प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ६ वें
हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन.

मद्रास, इतिहास - दक्षिण हिंदुस्थानचे मूळचे रहिवासी जंगलांत राहणारे असून दगडांच्या वस्तू करून पोट भरीत असत. त्यांचा प्राथमिक इतिहास दंतकथानुसार बनविलेला आहे. रामानें या भागांतून प्रवास करून सिंहलद्वीप गांठलें व रावणाला मारून सीता परत आणिली यासारखा इतिहास प्राचीन होय. मुसुलमान दक्षिणंत येऊन मुलुख जिंकण्यापूर्वीचा विश्वसनीय इतिहास बहुधां मुळींच मिळत नाहीं म्हटल्यास चालेल. मध्यंतरीच्या बौद्धकालांतील शिलालेख, ताम्रपट, स्तूप व कांही भव्य बौद्ध मंदिरें त्याकाळची प्रत्यक्ष साक्ष पटवितात. गंजम व बल्लारी जिल्ह्यांत अकोश राजानें बांधिलेली मंदिरें अजून अस्तित्त्वांत आहेत. अगदीं दक्षिणेस मदुरा येथें पांड्यांचे राज्य, त्यांच्या उत्तरेस चोलराजे, व पश्चिमेस केरळ होते. अशोकानंतर कांही काल कांजीवरम् येथें पल्लव राजे प्रबल असून त्यांची राज्यमर्यादा ओरिसापर्यंत पसरलेली होती. उत्तर भागांत मौर्याच्या मागून आंध्र राज्ये राज्य करूं लागले. ते बौद्धधर्मीय होते. इ.सनाच्या ५ व्या शतकांत चालुक्यांनीं आपली सत्ता उत्तर भागांत स्थापन केली. ७ व्या शतकांत चालुक्यांच्या पूर्व व पश्चिम अशा दोन शाखा झाल्या. पूर्व चालुक्यांनीं वेंगी देशाच्या पल्लव राजांनां जिंकलें. पल्लवांचा पराभव कदंब राजांनीं केला. राष्ट्रकूट नांवाचा वंश पुढें आला. तेराव्या शतकांत पांड्य, चोल, होयसळ ही तीन राजघराणीं दक्षिण हिंदुस्थानांत होतीं. १४ व्या शतकांतहि दिल्लीहून मुसुलमान लोक दक्षिणेंत उतरले. यासुमारास हंपी येथील विजयानगरचें राज्य कायतें मुसुलमानांनां अडथळा करण्यासारखें होतं. सन १५०९- १५३० पर्यंत विजयानगरचा अभ्युदय कळसास पोंचला होता. त्यावेळीं कृष्णा नदीपासून तों कन्याकुमारीपर्यंत विजयानगरच्या राज्याचा विस्तार होता. यावेळीं येथें कृष्णादेव नांवाचा राजा होता. विजायनगरचा मोठा शत्रु म्हणजे बहामनी वंशांतले सुलतान होत. यांच्यांत वारंवार लढाया होत. शेवटीं १५६५ सालीं तालिकोटच्या लढाईत विजयानगरचा पूर्ण पराभव झाला. त्यामुळें मांडलिक राजे स्वतंत्र होऊं लागले व जिकडे तिकडे बेबंदशाही माजली. यामुळें नायक अथवा पाळेगार लोक प्रजेला निर्दयपणें वागवीत. यांत मदुरेचे नायक स्वतंत्र असून बाकीचे विजापूर, गोवळकोंडा येथील सुलतानांच्या सत्तेखालीं होते. याच सुमारास मराठे उदयास आले. १६८१ त दिल्लीहून औरंगझेब मोठें सैन्य घेऊन दक्षिणेंत आला. त्यानें विजापूरचें व गोवळकोंड्याचें राज्य हस्तगत केलें. परंतु त्याला मराठ्यांचा मोड करतां आला नाहीं. १७२४ सालीं मोंगल सुभेदार असफजाह यानें हैद्राबाद येथें स्वतंत्र गादी स्थापिली. याच्या वंशजांनां हैद्राबादचे निजाम म्हणतात. कर्नाटकांत जे नबाब सुभेदार होते ते हैद्राबादचे मांडलिक होते. त्यांनां अर्काटचे नबाब म्हणत. मध्यंतरी म्हैसूर येथें एक हिंदुराज्य उदयाला आलें. विजयानगरचा नाश झाल्यादिवसापासून तें राज्य उत्तरोत्तर वाढतच चाललें. हैदरअल्ली हा साधारण शिपाई होता परंतु पुढें म्हैसूरचा नाईक बनला. यानंतर इंग्रज, मराठे, निजाम व हैदरअल्ली यांच्या धुमाकुळीस १८ व्या शतकाच्या मध्यांत आरंभ होऊन शेवटीं इंग्रज यशस्वी झाले. पोर्तुगीज व फ्रेंच लोकांनीं कांही दिवस या इलाख्यांत वसाहत केली होती. १७ व्या शतकांत डच लोकांनीं पुलिकत घेऊन पोर्तुगीजांनां हांकलून दिलें. १७४१ त डुप्ले पांडिचेरीचा गव्हर्नर झाला. इंग्रजांची वस्ती त्यावेळेस विझगापट्टम व मच्छल्लीपट्टमला होती. त्यांनी १६२० त मराठ्यांपासून कुडालेर नजीक फोर्ट सेंट डेव्हिडची जमीन खरेदी केली. आणि १७ व्या शतकाच्या शेवटीं मद्रास इलाख्यांत इंग्रजांच्या वसाहती पोर्ट नोव्हो, भद्रपोलम् , विझगापट्टम्, अंजेंगो, वेलिचरी व कालिकत इत्यादि ठिकाणी होत्या. दुसर्‍या इंग्रज-फ्रेंच युद्धांत इंग्रजांनीं कंडोर येथें फ्रेंचांचा पराभव करून मच्छल्लीपट्टम् घेतलें. आणि पुढें जिंजी, अर्काट, आणि इतर किल्ले इंग्रजांस अनायासें फ्रेंचापासून मिळाले. १७६३ सालीं यूरोपांत फ्रेंच व इंग्रज यांमध्यें तह झाल्यापासून फ्रेंचांनीं वर डोकें काढलें नाहीं. पण पुढें हैदर, मराठे, इंग्रज व निजाम यांच्यांत लढाया सुरू झाल्या. तिसर्‍या म्हैसूरयुद्धांत कॉर्नवालीसनें टिप्पूचा पराभव केला तेव्हां इंग्रजांस सालेम आणि मलबार जिल्हे आणि दिंदिगलच्या आसपासचा प्रांत मिळाला. श्रीरंगपट्टण येथें टिप्पू पडल्यावर म्हैसूर संस्थान इंग्रज सत्तेखालीं आलें व कंपनीला कानडा, कोइमतूर व वैनाड हे जिल्हे मिळाले. १७९९ त तंजावरच्या मराठा राजानें कंपनीशीं तह करून सर्व राज्यव्यवस्था कंपनीच्या स्वाधीन केली. निजामाकडून कांही भाग आला. त्याला सीडेड डिस्ट्रिक्ट्स असें म्हणत. यांत बल्लारी, अनंतपूर, कडाप्पा व कर्नल या जिल्ह्यांचा समावेश होतो. अशा रीतीनें इंग्रजांनीं कन्याकुमारीपासून उत्तर सरकार पर्यंतचा मुलुख मिळविला. १८४५ सालीं डेन्स लोकांपासून ट्र्यांकीबार विकत घेतलें. १८६२ सालीं उत्तर कानडा मुंबई इलाख्यांत वर्ग केला. कर्नूलच्या नबाबानें इंग्रजांविरुद्ध कांही कारस्थानें केली म्हणून त्याचाहि प्रांत त्याजजवळून काढिला. पाळेगार लोकांचा त्रास अद्याप होताच. परंतु हळूहळू तो कमी होत गेला.

अवशेषः- १८८२ मध्यें मद्रास इलाख्याची पहाणी करावयाची व ठिकठिकाणच्या प्रसिद्ध इमारती, कोरीव लेणीं, शिलालेख वगैरे पाहून त्यांचें वर्णन व भाषांतर करून घ्यावें या उद्देशानें दोन अधिकारी नेमण्यांत आले. पौराणिक क्षेत्रें या इलाख्यांत बरीच आहेत. कृष्णा कांठचा अमरावती येथील बौद्ध लोकांचा स्तूप, पल्लव राजांच्या गुहा, चिंगलपट येथील सात देवालयें, मुडविद्रि येथील जैन देवालय, कारिकल व यन्नूर येथील प्रचंड पुतळे हीं प्रसिद्ध आहेत. मुसुलमानांचे अवशेष मद्रास इलाख्यांत फारसे नाहींत. हिंदु इतिहासावशेष बल्लारी व गंजम जिल्ह्यांत बरेच आढळतात. मदुरा, रामेश्वर, तंजावर, कांजीवरम्, श्रीरंगम्, चिदंबरम्, तिरवन्नमलाय, वेलोर व विजयानगर येथील इमारतीची कामें १६।१७ व्या शतकांत झालेलीं असल्यामुळें त्या कालाला सुवर्णकाल म्हणणें संयुक्तिक आहे.

मद्रास शहरः- इतिहास- १६३९ सालीं मद्रास शहराची स्थापना झाली. त्यावेळेस इंग्लंडांत पहिला चार्लस राजा गादीवर होता. कारोमांडल किनार्‍यावर मच्छलीपट्टण नांवाचे बंदर कंपनीचें मुख्य स्थळ होतें. विजयानगरचें राज्य रसातळास गेल्यावर तेथील राजे चंद्रगिरीस राहत होते व नायकांच्या मार्फत सत्ता चालवीत असत. १६३९ त मद्रासपट्टम् येथें किल्ला बांधण्याची परवानगी फ्रान्सिस डे नांवाच्या इंग्रज इसमानें मिळवून किल्ला बांधण्यास सुरुवातहि केली. मद्रासचें जुनें नांव चेनम्माप्पापट्टण असेंहि होतें नाईकांनीं किल्ला बांधण्यास परवानगी दिली होती म्हणून मद्रासचें नांव चेनम्माप्पापट्टण ठेविलें. कारण नाईकाच्या बापाचें नांव चेनम्माप्पा होतें. १६४१ सालीं कंपनीचें मुख्य ठाणें मद्रासला नेलें. फोर्टसेंट जार्ज किल्ल्याला पुष्कळ हल्ले सोसावे लागले. १६७२ त फ्रेंचांनीं ट्रिप्लिकेनला वेढा दिला. १६७४ त डच लोकांनीं त्यांनां हांकलून लाविलें. १६८७ त औरंगझेबानें किल्ल्याला शह दिला. १७३९ सालीं त्याभोंवती मराठे घिरट्या घालूं लागले. १७४६ सालीं लाबरदोनें यानें किल्ल्यावर मोर्चा लाविला. तेथील गव्हर्नर मार्स याला लाबरदोनेनें पांडिचेरींत नेलें. १७५२ पर्यंत कंपनीचें ठाणें फोर्टसेंट डेव्हिड येथें होतें. फोर्टसेंट जार्ज किल्ला फ्रेंचांच्या ताब्यांत १७४९ पर्यंत होता. पुढें एक्सलाशापेल येथील तहानें किल्ला इंग्रजानां परत मिळाला. पुन्हां इंग्रज व फ्रेंच यांमध्यें लढाई सुरू झाली. या एकंदर घालमेलींत किल्ल्याचा बराच भाग मोडकळीस आला होता. १७६३ साली त्याची कांही डागडुजी केली. १६९३ सालीं एगमोर, पुरसवाकम् भाग इंग्रजांनां मिळाला. एन्मोर १७०८ मध्यें व १७४२ त पुदुपाकम् व पेरांबूर हातीं आलें. किल्ल्याच्या नैॠत्येस सांप्रत जो शहराचा अत्युत्तम भाग आहे तेथें त्यावेळेस मोकळी जागा होती. व सध्यां ज्या ठिकाणीं सरकारी कोठी आहे तेथें त्यावेळेस साधारण यूरोपियन लोकांचीं घरें होतीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .