प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

विभाग नववा : ई-अंशुमान

अंडें - अंडें म्हणजे पक्षी व इतर कित्येक प्रकारच्या प्राण्यांच्या स्त्रीजातीपासून उत्पन्न होणारा प्रजोत्पादक गोलक. यांत असलेल्या गर्भाची वाढ होऊन अखेर त्यापासूनच पिल्लें तयार होतात. पक्ष्यांचीं अंडीं सर्वांत मोठीं असतात. कारण त्यांत गर्भ असून शिवाय त्याच्या पोषणाकरितां लागणारें अन्न-द्रव्य अंड्यांतील पांढरा व पिवळा बलक असतें; व त्याभोंवतालीं कठिण कवचाच आवरण असतें. अंड्यांचा लहान मोठेपणा आंत असलेल्या अन्नद्रव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. आणि अंड्याचा आकार भोंवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हा अन्नांश जेव्हां अगदींच थोडा असतो तेव्हां अंडें बाहेर येतांच लवकर फुटतें व त्यांतील पिल्लूं जन्मास येतें. अंड्यांचीं संख्या निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळी असते; कांहीं पक्षी वर्षांतून एक वेळ एकच अंडें घालतात, तर कांहीं दर वेळीं वीसवीस अंडीं घालतात, आणि कांहीं जातीचे मासे लाखों अंडीं घालतात. पुष्कळ जातींच्या पक्ष्यांचीं अंडीं माणसें खातात. त्यांत कोंबडीं, बदकें इत्यादि पक्षी मुख्य होत. याशिवाय कित्येक जलचर प्राण्यांचीं अंडींहि खातात. कांसवाची अंडीं तर फारच आवडीचीं असतात, आणि गोड्या पाण्यांतील कांसवाच्या अंड्याचें तेल फार उपयुक्त असतें. साधारणपणें कोंबडीचें अंडें ८७५ ग्रेन वजनाचें असून त्याच्या कवचीचें वजन ९३.७ ग्रेन, आंतल्या पांढर्‍या बलकाचे वजन ५२९.८ ग्रेन आणि पिवळ्यां बलकाचें २५१.८ ग्रेन असतें. त्यांच्यांत प्राणीज पदार्थ शें. २ असतात, शें. १ खटस्फुरित (कॅल्शियम फॉस्फेट) व मग्नस्फुरित (मॅग्नेशियम फॉस्फेट); बाकीचा भाग खटकर्बिता (कॅल्शियम कार्बोनेट) चा असून मग्नकर्बिता (मॅग्नेशियम कार्बोनेट) चा थोडासा अंश असतो.

प क्ष्यां चीं अं डीं. - पक्ष्यांचीं अंडीं पाहिलीं असतां बाह्य परिस्थितीमुळें अंड्यांत किती फेरबदल होतो तें उत्तम प्रकारें कळतें. पक्षी आपलीं अंडीं आपल्या शरीरांतील उष्णता लावून उबवितात व तसें करताना आंतील पिल्लास धक्का लागूं नये म्हणून अंड्यावरचें कवच बरेंच कठिण असतें; आणि या कवचाचा रंग अंडीं खाणार्‍या प्राण्याच्या नजरेस तें पडणार नाहीं अशा प्रकारचा असतो. अंड्याचें बाह्य कवच खटकर्बिताचें (लाईम कार्बोनेटचें) मुख्यत: बनलेलें असतें. पण शिवाय त्यांत खटस्फुरित (लाईम फॉस्फेट) व मग्नगंधकित (मॅग्नेशिया) हि असतो. हें कवच तीन स्फटिकमय पापुद्य्रांचें बनलेलें असतें, व त्यांतून उभ्या सूक्ष्म नलिका असतात. त्यांच्या योगानें कवच छिद्रमय बनून त्यांतून आंतल्या प्राण्याच्या पोषणार्थ हवा जाऊं शकते. अगदीं बाहेरचा पापुद्रा चिनीमातीच्या भांड्याप्रमाणें चकचकींत असतो. कांहीं पक्ष्यांच्या अंड्यांचीं कवचें अगदीं पातळ व पारदर्शक असतात, तर उलटपक्षीं कांहींचीं फारच जाड असतात. सर्वांत जाड कवच हल्लीं नामशेष झालेल्या एपीओर्निसचें असतें.

बहुतेक प्राण्यांच्या अंड्यांचा आकार साधारणपणें कोंबडीच्या अंड्यासारखाच असतो. पण फ्लोव्हर जातीच्या पक्ष्यांचीं अंडीं फड्यानिवडुंगाच्या आकाराचीं, सँड-ग्रोझचीं नळकांड्यांसारखीं, घुबड व टिटमाइसचीं वाटोळ्या आकाराचीं आणि ग्रीबजचीं द्विशंक्वाकृति (बायकॉनिकल) असतात. रंगाच्या बाबतींत पक्ष्यांच्या अंड्यांत फारच विविधता असते. बर्‍याच जातींच्या अंड्यांनां सर्वत्र एक प्रकारचा रंग असतो. पण पुष्कळांवर रंगाच्या रेघा किंवा ठिबके किंवा दोन्ही एकत्र असतात. कित्येक पक्ष्यांच्या अंड्यांचा रंग प्रथम कांहीं दिवस अधिकाधिक भडक होत जातो व पुढें पुन्हां फिका पडत जातो. एकाहून अधिक अंडीं घालणार्‍या पक्ष्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या अंड्यालाच फक्त रंग असतो व बाकींचीं सांधीं असतात. आस्ट्रेलियांतील दलदलींत राहाणारी लावी पक्षीण (स्वाम्प क्वेल) जातीच्या पक्ष्यांच्या अंड्यांनां शुभ्र पांढरा व हिरवा यांच्या दरम्यानचे सर्व प्रकारचे रंग असतात. चितूर (पार्ट्रिज) नांवाच्या पक्ष्याच्या (एक जातीचा कवडा किंवा तित्तिर) अनेक पोटजाती असून त्यांच्या अंड्याचा रंग भौगोलिक निवासस्थानानुसार निरनिराळा असतो. म्हणजे ग्रीसमधील पोटजातीच्या अंड्यांचा रंग स्वच्छ साईसारखा असतो. ग्रीशियन बेटांमधील ठिपक्यांनीं युक्त असतो आणि पूर्वेकडील प्रदेशांत शाईसारखे काळे डाग फारच मोठ्या प्रमाणांत असतात. ग्विलिमॉट (समुद्रपक्षी) पक्ष्यांचीं अंडीं रंगाच्या बाबतींत सर्वांत अधिक विचित्र असतात. त्यांचा रंग व त्यांवरील डाग यासंबंधीं इतकी विविधता असते कीं, त्याविषयीं कारणमीमांसा कांहींच सांगतां येत नाहीं.

रं गा व रू न हो णा रा बो ध. - अंड्याच्या रंगाचा पक्ष्याच्या रंगाशीं काहीं एक संबंध नसतो; पण त्याचा भोंवतालच्या परिस्थितींशीं मात्र बराच प्रत्यक्ष संबंध असतो. पांढर्‍या रंगाचीं अंडीं प्राथमिक अवस्था दर्शवितात. सर्पांचीं अंडी पांढरीं असतात. बिळांत किंवा अंधार्‍या जागेंतील अंड्यांचा रंग पांढरा असणेंच जरूर असतें, कारण शुभ्रेतर रंगाचीं अंडीं अशा अंधार्‍या जागेंत दृष्टीस पडणें कठीण जाऊन पक्ष्यांच्या जाण्यायेण्यांत लाथाडून फुटून जावयाची उलटपक्षीं पांढर्‍या रंगाचीं अंडीं थोड्याशा उजेडानेहि दृष्टिगोचर होऊं शकतात. आतां अगदीं उघड्या जागेवर जीं अंडीं घातलेलीं असतात त्यांनां संरक्षणाच्या सोयीसाठीं विशेष प्रकारचा कांहीं तरी रंग असतो. म्हणजे भोंवतालच्या जमीनीच्या सारखाच रंग अंड्यांनां असतो. यासंबंधानें फ्लोव्हर पक्ष्याच्या अंड्यांचें उदाहरण विशेष पाहण्यासारखें आहे. तथापि बर्‍याचशा जातींचे पक्षी आपलीं अंडीं मुद्दाम तयार केलेल्या घरट्यांत घालतात व अशा अंडयांवर निरनिराळ्या रंगांच्या छटा असतात. पण त्या योगानें तीं अंडीं चोरणार्‍या प्राण्यांच्या सहज नजरेस येऊं शकतात.

अंड्याचा आकार अंड्यांच्या संख्येवर कांहीं अंशीं व कांहीं अंशीं जन्मास येणार्‍या पिल्लांच्या प्रथमावस्थेवर अवलंबून असतो. म्हणजे ज्या पक्ष्यांचीं पिल्लें जन्मकाळीं आंधळीं केशहीन, पंगू असतात त्यांचीं अंडीं आकारानें लहान असतात. उलट मोठ्या आकाराच्या अंड्यापासून जन्माला येणारीं पिल्लें जन्मत: केसांनीं पूर्ण आच्छादित व चलनवलनादि व्यापारक्षम असतात. शिवाय अंडीं पंखाखालीं घेऊन उबवावयाचीं असतात यामुळें जितकीं अंडीं आच्छादलीं जातील त्यांपेक्षां त्यांचीं संख्या अधिक असूं शकत नाहीं. तसेंच उष्ण प्रदेशांतील पक्षी त्याच जातीच्या थंड प्रदेशांतील पक्षांपेक्षा कमी अंडीं घालतात; आणि अप्रौढ पक्षी पूर्ण वयांत आलेल्या पक्षांपेक्षा संख्येनें अधिक पण आकारानें बारीक अंडीं घालतात.

बहुतेक पक्ष्यांचीं अंडीं आकार, रंगरूप व घटनेनें सारखींच असल्यामुळें तीं कोणा पक्षीविशेषाचीं आहेत हें ओळखणें फार कठीण असतें. मेगॅपोडसखेरीज सर्व पक्षी आपलीं अंडीं उबवितात. हा काळ कमींत कमी १३ दिवसांचा-पॅसेराइन पक्ष्यांचा-असतो.  र्‍हीआ व स्ट्रुथिओ पक्ष्यांचा ५।६ आठवडे असतो; आणि कॅसोवेरी वगैरें पक्ष्यांचा ८ आठवडे असतो.

स स्त न प्रा ण्यां चीं अं डीं. - सस्तन प्राण्यांमध्यें एचिडना व प्लेटिपस या प्राण्यांच्या अंड्यांत पिवळा बलक (योल्क) बराच असतो. एचिडनाचीं अंडी प्रत्येक वेळीं दोन असतात. व तीं चिमणीच्या अंड्याएवढीं मोठीं असतात. त्यांच्या कवचीचा रंग पांढरा असतो. प्लेटिपस पक्षी दोन ते चार अंडी दर वेळीं घालतो व तीं अंडीं एचिडनाच्या अंड्यांसारखींच असतात. मार्सुपियल पक्ष्यांचीं अंडीं वरील दोन्ही पक्षांपेक्षां लहान असतात; पण त्यांत पिंवळ्या बलकाचें प्रमाण अधिक असते.

स र प ट णा र्‍या प्रा ण्यां चीं अं डीं.- सर्व प्रकारच्या सरपटणार्‍या प्राण्यांच्या अंड्यांत पिंवळा बलक बराच पुष्कळ असतो, व त्याचें कवच चांगलें कठिण असतें. कांसव व मगर यांच्या अंड्यांचें घटकद्रव्य चुनखडीसारखें असतें. सर्व सरपटणार्‍या प्राण्यांचीं अंडीं पांढरी किंवा पिंवळट रंगाचीं असतात. व त्यांची संख्या पक्षांच्यापेक्षां नेहमीं जास्त असते. या प्राण्यांत अंडीं घालण्याच्या मध्यंतरीचा काल पक्षांच्या मानानें बराच मोठा असतो, व हे प्राणी आपलीं अंडीं उबवीत बसत नाहींत. मगरी दर वेळीं २० ते ३० पर्यंत अंडीं घालते. समुद्रांतील कांहीं जातीच्या कांसवीणी दर वेळेस दोनशेंपर्यंत अंडीं घालतात.

चोपई, सरडा, पाल इत्यादि जातींच्या प्राण्यांचीं अंडीं पांढरीं किंवा पिंवळट असतात, व त्यांपैकीं कांहींचीं कवचें मऊ असतात इतकेंच नव्हे तर आंतील प्राणी वाढत जातो त्याप्रमाणें तीं अंडींहि कांहीं अंशीं मोठीं होतात. या प्राण्यांच्या अंड्यांची संख्या बारापासून तीसपर्यंत असते. या प्राण्यांचा आणखी विशेष हा आहे कीं, कांहींचीं अंडीं बाहेर न येतां आंतच वाढतात व कधीं कधीं आंतच फुटून एकदम पिलें बाहेर येतात.

बहुतेक जातींचे सर्प अंडीं घालतात पण कांहीं स्थलचर सर्प एकदम पिलेंच प्रसवतात. यांच्या अंड्यांची संख्या बहुधा वीस ते तीस असते, पण कांहीं जाती शंभरपर्यंतहि अंडीं घालतात. सरपटणार्‍या जातींपैकीं बर्‍याचशा जातींचे प्राणी आपलीं अंडीं पुरून ठेवतात.

उ भ य च र प्रा ण्यां चीं अं डीं - उभयचर प्राण्यांच्या अंड्यांत आकार, संख्या वगैरे बाबतींत बरीच विविधता आढळते. यांपैकीं कांहीं प्राण्यांचीं अंडीं एक प्रकारच्या धाग्यांनीं एकमेकांशीं बद्ध झालेलीं असतात. अवयवहीन व पुच्छहीन अशा कांहीं जातींचे उभयचरप्राणी अंड्यांऐवजीं एकदम पिल्लेंच प्रसवतात. अशा पिलांची संख्या बहुधा थोडी असते. तथापि कांहींची संख्या पंधरापर्यंत असते व कांहींची पन्नासपर्यंतहि असते. संख्या जितकी जास्त त्या मानानें पिल्लें लहान व अशक्त असतात. बहुतेक उभयचर प्राण्यांची पिल्लें जन्मकाळीं बेडकीच्या पोरासारखीं (टॅडपोलसारखीं) असतात. तथापि बर्‍याच जातीचे प्राणी अशीं अंडीं घालतात कीं त्यांत अन्नद्रव्य बरेंच असतें. व तें पिलांनां आद्यावस्था उलटून जाईपर्यंत पुरतें व परिणत स्वरूप पावूनच पिलें अंड्यांतून बाहेर पडतात.

पुच्छहीन उभयचर प्राण्यांच्या (बारीक व मोठ्या जातीच्या बेडकांच्या) अंड्यांची संख्या व त्यांची पुढील व्यवस्था या बाबतींत फारच आश्चर्यकारक विविधता असते. मोठ्या जातीचे स्त्रीबेडूक दर वेळीं सात हजारपर्यंत अंडीं घालतात व हीं अंडीं दोन लांब माळांच्या स्वरूपांत बाहेर पडतात. उलटपक्षीं कांहीं जातींचे बेडूक फारच थोडीं घालतात व त्यांत अन्नमय द्रव्य इतकें असतें कीं, पिलांची आद्यवस्था अंड्यांतच पुरी होऊन नंतर तीं बाहेर पडतात. पुष्कळ बेडूक अंडीं पाण्याबाहेर व मोठ्या चमत्कारिक ठिकाणीं घालतात.

मा शां चीं अं डीं - माशांच्या अंड्यांत संख्या व आकार या दोन्हो बाबतींत फारच मोठीं विविधता असते. मऊ व कठिण दोन्ही प्रकारच्या हाडांच्या माशांत अंड्याऐवजी प्रत्यक्ष पिलें प्रसवणार्‍या कांहीं जाती आहेत.

माशांच्या अंडीं घालण्याच्या संख्येंत फार कमजास्तपणा असतो. कांहीं जाती फारच थोडीं व कांहीं पुष्कळ अंडीं घालतात. पण सर्व जातींत असा साधारण नियम दिसतो कीं, माशाचें वजन व वय जितकें अधिक तितकी अंड्यांची संख्या अधिक असते. उदाहरणार्थ सालमन जातीचा एक पौंड वजनाचा मासा १००० अंडीं घालतो आणि पंधरा पौंड वजनाचा सालमन मासा १५००० अंडीं घालतो. स्टर्जेऑन मासा सुमारें ७०,००,००० अंडीं घालतो. हेरिंग मासा ५०००० घालतो, टर्बाट मासा १,४३,११,००० सींलमासा १,३४,००० आणि पर्चमासा २,८०,००० अंडीं घालतो. आणि थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अंडीं नाश पावण्याचें भय जितकें अधिक तितकी अंड्यांची संख्या अधिक असते. माशांच्या निकृष्ट जातींपैकीं लॅम्प्रे नांवाच्या माशांची अंडीं फारच लहान असतात आणि हॅग-फिश जातीचीं अंडीं बरींच मोठीं व नळकंड्याच्या आकाराचीं (सिलिंड्रिकल) व एकमेकाला बारीक हुकानीं जोडलेलीं असतात.

मृ दु का य गो ग ल गा य व गै रे प्रा ण्यां चीं अं डीं- मृदुशरीरी प्राणी, कवचधारी (खेंकड यासारखे) प्राणी, व किडे यांच्यामध्यें पुष्कळ निरनिराळ्या प्रकारचीं अंडीं असतात. त्यांत विशेष विविधता मृदुशरीरी प्राण्यांच्या अंड्यांत असते. मौलिपाद (सेफालोपोडा) प्राण्यांचीं अंडीं विशेष पाहण्यासारखीं असतात. स्क्विड जातीच्या प्राण्यांचीं अंडीं नळीच्या आकाराच्या वेष्टनांत बसलेलीं असून अशीं वेष्टनें कित्येक शेंकडे असतात. एका वेष्टनांत २५० अंडीं असून अशीं अनेक वेष्टनें मिळून एक झुबका बनलेला असतो. व त्यांत एकंदर सर्व मिळून अंडीं ४०००० पर्यंत असतात. याच्याविरुद्ध प्रकार कटलफिश नांवाच्या प्राण्याचा. म्हणजे या प्राण्याचीं अंडीं प्रत्येक स्वतंत्र असून प्रत्येकाचें वेष्टन निराळेंच असतें. व तीं सर्व मिळून त्यांचा द्राक्षांच्या घडाप्रमाणें एका दांड्याला जोडून घड बनलेला असतो. अष्टपाद (ऑक्टोपस) प्राण्यांचीं अंडीं फारच लहान असून तीं सर्व एका देंठाला चिकटून त्यांचा एक गोळा बनलेला असतो.

एकशकलमय (यूनिव्हाल्व्ह) मृदुकाय प्राण्यांचीं अंडींहि वरच्याप्रमाणें विविध प्रकारचीं असतात कवचाच्या गोगलगाईचीं अंडीं मोठीं असून त्यांचें बाह्य कवच इतकें लवचिक असतें कीं, अंडें दगडावर आपटल्यास त्याला कित्येक इंच उंच उलट उशी येते. दुसर्‍या एका जातीच्या गोगलगाईचीं(बुलिमस) अंडीं खबुतराच्या अंड्यांहून मोठीं असतात. शंखं वगैरे (व्हेल्क) : प्राण्यांचीं अंडीं वेष्टनांत बसलेलीं असून अशीं अनेक शेकडों अंडीं एकत्र मिळून त्यांचा वाटोळा गोळा बनलेला असतो. जेव्हां हीं अंडीं फुटून पिलें बाहेर पडतात त्या वेळीं त्यांचा आपसांत जीवनार्थ कलह सुरू होतो. आणि त्यांपैकीं जीं पिलें सर्वांत अधिक शक्तिमान असतील तेवढींच इतरांनां खाऊन टाकून स्वत: जिवंत राहतात.

मृदुकाय प्राण्यांतहि इतर प्राणीवर्गांतील सामान्य नियम आढळतो; तो हा कीं, ज्या प्राण्याचीं अंडीं नष्ट होण्याचें भय अधिक तितकीं तो प्राणी अंडीं अधिक घालतो. उदाहरणार्थ ऑइस्टर नांवाचा प्राणी दरसाल सुमारें ६,००,००,००० अंडीं घालतो. उलट ज्या प्राण्याचीं अंडीं नाश पावण्याचा संभव कमी त्याचीं अंडीं मोठालीं व संख्येनें कमी असतात. उदाहरणार्थ बुकिमस प्राणी होय.

क व च धा री प्रा णी (क्रस्टासिआ) - या जातीच्या प्राण्यांचीं अंडी स्त्रीशरीराच्या खालच्या बाजूला असलेल्या पोकळ भागांत राहतात. व मादी तीं सदोदीत आपल्याबरोबर वागवते. स्क्विलास वगैरे जातीचे प्राणी आपली अंडीं कचर्‍याच्या ढिगांत घालतात. त्यांत पुष्कळ जातीच्या प्राण्यांची अंडीं लहान असतात व त्यांतून निघणारी पिलें, दिसण्यांत प्रथम आपल्या आईबापापाहून फार भिन्न स्वरूपाचीं असतात. खोल समुद्रांत किंवा गोड्या पाण्यांत राहणार्‍या या जातींच्या प्राण्यांचीं अंडीं मोठीं असतात आणि त्यांतून निघणारी पिलें प्रथमपासूनच बहुतेक आईबापासारखींच असतात.

की ट क (इन्सेक्ट्स) कीटकांचीं अंडीं अगदीं बारीक असतात खरीं, तरी त्यांत विविधता पुष्कळ असते. असल्या अंडयांचे पुंजके जमीनीवर किंवा झाडाच्या पानांवर किंवा पाण्यांत घातलेले पहावयास मिळतात. क्यूलेक्स या वर्गांत मोडणारे चिलट, डांस वगैरे प्राणी पाण्यावर अंडीं घालतात. त्यांचा आकार नळकांड्यासारखा असून त्यांचे पुंजके पाण्यावर तरंगत असतात.

अपृष्ठवंशी प्राण्यांपैकीं इतर बहुतेक प्राणी आपलीं अंडी पाण्यावर किंवा पाणथळ जागेंत घालतात.

अपृष्ठवंशी प्राण्यांपैकीं कांहीं जातीतील व्यक्ति दोन प्रकारचीं अंडीं घालतात. डॅफनिया नांवाचा एक कवचधारी प्राणी उन्हाळ्यांत एक प्रकारचीं व पुढें हिंवाळ्यांत निराळ्या प्रकारचीं अंडीं घालतो. त्यांत उन्हाळ्यांतल्यापेक्षां हिंवाळ्यांतील अंडीं आकारानें मोठीं, रंगानें अधिक काळीं, अधिक जाड कवचीचीं असतात. हीं अंडीं दहा वर्षेपर्यंतहि टिकतात.

खा ण्या चीं अं डीं - मांसाचे फायदे आपल्या पाळीव प्राण्यांच्या अंड्यांमध्यें जितके पूर्णपणें एकत्र झालेले असतात, तितके दुसर्‍या कोणत्याच पदार्थांत झालेले नसतात. अंड्यांतील गर्भस्थ पिवळा व त्यासभोंवतालचा पांढरा भाग यांच्यामध्यें मुख्यत्वें अल्ब्युमेन गर्भस्थ पदार्थच असतात. पिवळ्यामध्यें केसीन व अब्ल्युमेन यांचें मिश्रण असतें. पांढर्‍यामध्यें गंधकयुक्त द्रवरूप अल्ब्युमेन असतो व अल्ब्युमेन गर्भस्थ पदार्थ असून त्यांतहि पुष्कळ गंधक असतो. पिवळ्या भागापेक्षां पांढर्‍यामध्यें जलांश अधिक असतो आणि पांढर्‍यापेक्षां पिवळ्यामध्यें चरबी व अल्ब्यूमेन गर्भस्थ पदार्थ पुष्कळ असतात. तसेचं पिवळ्या भागाच्या तेलांत ओलीन पुष्कळ असतो. अंडें कच्चें खाल्लें
असतां त्यांतील अल्ब्युमेनचा द्रव होण्यापूर्वी तो अंशत: घट्टच होतो. यासाठीं अंडें थोडें उकळलेलें असलें म्हणजे तें ताबडतोब पचनास योग्य होतें. कच्च्या अंड्यांतील सारक गुण अंडें उकळल्यानें पालटतो. यासाठीं बद्धकोष्ठाच्या माणसानें उकळलेलें अंडें न खातां कच्चेंच खाणें चांगलें.

अंड्यावरील कवचीला अनेक सूक्ष्म छिद्रें असतात. त्यांतून हवा व ओलसरपणा आंत शिरून अंडीं नासतात. तसेंच लांबच्या प्रवासांत आदळआपट झाल्यामुळें किंवा जोरानें हिसकल्यामुळें अंड्यांतील पांढरा भाग व बिल यांचीं सूक्ष्मतंतूंचीं बंधनें तुटून ते पदार्थ एकमेकांत मिसळतात; व अंडें नासूं लागतें. यासाठीं अंडीं चांगलीं टिकविण्याकरितां त्यांनां वरून तेल किंवा चरबी माखून ठेवतात अगर सुक्या कोंड्यांत किंवा लांकडाच्या भुशांत ठेवतात. बारीक टोंक खालीं करून अंडीं ठेवलीं म्हणजे बिल अल्ब्युमेनमध्यें लोंबकळत राहतो व त्यानें लपेटला जातो. इतर रितीनें ठरविल्यास बिल कवचीला चिकटून पृथक्करण सुरू होतें व अंडें नासतें. अंडींराखून ठेवण्याची अगदीं साधीं रीत म्हणजे तीं एक मिनिटभर उकळावीं. म्हणजे कवचीला लागलेला अल्ब्युमेन घन होऊन आंतील भागाचें रक्षण होतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .