प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण १० वें
भारतीय समाजशास्त्र

भारतीय समाजशास्त्राचें महत्त्व - भारतीय समाजाचा अभ्यास इतका विविध आहे कीं, जगांतील कोणत्याहि राष्ट्राच्या जनतेचा अभ्यास इतका विविध आणि मनोरंजक नसेल. जगांतील एकपंचमांश जनता या देशांत आहे आणि या जनतेच्या आजच्या आयुष्यक्रमांत अत्यंत प्राचीन युगापासून निरनिराळ्या काळचे अवशेष शिल्लक राहिल्यामुळें आजच्या समाजाचें वर्णन देखील जगाच्या अत्यंत प्राचीन काळच्या कांही सामाजिक स्थितींचें व स्थित्यंतरांचे दर्शक आहे. जनतेच्या मोठ्या संख्येमुळें, विविधतेमुळें आणि इतिहास देतां येईल अशा दीर्घ कालामुळें या इतिहासांत अनेक समाजशास्त्रीय प्रश्न स्वाभाविकपणेंच येऊन जातात, तसेंच भारतीय जनतेच्या सामाजिक इतिहासामध्यें बौद्ध धर्मासारख्या जगद्वयापी धर्माचा इतिहास येतो व तो या सामाजिक इतिहासाचा अगदीं लहानसा भाग बनतो. अर्ध्या जगांकडून मोठ्या पूर्णत्वास पोंचलेली म्हणून जी बुद्धाची व्यक्ति समजली जाते ती हिंदूंच्या समाजांतील एक फलहीन चळवळ करणारी किंबहुना महासागराला रट्टे लगावण्याचें निष्फळ काम करणारी सामान्य व्यक्ति बनते व येथें करावयाच्या सामाजिक प्रयत्‍नाचें अधिक कठिण स्वरूप नजरेस येतें. एवढेंच नव्हे तर त्यामुळें अनेक तत्त्वज्ञानें तात्पुरतीं पत्करणारा, मग टाकून देणारा आणि पुन्हां आपलें पूर्वरूप धारण करणारा असा हा समाज दिसूं लागतो, व तो प्रयत्‍न परिणाम पाहून पुष्कळ समाजसुधारक गांगरून गेल्यासारखे दिसतात. समाजस्वरूप पालटण्यासाठीं होणार्‍या व झालेल्या प्रयत्‍नांची विविधता आणि त्या प्रयत्‍नांस आलेलें यशापयश यांच्या ज्ञानानें या समाजाच्या इतिहासास निराळाच रंग येतो. अनेक मानवी प्रयत्‍नांची निष्फलता ज्या समाजाच्या सुधारणे्संबंधाच्या प्रयत्‍नांत दिसून येते म्हणून ओरड झाली आहे त्या समाजाच्या अभ्यासामुळें दृष्ट होणारें समाजशास्त्र कांही तरी और असलें पाहिजे असें पुष्कळांस वाटतें, तर कित्येकांस असें वाटतें कीं मोठे समूह उत्पन्न करणें आणि ते देखील समाजामध्यें धार्मिक दुराभिमानी म्हणजे मतभेदाबद्दल दुसर्‍याचे गळे कापण्याची बुद्धि उत्पन्न होऊं न देतां होऊं न देणें यासारख्या क्रिया करणारा समाज मोठा यशस्वी होय व त्या समाजाचें व्यावहारिक समाजशास्त्र उच्च प्रतीचें असलें पाहिजे. या सर्व परस्परांहून भिन्न अशा दृष्टीमुळें भारतीय समाजशास्त्र विशेष महत्त्वाचें झालें आहे. या दोन्ही दृष्टी समाजाच्या अल्प अभ्यासाचा परिणाम आहेत यांत शंका नाहीं. सामाजिक प्रयत्‍नांची आणि त्यांस प्रेरक होणार्‍या तत्त्वज्ञानांची हिंदु समाज ही स्मशानभूमि होय असा देखावा जरी वरवर पहाणारांस दिसतो, तरी चांगल्या संशोधक दृष्टीनीं या समाजाच्या अत्यंत दीर्घ इतिहासाकडे पाहिलें असतां हा समाजाचा इतिहास अनेक सामाजिक फेरफारांनीं युक्त असा दिसतो, आणि त्यामुळें समाजांत फरक करण्याचे शास्त्रीय नियम कांही निराळे असावेत व ते आपणांस अजून कळले नाहींत असें म्हणावें लागेल असा भास होऊं लागतो. अर्थात या समाजाचा इतिहास अभ्यासातून सामाजिक स्थितिगतीच्या नियमांचें जें समाजशास्त्र त्यांतून निघेल तें जगाच्या सुधारणेस अत्यंत उपयोगी होईल अशी प्रस्तुत लेखकाची अपेक्षा आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .