प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आतपमूर्च्छा (''सन्स्ट्रोक'')  - कडक ऊन किंवा अत्यंत उष्ण हवेचा परिणाम शरीरांतील मज्जातंतूवर प्रथम होऊन त्यामुळें हृदय, श्वसनेंद्रियें यांची क्रिया बिघडते व ताप आणि मूर्छा येते. हें या रोगाचें मुख्य स्वरूप होय. उष्ण हवा असून तींत सर्दपणाची भर पडली म्हणजे हवा अगदीं कुंद होऊन कित्येक माणसांनां आपल्या देशांत अशी लूक लागते. थंड देशातहि मध्येंच जेव्हां कडक ऊन पडतें तेव्हां येथेंहि कांहीं माणसांनां अशी मूर्छा येते. सैन्यांतील पलटणींतून लढाईच्या वेळीं काम पडल्यामुळें किंवा एरवी उन्हाळयांत अशी मूर्छा आल्याचीं उदाहरणें पूर्वीं फार असत, व त्या पासून मृत्यूहि घडत असत. परंतु शिपायांची शरीरप्रकृति, पोषाख व सैन्याची सोयींवार काळवेळ पाहून हालचाल करणें व त्यास आराम होईल अशी व्यवस्था ठेवणें, या बाबींकडे अधिक लक्ष पुरविल्यामुळें तेथील मृत्युसंख्येचें प्रमाण पुष्कळ कमी झालें आहे. अशी आतपमूर्च्छा येण्यास पूर्वीपासून अनकूल स्थिति पुढील कारणांमुळें उत्पन्न होतेः-

रो गां ची का र णें - मोठें दुखणें येऊन शरीर खंगणें; मज्जातंतु बिघडणें; काळजी, दगदग, अतिश्रम व खाण्यापिण्यांत अनियमितपणा; व मुख्यतः दारूबाजीपासून खंगलेलें शरीर; तसेंच स्वच्छतेचा अभाव असल्यामुळें त्वचेची क्रिया सुरळीत न चालणें; हृदय व फुफ्फुसें याची क्रिया नीट चालण्यास अडचण पडेल इतके कपडे, पट्टे व कमरबंद घट्ट वापरणें; गलिच्छ हवेंत सदा रहाणें; इत्यादि. त्याचप्रमाणें अनुकूल स्थिति असून मनुष्य दमला असतां त्यास कडक उन्हांत चालण्याचें काम पडण्यानें लूक लागतें यात नवल नाही. पण बिऱ्हाडांतून अगर बराकींतून अतिगर्दी व घाण माजली असतां, अगर आगबोटविरहि अशी परिस्थिति असल्यास सावलींतहि कांहीं जणांनां आतपमूर्च्छा येते. एंजिनांत कोळसे घालणारे लोक, परीट वगैरे भट्टीजवळ काम करणारी माणसें, यूरोपांतून नुकते आलेले यूरोपियन लोक यानां त्यांतलें त्यांत हा रोग विशेष होतो.

मू र्च्छे चे भे द. - शरीर तापलें असतां त्याची स्वाभाविकपणें मर्यादेबाहेर उष्णता वाढूं नये, अगर कडक थंडीमध्यें शरीर थंड न होतां त्याचें स्वाभाविक उष्णतामान कायम रहावें, अशी आपोआप व्यवस्था राहाण्यासारखीं निसर्गाची योजना आहे. तशीच योजना रुधिराभिसरण व श्वसनक्रिया आपोआप सुरळीत चालण्यासाठींहि आहे. पण उन्हानें अगर उष्णतेनें त्यात बिघाड झाल्यामुळें रोगलक्षणें उद्भवतात व त्या लक्षणानुसार पुढील तीन प्रकारचे आतपमूर्च्छेचे भेद आढळतात.

मूर्च्छाप्रधानभेदः - पराकाष्ठेची ग्लानि येऊन मूर्च्छा फार जोराची येते, अगर ती येण्याची प्रवृत्ति वरचेवर होते. त्या बरोबर ओकारी, घेरी चक्कर, प्रथम घाबरणें व नंतर गुंगी यणें, व त्यानंतर मूर्च्छा; मूर्च्छेंमध्यें चेहरा पांढरा फटफटीत होणें, शरीर थंड, नाडी अशक्त व जलद, धापा टाकल्या प्रमाणें श्वास डोळयाच्या बाहुल्या बारीक होणें हें होतें व नंतर योग्य इलाज न होतील तर मृत्यु येतो.

श्वा स रो ध प्र धा न भे दः -  ओकारी, चक्कर, घेरी, हीं लक्षणें कधीं होतात तर पुष्कळ वेळां होतहि नाहींत आणि रोग्यास एकदम अर्धांगाचा झटका आल्याप्रमाणें बळकट बेशुद्धि येते, तींत चेहरा व डोळे लाल दिसतात, नाडी जलद चालते, घोरण्याप्रमाणें श्वसनक्रिया चालते, स्पर्शज्ञान नष्ट होत व कधींतर झटकेहि येतात व एकदम मृत्यूहि पुष्कळदां येतो, तथापि हाहि रोग उपचार केल्यानें सुसाध्य आहे.

म हा ज्व र प्र धा न भे दः - या भेदांत शरीराचें उष्णतामान बेसुमार वाढून ताप १०८ ते ११० डिग्रीपर्यंत चढतो. त्याबरोबर तृषा, तलखी, जदल नाडी, अंग ठणकणें, मस्तकशूल, ओकारी, मळमळ, श्वास, दाह, हीं लक्षणें जरूर होतात. अशी स्थिति एकदोन दिवस राहिल्यानंतर मृत्यु तरी येतो किंवा रोगाचें श्वासरोधमूर्च्छेमध्यें रुपांतर होतें. आरंभीच उपाय सुरू ठेविले तर या प्रकारची मूर्च्छाहि बरी होते. शिवाय इतरहि कांहीं मिश्र प्रकरच्या आतपमूर्च्छा पाहण्यांत येतात.

या रोगामुळें मृत झालेल्यांची तपासणी केल्यानंतर असें आढळलें आहे कीं, मेंदूमध्यें रक्ताचा बराचसा अभाव दिसतो, फुफ्फुसांत रक्ताधिक्य होतें, हृदय व शरीरांतील इतर स्नायू मऊ व दुर्बल होतात, रक्त काळसर व न गोंठणारें होतें, रक्तपेशींचा आकार बदलतो. उन्हाची लूक लागल्याचे परिणाम रोगी बरा झाल्यावर अल्पशेषरूपानें राहतात व प्रकृतीवर व मज्जातंतूवर कायमचा परिणाम घडतो. मस्तिष्कावरदाहामुळें असो किंवा दुसऱ्या कारणामुळें असो मस्तकशूल, अपस्माराप्रमाणें झटके, चिडखोरपणा, स्वभावांत पालट हीं लक्षणें होतात. त्यानंतर उन्हांत हिंडणें, विस्तवाजवळ बसणें, उष्ण हवा किंवा उत्तेजक पेयें पिणें हीं पूर्वीप्रमाणें पुढें सहन होत नाहींत. असें अनुभवास येतें. या रोगांत शेकडा ४०-५० रोगी दगावतात असें आंकडयांवरून निघतें.

प्र ति बं ध क उ पा य. - ज्यांनां उन्हांत काम करावें लागतें, त्यांनीं आपले कपडे सैल शिववून ते वापरावें, मस्तकास ऊन न लागेल असें जाड शिरस्त्राण घालावें; नुसती टोपी घालून कडक उन्हांतून हिंडूं नये. मद्यपान व इतर शारीरिक अत्याचार व अनियममितपणा यांपासून अलिप्त असावें, थोड थोडें थंड पाणी वरचेवर प्यावें, उन्हाळयांत रात्रीं उघडया हवेंत निजावें.

आ त प मू र्च्छे स उ प चा र – हे ज्या प्रकारची मूर्च्छा असेल, त्या अनुरोधानें करावे लागतात. पहिल्या प्रथम रोग्यास उचलून थंडगार अशा सावलीच्या ठिकाणीं नेऊन निजवावें. असल्या माणसाला प्रथम हृदयक्रिय बंद पडून मरण येण्याची अगर निदान अंतःक्षोम होऊन मेंदूस धक्का बसून बेशुद्धि येण्याची धास्ती असते. ती टळण्यासाठीं त्याला अगदीं एकसारकें निजवून ठेवून पूर्ण विश्रांति द्यावी व पोटांत अमोनिया, व ब्राडीमिश्रित उत्तेजक औषधें देऊन हातपाय चोळावे व ऊब येण्यासाठी ते शेकावेत; पण रोगी जर एक दम बेशुद्ध पडला असेल किंवा ज्वरातिशयानें घाबरा झाला असेल तर नानातऱ्हेनें त्यास शीत उपचार करणें हाच श्रेयस्कर उपाय होय. त्यासाठीं मस्तकावर व अंगावर थंड पाणी शिंपडावें अगर धार धरावी, अंगास बर्फ चोळावे किंवा गुदद्वरांवाटे बर्फमय पाण्याचा बस्ति देऊन गुदांतील उष्णता मान १०२ होईपर्यंत हे उपाय चालूं ठेवावे. इतक्यावर उष्णतामान येऊन ठेपलें म्हणजें पुढें तें आपोआप नेहमींच्या उष्णतेपर्यंत येतें. बस्तीखेरीज इतर उपायांनींह उष्णतामान बरेंच कमी होतें, व मंद झालेली श्वसनक्रिया जोरानें चालू लागतें. छातीस अगर मानेच्या मागें टरपेंटाईन तेल चोळणें किंवा मोहरी वाटून ती फडक्यावर पसरून लावणें होहि उपाय वरीव उपचाराबरोबर करण्यालायक आहेत.

हे उपाय करूनहि ज्वर मात्र कमी झाला आहे, पण शुद्धि येत नाहीं, अशी स्थिति असल्यास डोक्यावरील केस काढून त्या जागीं डागल्याने उपयोग होतो असें म्हणतात. वरील उपायायनें ज्वर हटत नसेल तर एखादी शीर तोडून काहीं रक्त वाहूं द्यावें. बाहूंतील शीर तोडणे विशेष सोइस्कर पडतें. या उपायाचा अशावेळीं अवलंब अवश्य करून पहावा. शिरेंतून रक्तच वहात नाहीं, असें आढळून आल्यास त्या शिरेवाटें लवणाबु रक्तामध्यें घालावें. यानंतर रोगी सावध झाल्यावर त्यास थंड हवेच्या ठिकाणीं नेल्यानें फार उत्तम फायदा होंतो. पोटात पोटॅशियम आयोडाईड हें औषध देणें चांगलें यानें आणखी दुष्परिणाम फारसे होण्याचें टळतें. जेथे जेथें या रोगापासून अधूपणा अथवा दुःख झालेलें नजरेस येईल तेथे तेथें मोहरी, टरपेटाईंन सारखीं औषधें बाह्योपचारासाठीं योजावींत.

याशिवाय ज्या विशिष्ट प्रकारचा आतपमूर्च्छा रोग झाला असेल, त्यावर विशेष उपयुक्त असेहि इलाज करावे. उदाहरणार्थ, स्ट्रिकनिया ( कुचल्याचें सत्त्व ) हें औषध त्वचेखालीं जरूरीप्रमाणें टोंचल्यानें मागाहून हृदयव्यापारांत जो दुबळेपणा कदाचित रहातो, तो नाहींसा होऊन त्यापासून श्वसन क्रियाहि चागली चालते.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .