वेळच्या ८० राज्यांपैकी जीं ३७ राज्यें यांत होतीं, त्यांचीं नांवें, स्थानेश्वर, वैराट- मत्स्यदेश, श्रुघ्न, मडावर, ब्रह्मपुर, अहिच्छत्र, पिलोपेण, संकिसा, संकास्या, मथुरा, कनोज, अयुटो- उत्पलारण्य, हयमुख, प्रयाग, कौशांबी, कुशपुर, विशाखा- साकेत, अयोध्या, श्रावस्ती, कपिला, कुशीनगर, वाराणशी, गजपतिपुर, वैशाली, व्रज, नेपाळ, मगध, हिरण्यपर्वत, चंपा, कांकजोल, पौंड्रवर्धन, जझोटी, महेश्वरपुर, उज्जनी, माळवा, खेडा, आनंदपुर, वचडारी- ईदर,

पूर्वेकडील हिंदुस्थान- यांत आसाम, बंगाल, गंगेच्या मुखाजवळील प्रदेश, संभळपूर, ओरिसा आणि गंजम इतके हल्लींचे प्रांत येत असत. यांचे ह्युएननें ६ भाग सांगितलें आहेत; कामरूप, समतत, ताम्रलिप्ति, किरणसुवर्ण, उड्र आणि गंजग. कामरूप, (आसाम) प्रांताचा घेर १६६७ मैल होता समतटाची राजधानी कामरूपाच्या दक्षिणेस सुमारें २०० व ताम्रलिप्तीच्या पूर्वेस १५० मैल सांगितली आहे.

ताम्रलिप्तीचा घेर २५० मैल असून हा प्रांत समुद्र किनार्‍यावर होता व त्याची जमीन सखल व दमट होती. किरणसुवर्ण राज्याचा घेर सुमारें ७५० मैल होता. उड्रओडिया याला ह्युएनत्संगनें ओड म्हटलें आहे. राजधानी हल्लींच्या जाजपुर गांवीं होतीं. येथील लोकांची भाषा व उच्चार हीं मध्यहिंदुस्थानांतल्यापेक्षां निराळीं होतीं. उड्रच्या राजधानींहून नैर्ॠत्येस, २०० मैलांवर गंजम (कौंग्युटो) असे. हें नांव कशाशीं जुळतें याचा पत्ता लागला नाहीं. हें गंजम असावें. गंजम मधील लिपि मध्यहिंदुस्थानांतल्यासारखी होती. परंतु भाषा व उच्चार हीं निराळीं होतीं.

दक्षिणहिंदुस्थानः- तापी आणि महानदी यांच्या दक्षिणेकडील सर्व भागास दक्षिण- हिंदुस्थान असें नांव होतें. यांत पुढील नऊ राज्यें होतीं (१) कलिंग- ह्युएनच्या वेळीं राजमहेंद्री राजधानी असावी, (२) कोसल, (३) आंध्र हें सांप्रतचें तैलंगण होय. (४) धनककट या देशाचा घेर १००० मैल होता, (५) चोरिय किंवा जोरिय प्रांत लहान (४०० मैल घेराचा) होता, (६) द्रविड ह्या प्रांताचा घेर १००० मैल होता; राजधानी कांचीपुर, (७) मलकूट- मथुरा, (८) कोंकण- या राज्याचा घेर ८३३ मैल लिहिला आहे, (९) महाराष्ट्र- महाराष्ट्राच्या राजधानीपासून भडोचचे अंतर १६७ मैल होतें; देशाचा घेर १००० मैल होता. राज्याच्या पूर्वसीमेवर एक मोठा बुध्दविहार होता. सिलोन हें सातव्या शतकांत सिंहलद्वीप या नांवानें प्रसिध्द होतें. तेथून आलेले यात्रेकरू ह्युएन यास कांची येथें भेटले होते. त्यांच्यापासून ह्युएनला सिलोनची माहिती मिळाली. ह्याचा घेर ११६७ मैल होता व उत्तर- दक्षिण लांबी २७१ मैल व रुंदी १३७ मैल होती.

चोलकाल (११ वें शतक)- दहाव्या शतकाच्या अंती व अकराव्या शतकाच्या आरंभीं पुन्हां हिंदुस्थानावर मुसुलमानांच्या स्वार्‍या होऊं लागल्या. इ. स. ९९२ च्या सुमारास सबक्तगीननें सिंधुनदीपर्यंतचा भाग आपल्या तांब्यांत ठेवला होता पण यापुढें गझनीच्या महमदानें लाहोरच्या २ र्‍या जयपाळाचा पराभव करून (१००१) हिंदुस्थानांत मुसुलमानांचें कायमचें ठाणें दिलें. यावेळीं हिंदुस्थानांत बरींच राज्यें होतीं पण महमदानें यांपैकी बहुतेक महत्त्वाची राज्यें (उदाहरणार्थ लाहोर, भटिया, मुलतान, ग्वाल्हेर, माळवा, कालिंजर, कनौज, दिल्ली, अजमीर वगैरे) जिंकलीं होतीं. नगरकोट (हिमालय), सोमनाथ (गुजराथ), मथुरा, व ठाणेश्वर हीं हिंदुक्षत्रें त्यानें लुटलीं. त्यावेळीं बुंदेलखंडाच्या दक्षिणेंस हल्लीं ज्याला मध्यप्रांत म्हणतात तो मुलूख चंदि राज्यांत मोडत असे. दख्खनमध्ये चालुक्य घराणें ८ व्या शतकांत मोडकळीस आलें होतें. तें दहाव्या शतकांत पुन्हां सावरलें गेलें. त्याची राजधानी कल्याण येथें होती. अगदीं दक्षिणेस चोल राज्य फार उदयास आलें. राजराज चोलानें (९८५- १०११) पल्लवांचें जुनें साम्राज्य बुडवून टाकिलें. सिलोनपर्यंत त्यानें दिग्विजय केला. आजचा मद्रास इलाखा, सिलोन, व म्हैसूरचा बहुतेक भाग त्याच्या साम्राज्यांत मोडत असे. त्याचा मुलगा राजेंद्रचोल यानें ओरिसा आणि बंगालपर्यंत साम्राज्य वाढवून संरक्षणाकरितां एक बलिष्ठ आरमारहिं ठेविलें होतें. पांड्य राजघराणें हें चोलांचें मांडलिक असावें. यावेळीं होयसळ बल्लांनीं चोलांच्या जागीं आपलें राज्य स्थापिलें होतें. म्हैसूरचा पश्चिम भाग व मलबार हे यांच्या राज्यांत मोडत असत. त्यांची राजधानी द्वारसमुद्र किंवा आजचें हळेबिड येथें होता.

चव्हाणकाल (१२-१३ वें शतक)- यावेळीं दिल्ली आणि अजमीर येथील राज्यें पृथ्वीराज चव्हाणाच्या अंकित होती; पण कनौजचे राठोड आणि गुजराथचे वाघेला त्याचे कट्टे शत्रू होते. यांनीं आपआपसांत भांडून महंमद घोरीला विजयाचा मार्ग सुलभ करून दिला. घोरीनें रजपुतांचीं राज्यें खालसा करून आपलें साम्राज्य बनविलें. कनोजच्या राठोडांनीं नंतर मारवाडचें राज्य स्थापिलें. घोरीच्या सुभेदारांनीं ग्वाल्हेर आणि अनहिलवाडा तसेंच कालिंजर घेऊन बंगाल आणि बिहार खालसा केले. सुमेर रजपुतांच्या ताब्यांत सिंध होतें तें अल्तमषनें बळकावलें; तसेंच माळवा जिंकला. दक्षिणेंत बल्लाळ अद्याप बलिष्ठ होते. १२ व्या शतकाच्या अखेरीस चालुक्यांचा र्‍हास होऊन त्यांचा मुलूख बल्लाळ आणि यादव यांनीं वांटून घेतला. यावेळीं चोलांचा उत्कर्ष बंद पडून पांड्य घराणें स्वतंत्र होऊं पाहत होतें. तेलंगणावर नरुपति घराणें होतें. त्याची राजधानी वारंगळ होती.

यादवकाळ (१४ वें शतक)- या कालांत दक्षिणेंत देवगिरी येथें यादव राज्य करीत असतां उत्तर हिंदुस्थानांत राज्यक्रांति झाली. तेथील गुलाम घराणें जाऊन खिलजी घराणें अधिष्ठित झालें. अल्लाउद्दीन खिलजीनें दक्षिणेवर स्वारी करून रामदेवराव यादवापासून एलिचपुर घेतलें, तसेंच गुजराथ, काठेवाड त्यानें पादांक्रांत केलें. कच्छ मात्र आपलें स्वातंत्र्य कसेंबसे टिकवून राहिलें होतें. चितोड, जालोर आणि सिबना हीं मुसुलमानांच्या हातीं पडलीं. एवढ्यानेंच थांबलें नाहीं. अल्लाउद्दीनचा सुभेदार मलिक काफर यानें दक्षिण- दिग्विजयाला आरंभ केला (१३०९-११). वारंगळचा राजा मुकाट्यानें त्याचा मांडलिक बनला. रामदेवरावाला पुन्हां एकदां पराभव स्वीकारावा लागला (१३०). बल्लाळांचें राज्य खालसा झालें. अशा रीतीनें महाराष्ट्र व कर्नाटक हीं मुसुलमानांचें स्वामित्व पत्करून राहिलीं,. १३१८ मध्यें खिलजी घराण्याच्या शेवटच्या राजानें मलबार जिंकले व यादवांचे राज्य अजीबात धुळीला मिळविलें. उत्तरेस काश्मीर, पूर्वेस, ओरिसा, पश्चिमेस जुनागड आणि कच्छ व अगदीं दक्षिण टोंकाचा मुलूख हीं राष्ट्रें एकंदर हिंदुस्थानांत त्यावेळीं आपलें स्वातंत्र्य टिकवून राहिली होतीं.

विद्यारण्यकाल ( १४ वें शतक)- या काळांत मुसलमानांचा जोर कमी होऊन पुन्हां हिंदुराज्यें स्वतंत्र होत होती. स. १३४० त बंगाल आणि तेलंगण प्रांत स्वतंत्र झाला. सात वर्षांनीं दक्षिणेंत बहामनी राज्य स्थापन झालें. कृष्णा आणि तुंगभद्रा यांच्या दक्षिणेस विजयानगरचे राजे फार उत्कर्षास चढले होते. जोनपूर, गुजराथ, खानदेश आणि माळवा येथील राजांनीं मुसुलमानांचें स्वामित्व झुगारून दिलें होतें. या सर्व राष्ट्रांत बहामनी आणि विजयानगर ही राष्ट्रें मोठी व बलिष्ठ होतीं. बहामनी राज्याची गोंडवनाच्या बाजूची सरहद्द वर्धा किंवा वैनगंगा यांच्या प्रवाहाच्या बाजूनें चालली होती. या राज्यांतील अगदीं उत्तरेकडचा प्रांत वर्‍हाड असून पश्चिमेस घाटापर्यंत राज्याचा विस्तार होता. मात्र कोंकणांतील लहान राजे स्वतंत्र होते. चौल आणि दाभोळ या मार्गांनीं परदेशांशीं दळणवळण चालत असे. कृष्णा आणि तुंगभद्रा यांमधील मैदान कोणाचें याबद्दल बहामनी आणि विजयानगरचें राज्य यांच्यांत तंटा होता. यांतील रायचूर आणि मुद्गल हे बळकट किल्ले कधीं एकाच्या तर कधीं दुसर्‍याच्या ताब्यांत असत. विजयानगरच्या साम्राज्यांत कृष्णा आणि तुंगभद्रा यांमधील लहान संस्थानें मोडत. गोंवा, धारवाड आणि त्या भोंवतालाचा मुलूखहि त्याच्याच अंमलाखालीं होता. गोंडवनांतील जाती खेलीच्या कोणी नरसिंह म्हणून होता त्याच्या सत्तेखालीं असत.

सिंधवर जाम घराणें राज्य करीत होतें. जाम राजे सुमेर रजपूत होते पण त्यांनीं १४ व्या शतकाच्या अखेरीस मुसुलमानी धर्म स्वीकारला. १४५० पर्यंत दिल्लीच्या सुलतानाला ते खंडणी देत असत. पण त्या सालीं त्यांनीं आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. उत्तर तापीचें खोरें स्वतंत्र गौळी घराण्याकडे होतें. काश्मीर जरी स्वतंत्र होतें तरी त्यावर अंमल करणारे राजे मुसुलमान होते. कच्छ, काठेवाड आणि ओरिसा यांवर स्वतंत्र हिंदु राज्यें होती. अशा रीतीनें हिंदुस्थानचें अनेक वेगवेगळाले तुकडे पडलेले असतांनां तैमुरलंगानें त्यावर स्वारी केली व फारसा विरोध न येतां तो हिंदुस्थानचा बादशहा बनला. यापुढें हिंदुस्थान सर्व बाजूंनीं परतंत्र बनत चाललें. मराठ्यांचा कांही काळ अंमल सोडल्यास मुसुलमानी राजे व यूरोपियन लोक यांच्या सत्तेखालीं हिंदुस्थानचा बहुतेक सर्व मुलुख अव्याहत चालत आला आहे. या संबंधीचा इतिहास पुढील प्रकरणात येईलच.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .