प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  

साहित्यशास्त्र— फार प्राचीन काळींहि भरतखंडांत शास्त्र या दृष्टीनें साहित्य किंवा अलंकारशास्त्राची प्रगति झाली होती. आपणांपुढें या शास्त्रावरचे अगदीं प्राचीन ग्रंथ नाहींत; तरी पुढील काळांतील अलंकारशास्त्राच्या ग्रंथांतून अशा प्राचीन ग्रंथांचे उल्लेख वारंवार आढळतात. एखादा शास्त्रीय ग्रंथ पुढील काळांत प्रसिद्धीस आला असतां त्याच्या मागील ग्रंथ बहुधां अननुकरणीय असे ठरतात. तरी पण त्यांच्याविषयीं आदरानें उल्लेख येत असतातच. तेव्हां असे अगदीं जुने ग्रंथ परंपरागत आपल्याकडे न येणें साहजिक आहे. अलंकारशास्त्रावरील जुन्या ग्रंथांची हीच स्थिति दिसते.

भारतीय नाट्यशास्त्रांत अलंकाराचा जुना नमुना पाहण्यास सांपडतो अशी सामान्य समजूत झाली आहे पण वास्तविक त्यापुढील काळांतच काव्यशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाले.

भारतीय अलंकारशास्त्रांत व सौंदर्यशास्त्रांत महत्त्वाचा असा जो 'रस'सिद्धांत तो प्रथम नाट्यशास्त्रांत उद्भूत झाला. रसाचा शब्दश: अर्थ चव असा आहे. ज्याप्रमाणें कांहीं खाण्याचे पदार्थ गोड, कांहीं आंबट, कांहीं कडू अशा चवी देतात त्याप्रमाणें रंगभूमीवर दाखविण्यांत येणारे रस (मनाचे भाव) श्रोत्यांच्या मनांत विशिष्ट भाव उत्पन्न करतात असा समज आहे. भरतमुनीनें पुढील आठ रस सांगितले आहेत: शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भूत.

नाट्यशास्त्रीय रससिद्धांतांत जसें सौंदर्यशास्त्रीय तत्त्व दृष्टीस पडतें त्याचप्रमाणें तत्सदृश भावसिद्धांतांत मानसशास्त्राचें अस्तित्व निःसंशय प्रगट होतें. शिवाय नाट्यशास्त्रांत इतिवृत्ताचें लांबलचक व कंटाळवाणें पण सत्य आणि स्पष्ट वर्गीकरण, नायक आणि नायिका यांचे प्रकार, यांवरून वस्तुस्थिति आणि सिद्धांत यांच्या शोधाकडे दुर्लक्ष करून वर्गीकरणाकडेच बेसुमार लक्ष दिसून येतें. हें विधान अलंकारशास्त्रालाहि लागू पडेल.

अलंकारावरील प्रकरणांत इतर अलंकारशास्त्रीय ग्रंथांतल्याप्रमाणें भरतमुनि फारशा गोष्टी सांगत नाहींत. भामह, उद्भट, दंडी वगैरेंच्याइतकेहि अलंकार तो देत बसत नाहीं. भामह, दंडी आणि वामन या तिघांचा मिळून प्राचीन साहित्यशास्त्राचा संप्रदाय बनला आहे. सर्वांत प्राचीन म्हणजे भामह होय, पण त्याचा काळ निश्चित करतां येत नाही. तथापि पुढील साहित्यशास्त्रांनीं त्याचा मोठ्या बहुमानानें वारंवार उल्लेख केलेला आहे. भामहाचा काव्यालंकार श्लोकबद्ध असून त्याच्या सहा प्रकरणांत काव्यांग, अलंकार, दोष, काव्य, नीति आणि व्याकरणात्मक शुद्धता या विषयांचें विवरण केलें आहे. प्रस्तावनेंतच त्यानें, केवळ अलंकार जाणण्यानें कोणी कवि होतो असा समज खोडून काढला असून काव्यप्रतिभेचें महत्त्व प्रतिपादिलें आहे.

सातव्या शतकांत प्रख्यात कवि दंडी यानें आपला काव्यादर्श ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ छंदोबद्ध असून त्यांत कवीनें आपण स्वतः रचिलेलीं अनेक उदाहरणें देऊन काव्यसिद्धांताची फोड केली आहे. हा ग्रंथ दंडीमागून येणार्या शास्त्रज्ञांस चांगला उपयोगी पडलेला दिसतो. टीकाकार आणि मार्मिक वाचक यांनां कशा प्रकारचें काव्य लागे याची कल्पना काव्यादर्शावरून चांगली येते. प्रत्येक कवितेला अंग व अलंकार असतात असें दंडाचें मत पडतें अंग म्हणजे अर्थानुरोधानें शब्दांचीं बनलेलीं वाक्यें होत. हें अंग किंवा शब्दानुक्रम गद्यांत, पद्यांत किंवा गद्यपद्यांत असेल; पद्य असेल तर त्यांत अनेक वृत्तें येतील; वृत्तांत मात्रा किती असाव्या व त्या कशा मोजाव्या हें साहित्यशास्त्रावरून कळेल. तथापि कवितेचें प्रधान अंग वृत्त नव्हे. काव्य हें पद्यांतल्याप्रमाणें गद्यांत किंवा गद्यपद्यांतहि चांगलें रचतां येतें असा भारतीयांचा सर्वत्र समज होऊन गेला आहे. केवळ कविता करण्याला कोणीहि भारतीय काव्या म्हणणार नाहीं. एखादा मोठा पांडित्यदर्शन ग्रंथ पद्यांत लिहिला म्हणून त्याचें वर्गीकरण करतांना बोधपर काव्यांत त्याचा समावेश होऊं शकणार नाहीं. व्याकरण, कोश, वैद्यक किंवा ज्योतिषावरील ग्रंथ बहुधां छंदोबद्ध असतात. पण त्यांनां कोणी काव्यग्रंथ मानीत नाहींत. तथापि त्यांतील विषय लक्षांत ठेवण्यास सोपें जावें म्हणून गद्यांत न लिहितां ते पद्यांत लिहिले गेले आहेत. उदाहरणार्थ, वराहमिहिराची बृहत्संहिता. याच्या उलट जर एखादी गद्य कादंबरी अलंकारशास्त्राला धरून लिहिली असेल तर एखाद्या महाकाव्याप्रमाणें याला काव्य या पंक्तींत बसण्याचा हक्क राहील.

त्याचप्रमाणें एखादें काव्य संस्कृतांतल्याप्रमाणें प्राकृतांत किंवा अपभ्रंश भाषेतहि असूं शकेल. भारतीय कवींनीं संस्कृतांतल्याप्रमाणें प्राकृतांतहि काव्यरचना केलेली आहे.

यापुढें दंडी अलंकारयुक्त महाकाव्य रचण्यासंबंधीं सिद्धांत देतो. प्रथम नांदीपासून सुरवात करून नंतर काव्य कोणाला अर्पण केले आहे तें सांगून काव्यविषयहि सुचवावा. काव्यविषय एखादी पौराणिक कथा, गोष्ट किंवा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग घेऊन त्यांत जीविताचें चार हेतू सिद्धीस गेलेले दाखवावेंत. नायक उदार व बुद्धिमान असावा, विशिष्ट नगर, समुद्र, पर्वत, ॠतू, सूर्य आणि चंद्र यांचे उदयकाल, उद्यानांतील क्रीडा, प्रेमप्रसंग, भोजनसमारंभ, विवाह, पुत्रजन्म, राजसभा, वकीलाती, मोहिमा, लढाया, विजय वगैरे वर्णनें देऊन असें काव्य खुलवावयाचें असतें. सूक्ष्म व व्यापक वर्णनें देऊन आणि रस व त्याला जुळता असा भाव वठवून हें महाकाव्य तयार करावयाचें असतें. त्याची मांडणी कानाला गोड लागणार्या कवितांत करून त्यांचे कांहीं आटपशीर सर्ग तयार करावेत.

दंडी निरनिराळ्या काव्यपद्धतीचें वर्णन करतो. उदाहरणार्थ विदर्भपद्धति आणि गौडपद्धति. विदर्भपद्धतींत लडिवाळपणा, स्पष्टपणा, संथपणा मोहकता आणि नाजुकपणा आढळून येतो तर गौडपद्धतींत संदिग्धता, शब्दावडंबर, बेसुमार अतिशयोक्ति व अतिशय लांबलचक समास आढळतात.

आपल्या ग्रंथाचा केवळ एकतृतीयांश भाग दंडीनें काव्यांग विवेचनाकरितां खर्च केला आहे. बाकीचा सर्व अलंकारांच्या कामीं लाविला आहे. अलंकाराचें शब्द व अर्थ या दृष्टीनें वर्ग पाडले आहेत. व ३२ प्रकारच्या उपमा, तसेंच अनके रुपकेंहि सांगितलीं आहेत. मधून मधून आक्षेपहि दिले आहेत. सर्वांत उत्तम अलंकार म्हणून अतिशयोक्ती वर्णन केली आहे. श्लेष तर फार लोकप्रिय दिसतो.

अलंकारांत निरनिराळीं यमकें येतात. यमकें तयार करतांना शब्दांच्या निरनिराळ्या कोट्या, पुनरुक्ति, श्लेष वगैरे फार दृष्टीस पडतात.

वामन (सुमारें इ. स. ८००) हा काश्मिरच्या जयापीड राजाच्या दरबारीं कवि असून त्यानें काव्याच्या महत्त्वाच्या स्वरूपाविषयीं विवेचन केलें आहे. तो म्हणतो कीं, काव्याचा आत्मा वाणीच्या विशिष्ट योजनांच्या मिलाफांत पहावयाचा असतो. त्याच्या 'काव्यालंकारवृत्ति' नांवाच्या ग्रंथांत सौंदर्यात्मक सिद्धांतयुक्त, व्याकरणशास्त्रदृष्ट्या व व्यावहारिक अशा प्रकारांनीं विवेचन आलें आहे.

उद्भट हा वामनाचा समकालीन व प्रतिस्पर्धी होता. आपल्या अलंकारसारसंग्रह नामक ग्रंथांत उद्भट सांगतो कीं, काव्यात्मा हा रसांत वास करतो. त्यानें 'कुमारसंभव' नांवाचें एक  महाकाव्य लिहिलें. ध्वनिकारिकांनां उद्भटाचा ग्रंथ आधारभूत झालेला दिसतो. कोणी अज्ञात लेखकानें साहित्यशास्त्रासबंधीं ज्या १२० सुप्रसिद्ध कारिका लिहिल्या त्यांनांच ध्वनिकारिका असें नांव असून त्यांवर काश्मीरच्या आनंदवर्धनानें (सुमारें इ. स. ८५०) ध्वन्यालोक नांवाचें उत्कृष्ट भाष्य लिहिलें आहे. हें त्याचें भाष्य साहित्यावरील एक स्वतंत्र ग्रंथच म्हणतां येईल. आनंदवर्धन कवितांचे तीन वर्ग पाडतो: (१) खरें काव्य:- यांती ध्वनि हीच प्रधान गोष्ट असते. (२) दुय्यम दर्जाचें काव्य-यांत ध्वनीचा दुय्यम दर्जा असतो. (३) खालच्या दर्जाचें काव्य-यांत भाषासौंदर्याकडे विशेष लक्ष पोहोंचविलेलें असतें.

यानंतर लौकरच कुंतकाचा 'वक्रोक्तिजीवित' हा ग्रंथ लिहिला गेला. त्यामध्यें वक्रोक्तीसारख्या भाषालंकारांनां विशेष महत्त्व दिलेलें आहे.

१० व्या शतकाच्या अंती व ११ व्या शतकाच्या आरंभीं अभिनवगुप्तानें आपला 'ध्वन्यालोक-लोचन' हा ध्वन्यालोकावर मोठें भाष्य म्हणून ग्रंथ लिहिला. महिमाभट्टाच्या 'व्यक्तिविवेक' ग्रंथांत आनंदवर्धन आणि कृंतक यांच्यावर सडकून टीका केली आहे.

जरा मागाहून आलेल्या रूद्रटानें आपल्या काव्यालंकारांत अव्यक्त सिद्धांताला मान दिलेला दिसत नाहीं.

साहित्यशास्त्राच्या सर्वोत्कृष्ठ ग्रंथापैकीं एक म्हणजे ११ व्या शतकांत मम्मट नांवाच्या काश्मिरी ब्राह्मणानें लिहिलेला 'काव्यप्रकाश' हा होय. मम्मट मात्र अव्यक्ताला महत्त्व देतो. त्या शतकांत काश्मीरच्या क्षेमेंद्राने 'औचित्यालंकार' हा चर्चात्मक ग्रंथ व 'कविकंठाभरण' हा काव्यसिद्धांताचें विवेचन करणारा ग्रंथ लिहिला.

दुसरा मोठा ग्रंथ म्हणजे धारच्या भोजराजाचा 'सरस्वतीकंठाभरण' हा होय. भोज हा दंडीचा पूर्ण अनुयायी दिसतों.

११ व्या शतकाच्या शेवटीं व १२ व्या शतकाच्या आरंभीं वाग्भट या जैन लेखकानें 'काव्यानुशासन' नांवाचा सूत्रबद्ध ग्रंथ लिहिला. हेमचंद्रानेंहि आपलें 'काव्यानुशासन' सूत्रांतच लिहिलें आहे.

१२ शतकाच्या आरंभी राजांकरुय्यक यानें 'अलंकारसर्वस्व' हा सुप्रसिद्ध ग्रंथ रचिला. १२ व्या शतकांतच उदभट्टानें 'शृंगारतिलक' हा शृंगारपूर्ण व साहित्यात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. विद्याधरानें काव्यप्रकाशाला अनुसरून आपला 'एकावली' हा कारिकाबद्ध ग्रंथ लिहिला. हा बहुधां १४ व्या शतकाच्या आरंभीं झालेला असावा. त्यांत रसांचें मानसशास्त्रदृष्ट्या मोठें मनोरंजक विवेचन केलें आहे.

विद्यानाथाच्या 'प्रतापरुद्रयशोभूषण' नामक ग्रंथांत साहित्यशास्त्राचें नाट्यशास्त्रासहित सबंध क्षेत्र आक्रमिलेलें दिसतें. दुसरा ग्रंथ विश्वनाथकविरायाचा 'साहित्यदर्पण' होय.

साहित्यशास्त्रावरील प्राथमिक ग्रंथ अपय्या दीक्षिताचा 'कुवलयानंदकारिका' हा आहे. त्यावर आशाधराचें भाष्य आहे. जयदेव पीयूषवर्ष याच्या 'चंद्रालोक' या ग्रंथाच्या ५ व्या प्रकरणावरील ही केवळ टीका दिसते.

साहित्यशास्त्रावरील शेवटचा महत्त्वाचा लेखक म्हणजे जगन्नाथपंडितराय होय. त्यानें १७ व्या शतकांत 'रसगंगाधर' हा ग्रंथ लिहिला. तो पुन्हां ध्वनिसिद्धांताचा इनकार करतो.

१८ व्या शतकांत देवशंकर नांवाच्या एका ब्राह्मण लेखकानें 'अलंकारमंजूषा' नांवाचा एक ग्रंथ पहिला माधवराव व राघोबादादा यांच्या स्तुतिपर लिहिला आहे.

साहित्य शास्त्र आणि त्याचें भवितव्य.— साहित्यशास्त्र हें वाढतें शास्त्र आहे. आणि या शास्त्राचा अभ्यास करणारानें अस्तित्वांत असलेलें ज्ञान जसें मिळविलें पाहिजें, तसें एतद्विषयक नवीन ज्ञान देखील उत्पादिलें पाहिजे. तसेंच ज्या गोष्टी अगर नियम आपण सत्यें म्हणून घोकतों; तीं खरोखरच सत्यें आहेत काय याचा विचार केला पाहिजे.

कोणतेंहि शास्त्र घ्या, त्या शास्त्राचे अभ्यासक प्रगमनशील असले म्हणजे त्यामध्यें एकसारखी वृद्धीहि व्हावयाचीच. शास्त्रीय ज्ञानाची वृद्धी दोन तर्हांनीं होते; ज्या गोष्टी शास्त्रविषय असतील त्या गोष्टींचें अधिकाधिक ज्ञान झाल्यामुळें शास्त्र वृध्दिंगत होईल; किंवा शास्त्रविषय असलेल्या गोष्टीच अधिकाधिक झाल्यास त्यांच्या वृद्धीबरोबर त्यांचें शास्त्रहि विकास पावेल. तत्त्व स्पष्ट करण्यासाठीं उदाहरण म्हणून ज्योतिःशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र हीं शास्त्रें घेंऊ. ज्योतिःशास्त्र दोन तर्हांनीं वाढेल : एक तर अस्तित्वांत असलेल्या तार्यांचें, त्यांच्या गतीचें, त्यांच्या रासायनिक घटनांचें जितकें ज्ञान अधिकाधिक होईल तितकें ज्योतिःशास्त्र अधिक वाढेल. हें झाल्यानें ज्ञानाच्या विषयांत फारसा फरक होणार नाहीं, अस्तित्वांत असलेल्या गोष्टींचें ज्ञान वाढेल एवढेंच. तथापि जर पूर्वीच्या तार्यांच्या घर्षणानें नवीन तारे निर्माण झाले तर ज्ञानविषयांतच फरक झाला असें होईल आणि त्या नवीन तार्यांच्या ज्ञानानें ज्ञान वाढेल. वनस्पतिशास्त्राची गोष्ट अशीच आहे. वनस्पतींच्या अस्तित्वांत असलेल्या जातींच्या अधिकाधिक ज्ञानामुळें, तसेंच कांहीं जाती नवीन उत्पन्न झाल्यामुळें, अस्तित्वांत असलेल्या ज्ञानसंग्रहांत फरक होतो. पुष्कळ प्रसंगीं वनस्पतीची एखादी जात नवीन निर्माण झाली कीं, ती पूर्वीपासून अस्तित्वांत होती, पण शोध लागेपर्यंत अलक्षित राहिली होती हें जाणणें अशक्य असतें.

एखाद्या शास्त्राचा विषय नैसर्गिक गोष्टीच असल्या तर त्या शास्त्राची वाढ विशेषेंकरून अस्तित्वांत असलेल्या तथापि अज्ञात राहिलेल्या अशाच गोष्टी शोधून काढण्यामुळें होते. ज्योतिःशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र ही शास्त्रें अशाच प्रकारचीं आहेत. या शास्त्रांची अशाच प्रकारची स्थिति असण्याचें कारण असें आहे कीं, निसर्गाची कृति फारच हळू हळू बदलत जाते आणि त्यामुळें शास्त्राचा विषय होणार्या नवीन नवीन गोष्टी भराभर अस्तित्वांत येत नाहींत. उलटपक्षीं ज्या शास्त्राचा विषय विशेषेंकरून मनुष्यकृतीच असतो, त्या शास्त्रांत नवीन उत्पन्न झालेल्या गोष्टींच्या ज्ञानानें वारंवार भर टाकावी लागते. आगगाड्यांसंबंधाचें अर्थशास्त्र आगगाड्या आल्यानंतर यावयाचें. मनुष्याच्या प्रयत्नानें अनेक कार्ये होत असतात. नुसत्या जगातील शासनविषयक चळवळी अगर केवळ युध्देंच आपण पाहूं लागलों तर तीं एकसारखीं चाललीं आहेत, असें दिसून येईल. ज्या शास्त्रांस विषयीभूत होणार्या गोष्टी एकसारख्या वाढत चालल्या आहेत अशाच पैकीं साहित्यशास्त्र हें एक आहे, कारण त्याचा विषय जे वाङमयाचे प्रकार ते एकसारखे वाढत असतात.

साहित्यशास्त्राच्या अभ्यासांत आपला प्रयत्न अनेक दिशांनीं असला पाहिजे. एकतर आहे तेवढें मान शिष्यबुद्धीनें मिळविणें; शिवाय या शास्त्रांत आज जे नियम दिसतात त्यांची तपासणी करणें आणि पूर्वीच्या ज्ञानसंग्रहांत भर घालणें. ही जी भर घालावयाची ती दोन तर्हांनीं घालतें येई : एक तर्हा म्हटली म्हणजे पूर्वीच्याच काव्यादि शास्त्रविषयांचा अभ्यास करून घालतां येईल. किंवा नवीन मनोरंजक ग्रंथासारखीं शास्त्रसाधनें तयार होतात, त्यांचा अभ्यास करून घालतां येईल. परंपरागत साहित्यशास्त्र तपासून पहातांना हें शास्त्र निर्माण तरी कसें झालें हें शोधलें पाहिजे आणि त्यासाठीं पूर्वीच्या शास्त्रज्ञांची संशोधनपद्धति समजावून घेतली पाहिजे.

आपलें साहित्यशास्त्र जें तयार झालें त्याची सामग्री म्हटली म्हणजे उत्तरकालीन संस्कृत गीर्वाण होय. या सामग्रीच्या नियमितपणामुळें त्यापासून तयार होणार्या साहित्यशास्त्रांत ज्या कांहीं उणीवा राहिल्या आहेत त्या उणीवांपैकीं कांहीं पुढें ''काव्यग्रंथांचें महत्त्वमापन'' या पॅरिग्राफमध्यें नमूद केल्या आहेत. आज आपली दृष्टि विस्तृत झाली आहे. साहित्यशास्त्राचीं साधनें म्हणजे काव्यें, नाटकें वगैरे जे वाङ्मयांतील प्रकार आहेत ते प्रकारहि वाढले आहेत आणि त्यांपैकीं जी आपणांस उपलब्ध होणें शक्य आहे अशा साधनांचा सांठा आज पुष्कळच आहे. वाङ्मयातील विविध प्रकार जगभर पसरलेले आहेत. यूरोपांतील व अशियाखंडांतील निरनिराळ्या भाषांत गढून असलेल्या गीर्वाणाचें अस्तित्व तरी आपणांस ठाऊक झालें आहे. आणि या सर्व प्रकारच्या बाह्य गीर्वाणापैकीं कांहीं बाह्य गीर्वाणाची आपणांपैकीं पुष्कळांस ओळख झाली आहे. आतां आपलें वाङ्मयशास्त्रविषयक कर्तव्य हें आहे कीं, वाङ्मयाचे हे नवीन अवगत प्रकार पाहून साहित्यशास्त्राचें संवर्धन करावयाचें.

आपल्या साहित्यशास्त्राची वाढ करण्यासाठी खटपट करतांना आपणांस असें पाहिले पाहिजे कीं, ज्या बाह्य लोकांत चांगलें वाङ्मय आहे, त्यांच्यापाशीं त्यांच्या वाङ्मयाच्या प्रकाराच्या साहाय्यानें त्यांनीं शास्त्र बनविलें आहे कीं नाहीं? असल्यास त्याचा उपयोग कितपत होईल? सर्व साहित्यशास्त्राच्या बुडाशीं काव्यविषयक चर्चा आहेच. इंग्रज लोकांची साहित्यविषयक चर्चा आपल्यापैकीं बर्याच लोकांस थोडीबहुत अवगत आहेच.

आपलें साहित्यशास्त्र जें आहे तें अनेक कालीं अनेक वादविवाद होऊन जी शेवटीं तत्त्वें निघतील त्या तत्त्वांच्या समुच्चयरूपाचें आहे. साहित्यशास्त्र तयार होण्यापूर्वी जे अनेक वादविवाद झाले ते सर्व तोंडीं झाले ते वादविवाद आज शिल्लक नाहींत. त्या वादविवादांचा अंत्य परिणाम तेवढाच आज शिल्लक आहे. इंग्रजी साहित्यशास्त्र अजून भ्रुणावस्थेंतच आहे. काव्यविषयक चर्चा पुष्कळ झाली म्हणजे ती पुढें अवलोकिली जाऊन नंतर त्यापासून नियम निघावयाचे ही पुढची क्रिया इंग्रजी साहित्योद्यमांत फारशी झालेली दिसत नाहीं.

साहित्यशास्त्र तयार होतें तें इतर सर्व शास्त्रें ज्या क्रियेनें तयार होतात त्या क्रियेनेंच व्हावयाचें. ती क्रिया सामान्यतः येणेंप्रमाणें:- एखाद्या मनुष्यानें एखादें काव्य वाचलें असता त्यांतला कांहीं भाग त्यास आवडतो आणि कांहीं भाग आवडत नाहीं. जो भाग आवडतो अगर आवडत नाहीं तो कांहीं मनाच्या स्वाभाविक स्थितीमुळें अगर मनास पूर्वीच झालेल्या संस्कारानें आपोआपच ठरतो. एखादा भाग आवडत असला म्हणजे तो कां आवडतो याचें कारण मनुष्य शोधूं लागतो, आणि जो आवडत नसेल तो वाईट का म्हणावा याचें कारणहि त्यास शोधावें लागतें. श्रोत्यानें अर्थाकडे कांहींहि लक्ष दिलें नाहीं, श्रोता अगदीं अडाणी असला तरी त्याला आवडनिवडहि आहेच. मंजूळ शब्दांनीं युक्त असें जें काव्य असेल तें त्यास कठोर शब्दांनीं युक्त अशा काव्यापेक्षां अधिक आवडणारच. आवडीनिवडीची अनेक कारणें सांपडलीं आणि ती कारणें एकत्र केलीं म्हणजे त्यांपासून शास्त्र तयार होतें. ''एका मनुष्याला कांहीं गोष्टी आवडल्या आणि दुसर्या मनुष्याला त्याच गोष्टी आवडत नसल्या तर चांगलें कोणते आणि वाईट कोणतें याविषयीं नियम तरी कसे तयार होतील आणि तसे नियम जर तयार झाले नाहींत तर शास्त्र कोठून तयार होणार?'' अशी जर कोणी शंका काढली तर त्याला उत्तर असें आहे कीं, जगांतल्या कोणत्याहि एका वर्गाच्या अनेक गोष्टी घेतल्या तरी त्या गोष्टींत विसादृश्य जसें असेल तसा सारखेपणा देखील कांहीं आहे. निरनिराळ्या कुत्र्यांमध्यें निराळेपणा जसा आहे तसा सारखेपणा देखील आहेच, दोन भावांच्या तोंडवळ्यामध्यें सारखेपणा जरी पुष्कळ असला तरी विसादृश्य आहेच. तसेंच मनुष्याच्या आवडीनिवडींत जरी फरक असला तरी सर्वसामान्य अशा आवडी असतातच. गुलाबाचा वास सर्वांसच आवडतो, साखरेचे पदार्थ सर्वांसच आवडतात, मीठ नसलेले पदार्थ कोणासच आवडत नाहींत त्याप्रमाणें काव्यांत असलेल्या कांहीं गोष्टी लोकांस आवडतात आणि कांहीं आवडत नाहींत. मानवी स्वभावांत सारखेपणा आहे. त्यामुळें साहित्यशास्त्रासारख्या शास्त्रांत अवकाश आहे.

ज्याप्रमाणें अनेक लोकांच्या आवडी एकत्र होऊन साहित्यशास्त्र तयार होतें, तसेंच तें, काव्य अगर लेख सुंदर करण्याकरितां अनेकांनीं काय उपाय योजिले, त्या उपायांचें एकीकरण होऊन तयार होतें. मनावर परिणाम कशानें होतो हें जाणण्याकरितां लोकांनीं भाषाविषयक काय प्रयत्न केले आणि त्यापैकीं यशस्वी कोणते झाले हे जाणणें ह्या दोन गोष्टी एकच होत. ग्रीकांचें साहित्यशास्त्र उर्फ ''र्हेटोरिक्स'' जें तयार झालें तें याच पद्धतीनें झालें.

र्हेटोरिक्स म्हणून शास्त्र ग्रीसमध्यें उदयास आलें तें इसवी शकापूर्वीच्या पांचव्या शतकांत सिर्याक्यूजच्या जुलमी राजांनां हांकलून दिल्यानंतर लोकसत्ताक राज्य झालें आणि त्याप्रसंगीं राजांनी पूर्वी हांकलून दिलेले लोक परत आले आणि पुढें त्यामुळें मालमत्तेसंबंधाचे अनेक खटले सुरू झाले. त्या वेळेस कोर्टांत सामान्य तर्हेच्या नागरिकास आपल्या हक्कासाठीं कसें काय भांडावें हें शिकविण्यासाठीं ही ''र्हेटोरिक्स'' कला अस्तित्वांत आली. ही कला शिकविण्याचा बाणा बाळगणारे ग्रंथकार, काल्पनिक खटल्याचीं भाषणें तयार करीत. ''अॅन्टिफोन'' नांवाच्या ग्रंथकारानें अशाच तर्हेचें पुस्तक तयार केलें आहे. त्यांत चार प्रकारचीं भाषणें आहेत. पहिल्या भाषणांत फिर्यादी आरोप ठेवितो, दुसर्या भाषणांत प्रतिवादी त्यास जबाब देतो, तिसर्या भाषणांत फिर्यादी पुन्हां प्रत्युत्तर देतो आणि चवथ्या भाषणांत प्रतिवादी पुन्हा जबाब देतो. अॅन्टिफोनच्या पुस्तकांत शुद्ध खणखणीत वादविवाद आहे आणि ''आयझोक्रेटीस'' च्या ग्रंथांतील भाषणात कलाकुसरी अनेक करून भाषणें शोभिवंत केलीं आहेत. या तर्हेनें ज्या भाषणांत कौशल्य आणि अलंकार पुष्कळ आहेत असें साहित्य पुष्कळ तयार झालें असतां पुढें आरिस्टाटलनें नियम शोधून काढले. ''ज्याच्या साहाय्यानें वक्ता श्रोत्याचें हृदय आपल्याकडे करून घेतो अगर विचार आपल्या तर्फेचे करून घेतो'' असे नियम शोधून काढण्याचें काम आरिस्टाटलनें आपल्याकडे घेतलें असा आरिस्टाटलचा साहित्यशास्त्रार्थ प्रयत्नाचा आणि त्याच्या पूर्वीच्या प्रयत्नाचा थोडक्यांत इतिहास आहे.

आजचें इंग्रजी साहित्यशास्त्र भ्रुणावस्थेंत आहे म्हणून सांगितलें. आज जें काय आहे तें चर्चात्मक गीर्वाण आहे. तें ग्रीक साहित्यशास्त्रकारांच्या ज्ञानास मूळाशीं धरून त्याच्या वर्धनानें बनलें नाहीं. प्रसंगी ग्रीक शास्त्रकारांनीं बोधिलेल्या तत्त्वांचा उल्लेख होतो, तथापि ग्रीकांच्या साहित्यशास्त्राचे फारच थोडके धागे आजच्या इंग्रजी वाङ्मयविषयक टीकेला जोडले गेले आहेत.

इंग्रजीमध्ये साहित्यशास्त्रास अन्वर्थक असा शब्दच नाहीं. कधीं र्हेटोरिक्स हाच शब्द उपयोजिला जातो कधीं ''सायन्स ऑफ लिटरेचर'', कधीं ''सीआन्स ड बेले लेटर्स'' असे शब्द वापरतात. तथापि साहित्यशास्त्रबोधक नेहमीचा शब्द म्हटला म्हणजे ''लिटररी क्रिटिसिझम'' उर्फ ''ललित वाङ्मयविषयक टीका'' हा होय. तथापि यामध्यें अजून शास्त्रीय वृत्ति फारशी दृष्टीस पडली नाहीं. सामान्य तर्हेनें उदारवृत्ति ठेवून चांगलें कार्य आहे असें म्हणून चांचपडण्यापलीकडे ही टीका करण्याची कला गेली नाहीं.

ललित गीर्वाणावर टीकात्मक लेख दृष्टीस पडतात त्यांत टीकाकारांच्या ज्ञानसंपत्तिभेदामुळें आणि ज्या वर्तमान पत्रादि शब्दांनीं टीका प्रसिद्ध होते त्यांच्या भेदानुसार टीकालेखांत फरक आढळतो. वर्तमानपत्रांतून जी टीका होते ती बहुधां पुस्तक वाचून वाचकांच्या मनावर सामान्यतः जो परिणाम होतो तो दाखविणारी असते. कधीं कधीं पुस्तकांत जी मतें व्यक्त झाली असतील त्या मतांवर किंवा पुस्तक वाचून जनतेवर काय नैतिक दृष्ट्या इष्टानिष्ट परिणाम होईल त्याच्या कल्पनेवर रचली गेली असते.

इंग्रजी ग्रंथांवर टीका करणारें जें वाङ्मय आहे त्यांचें सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें आहे:— एक तर टीकाकार वाङ्मयविषयक टीका करतांना स्वतःचें भाषाकौशल्यच दाखविण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार साधारणपणें समकालीन टीकाकारांकडून होतो. टीकाकार जर चांगल्या दर्जाचा असला तर तो ''वस्तू'' कडे जरासा ऐतिहासिकदृष्टीनें पहात बसतो. नाटक अगर कादंबरी घेतली तर तींत सद्यःकालीन समाजाचें चित्र त्यांत कसें काय रेखाटलें आहे, हें पहाण्याचा प्रयत्न कित्येक टीकाकार करतात. वाङ्मयविषयक अभ्यास करणारे जे लोक असतात ते कवीचें अगर ग्रंथकाराचें चरित्र, त्याच्या खोडी वगैरे गोष्टी पहात असतात, कित्येक अभ्यासक ज्याकालीं लेखाकानें कादंबरी अगर नाटक लिहिलें त्या कालची सामाजिक स्थिति आणि त्या नाटकाचें स्वरूप यांची संगति लावीत बसतात. वाङ्मयविषयक अभ्यास करतांना लेखकमंडळी हीच इतिहासविषय होऊन त्यांच्या आयुष्यक्रमावर गीर्वाण तयार होतें. आणि कवींच्या परस्पर संबंधावर, स्टील आणि आडिसन हे एकमेकांस भेटत केव्हां होते हें एक पहातो, दुसरा कार्लाइलला फारसें गृहसौख्य नव्हतें याचें कारण पहाण्यासाठीं कार्लाईल नपुंसक होता कीं काय याबद्दल चौकशी करतो. तिसरा, कार्लाईलसंबंधानें असा संशय उत्पन्न केला, याबद्दलच रागावतो. कित्येक वाङ्मयटीकाकार ग्रंथकारांच्या लिहिण्यामध्यें फ्याशन्स कोणकोरत्या पडल्या. वाङ्मयविषयक आवडीनिवडींत काय काय फरक पडले हेंच पहातात. देशांत अशा कांही चळवळी झाल्या कीं काय कीं त्या चळवळी कविकल्पनांमुळें उत्पन्न झाल्या अगर वृध्दिंगत होत गेल्या यांविषयीं विवेचन होतें.

साहित्यशास्त्रज्ञांस शोभेलसें काव्यविवेचन इंग्रजींतून थोडेंबहुत आढळतें. आणि काव्याचें पृथक्करण करण्याची शक्ति इंग्रज लोकांतहि आहे असें दिसून येईल. येथें इंग्रज टीकाकार शास्त्रीयपद्धति वापरतात अशा गोष्टींपैकीं मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे पात्रवर्णन (क्यारेक्टर्स) होय. प्रत्येक पात्राचें कार्य काय आहे आणि तें कार्य करण्यासाठीं पात्र कसें काय सजवलें आहे हें इंग्रज टीकाकारांनीं त्या पात्रांचें एकंदर चरित्र, निरनिराळ्या प्रसंगीं दिसलेलें वर्तन, त्या पात्राची मानसिक वृत्ति आणि अनेक प्रसंगीं त्या पात्राच्या तोंडांतून निघालेलीं वाक्ये यांच्या साहाय्यानें केलेलें असतें. आपल्या साहित्यशास्त्रांत धीरोदात्त नायकांचें आणि तदनुरूप नायिकांचें प्रकार फार थोडेच आहेत. कारण असल्या साधनांच्या साहाय्यानें ते प्रकार काढले आहेत. तथापि कादंबर्या आणि नाटकें यांच्या विपुलतेमुळें ते प्रकार इंग्रजी काव्यविषयक टीकांच्या संग्रहांत पुष्कळच आहेत.

इंग्रजी ललितवाङ्मयामध्यें ''ध्वनियुक्त विनोद'' (ह्यूमर) पुष्कळ आहे. व ''ध्वनियुक्त विनोदा''ची चहा पुष्कळच आहे, तथापि त्याचें पृथक्करण मात्र चांगलें झालेलें दिसत नाहीं. त्यांच्या प्रसिद्ध टीकाकारांचे लेख जरी घेतले तरी त्यांत शास्त्रीयत्व क्वचितच आढळतें. जो वर्ग केवळ वर्तमानपत्राचे कालमच्या कलम भरण्यासाठीं तयार झाला त्यांत शास्त्रीयत्व कोठून असणार !

इंग्रजी टीकावाङ्मय घेऊन त्यापासून तत्त्वें शोधून काढून तीं एकत्र करून शास्त्र तयार करण्याचा प्रयत्न कोणी केला नाहीं. वाङ्मयविषयक सौंदर्य कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतें तें शोधण्याचा प्रयत्न साहित्यशास्त्रज्ञांकडून झाला पाहीजे आणि सौदर्यकारणें गोळा केलीं पाहिजेत. आज ''सायन्स ड बेलस'' या विषयावर अगर या आडनांवाचीं कांहीं पुस्तकें दृष्टीस पडतात. त्यांत काव्यें, कादंबर्या, नाटकें यांच्या कृती अगर यंत्रशास्त्र दिलेलें असतें.

वाङ्मयाचे काव्यनायकादि प्रकार तयार करण्याच्या कृती जाणणें निराळें, आणि सर्व प्रकारच्या ललितगीर्वाणास सौंदर्य कसें आणतां येईल आणि तें मनावर परिणामकारी कसें होईल यासंबंधाचे नियम जाणणें हें निराळें. पहिल्या प्रकारचे नियम म्हणजे विशेष नियम होत आणि दुसर्या प्रकारचे नियम म्हटले म्हणजे सामान्य नियम होत. सर्व प्रकारच्या कृतीस लागू पडणार्या नियमांस महत्त्व अधिक. अर्थांत साहित्यशास्त्रामध्यें त्या प्रकारच्या नियमांसच प्रामुख्य दिलें पाहिजे.

पूर्वकालीं झालेले आपल्या देशांत काव्यविषयक वादविवाद आज उपलब्ध नाहींत. साहित्यशास्त्राचें तयार झालेलें स्वरूप पाहिलें म्हणजे प्रत्येकासच त्या साहित्यशास्त्राच्या निर्माणास कोणतें तत्त्वज्ञान लागतें हें समजणें शक्य नाहीं. आणि इंग्रजी ग्रंथकाराचें वादविवादविषयक लेख तर आपल्या डोळ्यासमोर आहेत. यामुळें एक असा परिणाम होतो कीं, बारीकसारीक गोष्टींबद्दल आपले शास्त्रज्ञ भांडत बसतात; इंग्रजी टीकाकारांची बुद्धि त्यांस नाहीं असा पुष्कळ लोकांचा वृथाग्रह होतो. यासाठीं आपल्या साहित्यशास्त्राचें तत्त्वज्ञान समजून घेतलें पाहिजे. आपल्या साहित्यशास्त्राच्या महत्त्वाविषयीं थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे आपलें साहित्यशास्त्र मानसशास्त्राच्या सूक्ष्म नियमांवर तयार झालें आहे. आपलें काव्याचें वर्गीकरण घ्या अगर रसांची यादी वाचा. अगर ''व्याभिचारी'' भावांची यादी वाचा, म्हणजे आपल्या साहित्यशास्त्रकारांनीं मानसशास्त्राचें प्रामुख्यानें अवलंबन केलें आहे ही  गोष्ट मनाला पटते. तथापि आजच्या इंग्रजी शिकलेल्या वर्गाला इंग्रजी ''काव्यचर्चा'' जितकी परिचित आहे, तितकें संस्कृत साहित्यशास्त्र परिचित आहे आणि शास्त्रसंवर्धनाच्या दृष्टीनें आपलें साहित्यशास्त्र हें तरी कोणी अवलोकिलें आहे ! शिवाय आपल्या गुरुस्थानीं, सरकारी दडपणामुळें बसलेल्या इंग्रज लोकांस आपल्या साहित्यशास्त्राची किंमतच कळत नाहीं. काव्यचर्चा करणार्या इंग्रजांची बुद्धि कांहीं विशेष क्षेत्रांत अडकून गेली आहे.

आपल्या साहित्यशास्त्राचा यूरोपावर थोडाबहुत परिणाम होत आहे. बेन नांवाच्या इंग्रज साहित्यलेखकानें रस उर्फ ''सेंटिमेंट'' पासून काव्यपरीक्षेस सुरुवात झाली पाहिजे असें समजून त्या तर्हेनें आपला ग्रंथ लिहिला आहे. तथापि या लेखकास अनुकरण करणारे फारसे भेटले नाहींत आणि आपल्या साहित्यशास्त्राचा यूरोपावर परिणाम अजून चांगल्या तर्हेनें व्हावयास सुरुवात झाली नाहीं असें म्हणावें लागेल. आणि याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे आपल्या साहित्यशास्त्राची खुबीच त्यांस समजली नाहीं. फार कशाला, विल्सन नांवाच्या एका संस्कृत भाषेंत प्रवीण झालेल्या इंग्रजानें संस्कृत नाटकांचीं इंग्रजींतून भाषांतरें करून ती इंग्रज लोकांस अवगत केलीं. तथापि हा पंडित देखील आपल्या साहित्यशास्त्रांतील व्याख्या, रसांच्या याद्या, आणि संविधानकांचे सांचे पाहून कंटाळून गेला आणि संस्कृत साहित्यशास्त्र ही कांहीतरी एक वेडगळ चीज आहे अशी त्याची समजूत झाली; असो.

मानसशास्त्राच्या दृष्टीनें साहित्यशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे हें आपल्या साहित्यशास्त्राचें प्रथम तत्त्व आहे. ''हेंच तत्त्व आहे'' ही गोष्ट सिद्ध करून दाखवावयाची म्हणजे साहित्यशास्त्राच्या अनेक नियमांची मानसशास्त्राच्या दृष्टीनें सिद्धता करावयाची; आणि तसें करावयाचें म्हटलें म्हणजे मोठाच ग्रंथ होईल. यासाठीं प्रथम कांहीं स्थूल गोष्टींचाच येथें निर्देश करतों.

प्रथमत: काव्यांचें अत्यंत सामान्य असें वर्गीकरण घेऊं. ग्रीकांचीं आणि इंग्रजांची वर्गीकरणें आपण गुंडाळून ठेवूं.

गीर्वाणविषयक ज्या एकंदर वस्तू आहेत त्यांचें वर्गीकरण करावयाचें तें कसें! गीर्वाणविषयक अनेक प्रकार आहेत. आणि त्यांचें वर्गीकरण करण्याचा प्रयत्नहि अनेक प्रकारें चालला आहे. येथें आपल्या साहित्यशास्त्रज्ञांच्या शास्त्ररचनेच्या बुडाशीं मानसशास्त्र आहे ही गोष्ट समजून घ्यावयाची आहे आणि आपली चिकित्सा प्रथम केली पाहिजे.

काव्यवस्तूला जें महत्त्व उत्पन्न होतें तें ती वस्तु मनावर कांहीं तरी अनुकूल परिणाम घडविते म्हणूनच होतें. मनावर अनुकूल अगर प्रतिकूल परिणाम होणें हें प्रथमतः वस्तूच्या इंद्रियगोचरत्वावर अवलंबून आहे; यासाठीं मनावर आणि आपल्या इतर इंद्रियांवर परिणाम घडविणारी वस्तु प्रथमतः इंद्रियगोचर कशी काय होते हें पाहून वर्गीकरण केले पाहिजे. या तत्त्वानुसार काव्यांचे श्राव्य आणि दृश्य असे दोन विभाग केले आहेत. काव्य आणि काव्यविषय मनुष्याच्या मनास गोचर होण्यास कोणत्या तरी मार्गानें तें मेंदूपर्यंत जाऊन पोहोंचलें पाहिजे. आणि डोळे व कान या दोन इंद्रियांनींच ज्याअर्थी काव्य मनावर परिणाम घडवितें त्याअर्थी काव्याचें वर्गीकरण देखील याच तत्त्वानुसार केलें पाहिजे. दुसर्या मार्गानें काव्य मेंदूपर्यंत पोंचू शकत नाहीं. आणि दुसर्या इंद्रियांस काव्यापासून सुखहि होत नाहीं.

''बुभुक्षिंतैर्व्याकरणं न भुज्यते ।
पिपासितैः काव्यरसो न पीयते ॥''

या ओळी लिहून काव्योपहास करणारांनीं इंद्रियशांतीच्या दृष्टीनें काव्य तपासावें हें तत्त्व खरोखर स्पष्टपणें पुढें आणलें आहे. काव्याच्या बाबतींत जें इंद्रिय आपणांस तृप्त करावयाचें तें इंद्रिय मन हेंच होय.

आतां साहित्यशास्त्रांत नऊ रस मानिले आहेत त्यांचें बीज काय असा प्रश्न स्वाभाविकपणेंच उपस्थित होतो. रसास काव्याचा आत्मा म्हटलें आहे. आणि रसांची यादी जर पाहिली तर केवळ मानसशास्त्रासाठी आपण मनाच्या प्रवृत्तींचें जर वर्गीकरण केलें तर ज्या प्रकारचें वर्गीकरण होईल त्या प्रकारचें वर्गीकरण रसांच्या यादींत दिसत नाहीं. रसांचे जे स्थायीभाव आहेत ते घेतले तर मनाचे सर्व विकार मोजले गेले असें होत नाहीं. अशी स्थिति जर आहे तर रसाचें तत्त्वज्ञान काय आहे याचा तपास आपण केला पाहिजे. ही गोष्ट समजण्यासाठीं आपण प्रथमतः कविता मोठ्यानें वाचून अगर वाचलेली ऐकून मनावर काय परिणाम होतो याचें पृथक्करण करूं.

काव्य वाचिलें असतां प्रथमतः जो मनावर परिणाम होतो तो अर्थाचा न होतां केवळ शब्दाचा होतो. आपण ''कविता कानात गोड लागते'' अगर ''लागत नाही'' असे शब्द वापरतों. पुष्कळदां जरा पांडित्याच्या भाषेंत बोलावयास लागलों म्हणजे ''कानांवर परिणाम चांगला होतो'' असेंहि शब्द उद्भारितों.

कानावर परिणाम होतो याचा खरा अर्थ म्हटला म्हणजे ''मेंदूवरच परिणाम होतो असा आहे. '' कां कीं, शब्दोच्चारामुळें कानावर जी हवेचीं आंदोलनें होतात, त्यांचा परिणाम मज्जातंतूच्या साहाय्यानें मेंदूवर होतो. कवितेंतील अर्थाचा परिणाम स्वतंत्रपणें अगर शब्दांच्या साहाय्यानें मनावर होतो. तो परिणाम होण्याचीं कारणें काय हें पाहूं.

मनाला एक शक्ति आहे. ती शक्ति म्हटली म्हणजे ''स्मृति'' उर्फ आठवण होय. एखादी झालेली गोष्ट आठवते, त्याप्रमाणें मनानें अनुभविलेलें विकार देखील कल्पनेनें पुन्हां अनुभवितां येतात. ज्या गोष्टींच्या योगानें आपल्याला दुःख झालें असेल त्या गोष्टींची आठवण पुन्हां झाल्यानें पूर्वी अनुभविलेलें दुःख आपणांस पुन्हा होते. पूर्वानुभवाची आठवण आपणास होणें शक्य असतें त्यामुळें कविता वाचून आल्हाद अगर दुःख होणें शक्य आहे. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमुळें आपणांस दुःख झालें असतें. त्यामुळें, इतरांस प्रियजनांच्या आणि आप्तांच्या मृत्युमुळें कसें दुःख होतें हें समजतें. स्मृतिजन्य पुनर्भावना सर्व मनुष्यांच्या ठायीं असतें. त्यामुळें कवितादेखील शक्य होते. एका विशिष्ट तर्हेच्या भावना जर कोणीं अनुभविल्या नसतील तर अनुभविकांच्या ठायीं त्या त्या भावना उत्पन्न करणारीं वर्णनें वाचून देखील अननुभविकांस आल्हाद होणार नाहीं. एवंच, कवितेच्या योगानें मनावर परिणाम होतो त्याच्या मुळाशीं आपल्या मनाचा कोणता गुण आहे असें विचारल्यास स्मृति आणि तज्जन्य पूर्वानुभूत भावनांचा पुनरनुभव घेण्याची मनाची शक्ति हे दोन गुण होत.

सूचक शब्दांनीं किंवा वर्णनानें मनुष्याचें पूर्वानुभूत भाव जागृत होतात हें काव्याच्या परिणामाचें कारण आहे आणि कोणते विकार किती प्रमाणांत जागृत करावे आणि ते इतर संविधानकाच्या साहाय्यानें कोणते कितपत करावेत याचा बोध करण्यासाठीं काव्यग्रंथांतलें रसप्रकरण आहे. रसांची जी यादी आपण पहातों ती एकंदर तीव्र मनोभावांचें वर्गीकरण नसून सूचक शब्दांनीं पुनरुद्भाव करण्यास योग्य आणि शक्य अशा मनोविकारांचें वर्गीकरण आहे. एकंदर काव्यवस्तूंचें वर्गीकरण आणि कवितेचे रसरूपी घटकावयव शोधण्यांत उपयोगांत आणलेली तत्त्वे यांच्या बुडाशीं मानसशास्त्र आहे हें वरील विवेचनावरून सिद्ध होईल; असो.

आतांपर्यंत झालेल्या विवेचनांत कोणतीं तत्त्वें पुढें आणिलीं आहेत हेंहि पुन्हां सूत्ररूपानें सांगतों.

(१) साहित्यशास्त्र हें वाढतें शास्त्र आहे. तें आपणांस वाढवावयाचें आहे. तें वाढण्यासाठीं परकीय वाङ्मय आणि अर्वाचीन वाङ्मय या साहित्याचा उपयोग केला पाहिजे.

(२) इंग्रजीत साहित्यशास्त्र नाहीं. तथापि ''काव्यचर्चा'' इंग्रजी संस्कृतींत आहे. या काव्यचर्चेसंबंधीं जी काहीं सर्वसामान्य तत्त्वें आणि विशिष्ट वाङ्मयप्रकारासंबंधाचीं तत्त्वें आहेत, त्यांत जर का नवीन ज्ञान असेल तर त्या नवीन ज्ञानाचा संग्रह आपल्या साहित्यशास्त्रांत केला पाहिजे.

(३) साहित्यशास्त्रास लागू पडणारें शास्त्रघटनेचें तत्त्वज्ञान सध्याच्या साहित्यशास्त्राचें सूक्ष्म तर्हेनें निरीक्षण करून पैदा केलें पाहिजे.

(४) काव्याचा मनावर काय परिणाम होतो हें वारंवार पाहून सध्यांचें साहित्यशास्त्र तपासलें पाहिजें.

काव्य ग्रंथांचें महत्त्व मापन.— काव्य चांगलें कोणतें हें ठरविण्यासाठी प्राचीनांनीं कांहीं विचार केला आहे किंवा नाहीं ? केला असल्यास त्याचें अवलंबन करणें आपणांस अवश्य आहे की नाहीं, हे विचार काव्यग्रंथांच्या महत्त्वाचें मापन करतांना प्रथम पुढें उभे रहातात. प्राचीनांनीं घालून दिलेले नियम बरोबर आहेत काय हा प्रश्न नंतर पुढें येतो.

आपल्या देशांत निरनिराळ्या प्रकारचीं काव्यें होऊन गेलीं व त्याप्रमाणें काव्यविवेचन करणारे ग्रंथकारहि होऊन गेले. काव्य म्हणजे काय यासंबंधाच्या व्याख्या देखील अनेक व निरनिराळ्या प्रकारच्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, काव्यप्रकाशकार मम्मट, वामन, रसगंगाधरकर्ते जगन्नाथ, आणि साहित्यदर्पणकार विश्वनाथ, यांच्या ''काव्य'' या शब्दाच्या व्याख्या भिन्न आहेत. ''वाक्यं रसात्मकं काव्यं'' ही विश्वनाथभट्टाची व्याख्या तर सर्वांस परिचितच आहे. प्राचीनांनी ''काव्य'' म्हणजे काय या प्रश्नावर ज्याप्रमाणें विचार केला त्याप्रमाणें काव्याची उत्तममध्यमता व गुणदोष यांवरहि विवेचन केलें आहे. काव्य चांगले कोणतें यासंबंधानें जे विचार प्रसिद्ध झाले आहेत त्यांतील दोन प्रमुख विचार येथें देतों. एक विचार म्हटला म्हणजे हा कीं, ''ध्वनिकाव्य'' म्हणजे व्यंग्यार्थास जेथें प्राधान्य असेल तें काव्य ''उत्तम'' होय. आणि दुसरा एक विचार म्हटला म्हणजे ''अर्थचित्र'' काव्य ''शब्दचित्र'' काव्यापेक्षां अधिक महत्त्वाचें आहे असा आहे. प्राचीन ग्रंथकारांच्या ''उत्तम'' काव्याच्या लक्षणाचें परीक्षण करणें आपणांस अवश्य आहे.

मनांतील अर्थ अनेक रीतीनीं गौरवून कसा वदावा हें उत्तरकालीन संस्कृतग्रंथकारांस बरेंच अवगत होतें. आपल्या देशांत अलंकारशास्त्र बरेंच वाढलें आहे. उपमेचे व अतिशयोक्तीचें अनेक भेद काढण्यांत पूर्वीच्या साहित्यशास्त्रज्ञांनीं बरीच सूक्ष्मता दाखविली आहे. एखादें वाक्य लिहावयाचें अगर एखादी कल्पना व्यक्त करावयाची झाली तर ती अधिक खुबीनें कशी व्यक्त करावी यावर आपल्या देशांत चांगला विचार झाला होता, ही गोष्ट साहित्यशास्त्राचें वरवर अवलोकन करणारासहि दिसून येईल. काव्यासंबंधाचें जसें शास्त्र निर्माण झालें त्याप्रमाणें विशिष्ट कविकृतीचें परीक्षणहि होत असे. आपल्या देशांत काव्यग्रंथांवर मल्लिनाथासारखे जे अनेक टीकाकार झाले ते टीका लिहिण्यासाठीं हातीं घेतलेल्या काव्यांतील प्रत्येक श्लोकांत गुणदोष काय आहेत याचें पृथक्करण करीत. काव्य म्हणजे काय व त्यांच्यांत गुणदोष काय आहेत हें चांगल्या शास्त्रीय पद्धतीनें ठरलें गेलें व त्याचें शास्त्र प्रत्यक्षाच्या भक्कम पायावर उभारलें गेलें. तथापि त्यांची पद्धति अगदींच निर्दोष होती असें मात्र नाहीं. पूर्वीची काव्यपरीक्षणाची तत्त्वें व काव्यविवेचनपद्धति यांचा विचार केला असतां असें दिसून येईल की, एखादा मोठा काव्यग्रंथ अगर कवीचे समग्र ग्रंथ यांचें साकल्यानें निरीक्षण करण्याची पद्धति आपल्या देशांत फारच थोडकी होती. एखाद्या लहानशा तुकड्याचें परीक्षण मात्र लोकांस करतां येत असे. यास एक अपवाद आहे असें म्हणतां येईल. नाटकांचें साकल्यानें परीक्षण करण्याकडे बुद्धिमत्ता थोडीबहुत अधिक दृष्टीस पडे. उदाहरणार्थ, दशरूपासारखे प्रसिद्ध ग्रंथ घेतले तर त्यांत दृश्यकाव्यांचें साकल्यानें अवलोकन प्राचीनांकडून चांगलें होत असे असें लक्षांत येतें. येथें हेंहि सांगितले पाहिजे कीं, प्राचीन नाट्यशास्त्रांत सुधारणेस जागा पुष्कळच आहे. प्राचीन कालच्या नाटकांचें व पात्रांचें वर्गीकरण व त्यांच्या व्याख्या हीं असमाधानकारक आहेत. विविध प्रकारच्या नाटकांच्या व्याख्यांस संविधानकांचे सांचे म्हटलें तर शोभेल. नाटकांवर जे शास्त्रीय व टीकात्मक वाङ्मय झालें त्यांस ठोकळ कथांचें वर्गीकरण म्हटल्यास हरकत नाहीं. मोठ्या कृतीचें साकल्यानें परीक्षण करण्याची कला व तत्संबंधींचें शास्त्र हीं फारशीं वृध्दिंगत झालीं नव्हती असें म्हटलें तरी चालेल.

वर सांगितलेला हाच केवळ संस्कृत साहित्याचा दोष नाहीं. तो दोष मोठाच आहे आणि ज्या परिस्थितीत संस्कृत साहित्यशास्त्र तयार झालें, ती परिस्थितीच दोषमय आहे. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनीं विचारासाठी घेतलेलीं काव्यरूपी साधनें म्हटली म्हणजे उत्तरकालीन संस्कृत वाङ्मय होय व यामुळें त्यांचे नियम सदोष होत. कालिदास, भवभूति, सुबंधु, दंडी, माघ, बाण, भारवि, शूद्रक इत्यादि जे कवी होऊन गेले. ते सर्व संस्कृत भाषा प्रचारांतून गेल्यानंतर व केवळ विद्वान् मंडळींस आपआपसांत अगर राजदरबारांत खेळखंडोबा करण्याची ती भाषा झाल्यानंतर झाले. सर्व जनतेस हालविणारी कविता या कवींनीं लिहिलीच नाहीं. या कवींनीं केलेली कविता सामान्यांसाठीं नव्हतीच. जनतेस हालवून सोडणारीं साधी कवनें न लिहितां केवळ लालित्य पहाणारे व अलंकार वापरणारेच हे कवी बनले. रामायण काव्य साधें व आवेशपूर्ण आहे; व तें सामान्यांपर्यंत पोहोचणारें व राष्ट्रावर म्हणजे कोट्यावधि लोकांच्या मनावर हजारों वर्षे राज्य करणारें असें काव्य झालें आहे; त्यासारखी या कवींनीं कृति केली नाहीं. पंचमहाकाव्यांपैकीं असें कोणतें काव्य आहे कीं, जें सामान्य जनांस हालवून सोडील. लेलेशास्त्र्यांसारख्या प्रसिद्ध कवीनें रघुवंशाचें भाषांतर केलें व तें जावजींनीं छापलें व त्यांत जावजीस तोटा आला ही गोष्ट सर्वविश्रुत आहे. सामान्य जनतेस हालवून सोडील व प्रिय होईल अशा काव्यास त्या कालीं योग्य असे विषय नव्हते असें नाही. ग्रीकांच्या चालीस अवरोध करणारा चंद्रगुप्त, कोरूरची लढाई जिंकणारा विक्रमादित्य, असे अनेक पराक्रमी व थोर राजे होऊन गेले. ते महाकाव्य लिहिण्यास योग्य विषय होते व तत्कालीन लेखकांनीं व कवींनीं त्याचें पराक्रमवर्णन करण्यांत आपलें कौशल्य खर्चिलें असतें तर देशांत स्वदेशाभिमान उत्पन्न करणारें वाङ्मय तयार करून कदाचित् हिंदुस्थानच्या इतिहासाचें स्वरूपहि बदललें असतें.

संस्कृत साहित्यशास्त्रकारांचा अवलोकनविषय उत्तरकालीन कविता असल्याकारणानें त्यांची बुद्धि विशिष्ट प्रकारच्या गीर्वाणांत अकडली गेली. ज्या काव्यांचा परिणाम सूक्ष्मदृष्टीनें अलंकार पहाणार्या विद्वानांवर होईल तीच कविता त्यांचा विचारविषय झाली. हा त्या साहित्यशास्त्रकारांचा मोठा दोष होय.

कालिदासाचे ग्रंथ पाहिले असतां रामायण, भारत व कथासरित्सागर यांत जी कथानकें आहेत तीच हातीं घेऊन त्यांत थोडाबहुत फेरबदल करून ती अलंकारांनीं व भाषालालित्यानें सजवून काढण्याचा त्याचा हेतु होता असें दिसतें. जेव्हां विचार करण्याचें अगर कौशल्य दाखविण्याचें क्षेत्र नियमित होतें तेव्हा सूक्ष्म भेद व सूक्ष्म विचार हीं फार प्रसृत होतात. साहित्यशास्त्रावरील लेखकांत जी सूक्ष्मबुद्धि दिसते तीच वेदान्त्यांत दिसते, व ही दोन्ही ठिकाणीं दिसून येणारी सूक्ष्मता कोंडलेल्या बुद्धिक्षेत्राचें निदर्शक आहे.

उक्तकथांची पुनरुक्ति करण्यांत कौशल्य दाखविणारी व सामान्य जनापर्यंत जाण्यास भिणारी व नियमित अवकाशांत कोंडलेली अशी उत्तरकालीन संस्कृत लेखकांची कविता होती. असल्या तर्हेच्या कवितेंतून जे साहित्यनियम निघाले ते अर्थात सदोष अथवा अपूर्ण रहाणारच. आजचें गीर्वाण आपणांस सर्वजनमान्य करावयाचें आहे, तर परंपरागत साहित्यनियमांनां आपणांस चिकटून रहातां येणार नाहीं. एवढेंच नव्हे, तर सर्वोत्कृष्ट काव्य कोणतें व हीन काव्य कोणतें या संबंधाचें संस्कृतग्रंथकाराचें विवेचन व नियम उपयोगी पडणार नाहींत. उत्तम काव्याचें लक्षण संस्कृतग्रंथकारांनीं दिलें आहे तें येणेंप्रमाणें:- ''व्यंग्यार्थास जेथें प्राधान्य असेल तें उत्तम काव्य.'' या प्राचीनांच्या विचाराचाच येथें विचार करूं. जेथे व्यंग्यार्थास प्राधान्य असेल तेथें वाक्यास अगर उद्गारांस शोभा येते यांत शंका नाहीं. स्पष्ट शब्दानें न देतां जर कोणी एक दोन शालजोडींतले दिले तर तें वाक्य सुशिक्षित मनुष्यास अधिक मौजेचें होतें; पण एवढ्याच गुणानें काव्य ''उत्तम'' होणार नाहीं. एखाद्या वाक्यास सुंदर करण्यासाठीं हें तत्त्व लावलें तर चालेल. पण लांबलचक काव्यास हें लागू पडणार नाहीं. तसेंच एखाद्या अशिष्ट पात्राच्या तोंडीं ध्वन्यात्मक वाक्य घातलें तर तें शोभणार नाहीं. साहित्यशास्त्रकारांचा, लांबलचक कृतीस ही कसोटी लावण्याचा प्रयत्न होता असें दिसत नाहीं. एखाद्या वाक्याची अगर एखाद्या श्लोकाची योग्यता ठरविण्यास वरील तत्त्व उपयोगी पडेल असें वाटतें.

थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे जुन्या साहित्यकारांचे विचार आज काव्यपरीक्षणास अपुरे आहेत. संस्कृत साहित्यशास्त्र म्हणजे कृत्रिम कवितेचें साहित्यशास्त्र होय. अर्वाचीन टीकाकारांनीं आणि कवीनीं परंपरागत नियम विचार केल्याशिवाय मान्य करूं नयेंत.

ज्याप्रमाणें कांचेच्या घरांत ती फळें उत्पन्न केलीं असतील ती फळें चाखूनच जर कोणी उत्तम फळ कोणतें याविषयीं अभिप्राय दिला तर तो ग्राह्य होणार नाहीं, त्याप्रमाणें संस्कृतसाहित्याचे नियम देखील ग्राह्य होणार नाहींत.

स्वतंत्र व सार्वजनिक कवितेच्या साहाय्यानें हे नियम निर्माण झालेच नाहींत. राजवाड्याभोंवतालीं जी कविता शिष्ट म्हणून समजली गेली आणि जनतेचा संपर्क ज्या नाटकास अगर कवितेस लागला नाही, तसेंच सामान्य जनभाषेपेक्षां भिन्न अशा भाषेमध्यें ज्या कवितेची जोपासना झाली, त्या कवितेची खर्या सार्वजनिक कवितेशी तुलना होणार नाहीं. व संस्कृतसाहित्यकारांनीं आपले नियम बहुतांशीं असल्या कवितेपासून काढले असल्याकारणानें त्या नियमांचें अवलंबन करणें आज अनवश्यक आहे एवढेंच नव्हे, तर हानिकारक होय.

उत्तरकालीन संस्कृत कवितेंत कौशल्य आहे; पण तें कृत्रिम क्रीडासरोवरात नाजूक नावेंत बसून स्त्रीप्रेक्षकांकरिता वल्हीं मारणाराचें कौशल्य आहे. अफाट समुद्रात संचार करणार्या खलाशांचें कौशल्य त्यांत नाहीं व नाजुक वल्हीं मारण्याच्या कलेचेंच पृथक्करण करण्याचा संस्कृतसाहित्यकाराचा प्रयत्न आहे. जनतासमुद्रांत निर्भयपणें संचार करणार्या कवीचें कलापरीक्षण करण्याचा प्रयत्न संस्कृतसाहित्यानें केला नाहीं.

संस्कृतसाहित्यकारांमध्यें काव्यपरीक्षणाचे दोष काय होते ते सांगितले. मराठी भाषेमध्यें पेशवाईअखेरपर्यंत काव्यविवेचक लिखाण झालें त्यांत दोन तीन प्रकार झाले. एक तर संस्कृतसाहित्यग्रंथांचीं भाषांतरें अगर संस्कृत ग्रंथांच्या आधारावर रचलेले ग्रंथ बाहेर पडले. शिवाय असें बरेंच पुस्तकपरीक्षणात्मक लिखाण झालें कीं, काव्यविवेचन त्यामध्यें मुळींच नसून ग्रंथकारास हास्यापद कसें करावें व लोकांस कसें हंसवावें इकडेच त्याचें लक्ष होतें. पौरस्त्य व पाश्चात्त्य कल्पनांचें ज्यांत एकीकरण झालें आहे व पुस्तकपरीक्षण देखील ज्यांत कुशलतेनें झालें आहे असे कित्येक लेख विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखणींतून बाहेर पडले. परंतु असें लिखाण फारच थोडें झालें आहे.

आपणांस आतां चांगलें काव्य कोणतें, वाईट काव्य कोणतें याविषयीचे नियम स्वतंत्र विचार करून केले पाहिजेत. उत्तम काव्य म्हणजे काय, महाकवी कोण होऊन गेले, इत्यादि गोष्टीसंबंधानें प्राचीनांची सर्व मतें सध्यां गुंडाळून ठेवूं आणि पूर्वकालीन व उत्तरकालीन संस्कृत कविता, पेशवाई पूर्वीचें मराठींतील पद्यात्मक ग्रंथ व अर्वाचीन मराठी कविता याच्या गुणदोषांचें निरीक्षण आणि या सर्व प्रकारच्या कवितेचें महत्त्वमापन करूं.

काव्यग्रंथ हा सारस्वताचा केवळ एक अंश अगर प्रकार आहे. ज्या गोष्टींनीं कोणत्याहि ग्रंथाचें महत्त्व ठरतें त्या गोष्टी काव्यांचें देखील महत्त्व ठरवितील.

''काव्य'' हें मनुष्यावर कांहींतरी परिणाम घडवितें. जर तें कांहीं विशिष्ट परिणाम घडविणार नाहीं तर तें काव्यच होणार नाहीं. लोकांचीं अंतःकरणें, त्यांच्यापुढील ध्येयें यांचा आणि काव्यग्रंथांचा निकट संबंध आहे.

ज्याप्रमाणें मोठ्या जगज्जयिष्णु योद्ध्याचें महत्त्व, जगांत त्यानें घडामोडी घडविल्या असतील त्यांवरून आपण ठरवितों त्याप्रमाणेंच, कवीचें अगर त्याच्या काव्याचें महत्त्व त्यानें आपल्या काव्यानें लोकांच्या मनावर काय परिणाम घडवून आणला हें पाहून ठरविणें योग्य आहे. मनावर परिणाम घडविणें म्हणजें काय हें येथें सांगतों. रोगद्वेषादि भाव जगांतून कधींहि नाहींसे व्हावयाचें नाहींत. तथापि या भावांस कांहीं विशिष्ट वळण देणें शक्य आहे. कोणत्या गोष्टीविषयीं देशांत प्रेम असावें, कोणत्या गोष्टींविषयीं लोकांस द्वेष वाटावा हें ठरविण्यांत कवींस मोठें कार्य करतां येईल. कवींचें व काव्यांचें महत्त्व, लोकांच्या अंतःकरणाच्या (म्हणजे त्यांच्या मनोभावांच्या आणि अभिरुचींच्या) इतिहासांत विशिष्ट काव्यांनीं जें कार्य घडविलें असेल त्यावरून ठरवावें. काव्याचा परिणाम काय झाला हें पाहिलें म्हणजे काव्याचें महत्त्व लक्षांत येऊं लागतें.

निरनिराळ्या काव्यग्रंथांचें महत्त्व आपण त्यांच्या परिणामांवरून ठरवूं.

रामायण व महाभारत हीं काव्यें तर इतकीं सुप्रसिद्ध आहेत कीं, ती ज्यांस ठाऊक नाहींत असा हिंदु विरळा. पण ज्यांस रघुवंश माहीत आहे असा वर्ग फारच थोडा सांपडेल. रामायण या काव्याच्या योगानें हिंदुस्थानांतील सर्व जनांवर काय परिणाम होत आहे हें सांगावयास नको. लोकांच्या आयुर्नियमनास हीं दोन काव्यें उपयोगी पडत आहेत. पंडितवर्ग टीकाकार आहे हें खरें; परंतु सर्वांत कठोर टीकाकारवर्ग सामान्य जनांचा होय. हा वर्ग दोष काढीत नाहीं, टीका करीत नाहीं, हा मुग्ध आहे; तथापि काव्याची ग्राह्याग्राह्यता कृतीने व्यक्त करणारा आहे. या वर्गावर अनेक वर्षे परिणाम करण्यास जी कविता समर्थ आहे असें आढळून येईल ती कविता खरोखरच महत्त्वाची होय.

महाराष्ट्रांत नामदेव, तुकाराम, रामदास, यांसारखे जे साधुसंत झाले त्यांच्या कवितेचें सार्वजनिक दृष्टीनें महत्त्व मोठें आहे. आजकालच्या मासिकांत प्रसिद्ध होणार्या कवितांपैकीं अशी कोणाची कविता आहे कीं, ती सर्वतोमुखी झाली आहे ? कांहीं नाटकांतील पदें कांहीं थोडा कालपर्यंत सर्वतोमुखी होतात, हें आपणांस दिसतें. तथापि बराच कालपर्यंत जिवंत राहिलेली अशीं पदें सौभद्रासारख्या फारच थोड्या नाटकांत दृष्टीस पडतात. जी कविता सर्वमान्य झाली तींत कांहीं तरी महत्त्वाचा चित्ताकर्षक गुण आहे हें आपणांस आढळून येईल.

साधुसंतांच्या कवितेंत जो गुण होता तो हा कीं, जनतेच्या मनोरचनेस त्यांनीं विशिष्ट प्रकारचें वळण दिलें. आज भक्तिपर ग्रंथ व काव्यें हीं नाटकें व कादंबर्यांइतकीं किंबहुना अधिक खपतात असें म्हटलें तरी चालेल.

सामान्य जनापर्यंत पोंचण्यासाठीं काव्य कसें असावें व तें काव्य करण्याचा अधिकार कोणास आहे याची कल्पना महाराष्ट्र-कवींस उत्तम असावी असें दिसतें. महाराष्ट्र-कवींचें या बाबतींत महत्त्व कसें आहे, हें जर आपणांस पहावयाचें असेल तर आपण एकदोनच गोष्टी लक्षांत घ्याव्यात. पूर्वकालीं छापण्याची कला नव्हती तरी देखील एका कवीनें केलेलें काव्य थोड्या कालांतच सर्वतोमुखीं होई. गोंधळी, भजनीबोवा, कीर्तनकार, गाणारणी हे सर्व वर्ग काव्यप्रकाशनास लागत व सध्यां देखील ते वर्ग नष्ट झाले आहेत असें नाहीं. तरी देखील अर्वाचीन कवींची कृति सामान्य जनतेपर्यंत पोंचत नाहीं.

कवितेमध्यें तिची सार्वजनिकता हा एक मोठाच गुण आहे. तथापि या गुणाप्रमाणें कवितेचें महत्त्वमापन करणें धोक्याचें देखील आहे. आपण सार्वजनिकतेचीं कारणें कोणतीं आहेत याचें पृथक्करण केलें पाहिजे. उदाहरणार्थ, जर क्रमिक पुस्तकांतून काहीं कविता प्रसिद्ध झाली तर ती कालांतरानें सार्वजनिक होणारच. तथापि तेवढ्यानें ती चांगली कविता होईल असें नाहीं. अलीकडे तर बाष्कळ कवितेचा भरणाच क्रमिक पुस्तकांतून आढळत आहे. व ती कविता सरकारी नियंत्रणामुलें सर्वविश्रुत होत आहे. पण केवळ तेवढ्यावरून ती कविता चांगली असें होत नाहीं.

कांहीं कवितेचें महत्त्व कवींच्या व्यक्तिविशिष्टत्वामुळें ठरतें. पुष्कळदां असें होतें कीं, कांहीं शब्द अगर वाक्यें विशिष्ट व्यक्तीनें उच्चारलीं असतां त्या वाक्यांस निराळाच जोर येतो. अनेक प्रसंगीं केवळ शब्दांत जोर नसतो, उच्चारणार्याचा जोर शब्दांस मिळतो. पोलिटिकल एजंटाची विनंति आपल्या राजेरजवाड्यांस किती आदरणीय वाटतें हें कोणास नव्यानें सांगावयास नको. कवितेचें अगर उपदेशाचें असेंच आहे. एखाद्या मोठ्या अधिकाराच्या मनुष्यानें उच्चारलेले शब्द वाचतांना अगर ऐकतांना त्या मनुष्यांविषयींचा आदर मूर्त होऊन त्यांच्या शब्दांस जोर आणतो.

''मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥''

हे रामदासांचे शब्द वाचतांना रामदासांची पवित्रता, त्यांचा अधिकार व त्यांचें चरित्र हीं डोळ्यापुढें उभीं रहातात व त्या शब्दांस जोर देतात. ज्यास रामदास कोण म्हणून माहीत नाहीं त्यास वरील शब्दांतील गांभीर्य हृदयगोचर होणार नाहीं. वाक्य पुष्कळदां संबंधानुसारानेंच रसमय होतें, त्याप्रमाणेंच तें परिणामकारी होतें तें वक्त्याच्या महत्त्वानुरूप होतें. नामदेव, रामदास, तुकाराम इत्यादि कवींच्या कवितेच्याच मोहकतेमुळें त्यांची कविता सर्वविश्रुत व सर्वमान्य झाली असें नाही तर इतर त्यांचे गुण आणि महत्त्व हीं देखील त्यांच्या काव्यप्रसिद्धीस व व्याख्यापरिणामकरित्वास कारण आहेत. पूर्वकालीन महाराष्ट्रीय कवी तत्कालीन जनांचे पारमार्थिक दृष्ट्या मार्गदर्शक बनत होते. तो अधिकार आजच्या कवींच्या अंगीं नाहीं. आजचे कवी जनतेकडून कार्ये करविणारे व त्या कार्यांच्या साधनिकेस आपल्या कवितेचा उपयोग करणारें नाहींत. खरोखर पहातां या कलांत आपल्या लोकांची कार्य करून दाखविण्याची ताकद पुष्कळच कमी झाली आहे. व ज्या मार्गांनीं शक्तीचा आपण व्यय करूं असे फारच थोडे मार्ग खुले आहेत.

कवितेचें महत्त्व ठरविणारी आणखी एक बाब म्हटली म्हणजे तिचा लोकांच्या मनावर इष्टानिष्ट परिणाम घडविण्याची शक्ति होय. जी कविता लोकांच्या मनोवृत्ति, अगर अभिरुचि यांच्यामध्यें क्रांति घडवून आणण्यास समर्थ होईल ती कविता अधिक महत्त्वाची होय. कवितेमध्यें सुद्धां ''फ्याशन्स्'' असतात. जुनी फ्यशन बदलून नवीन फ्याशन पाडण्यास तरी काव्यगुण लागतो. एकदां फ्याशन पडली म्हणजे तिचें अवलंबन करणारे लोक फार. तथापि जनतेच्या रूढ अभिरूचीविरुद्ध जाणें हें चांगल्या कवींसहि जड जातें. कोणत्याहि राष्ट्राच्या कवितेस एकाच तर्हेचें स्वरूप ठेवून कधीं उपयोगी नाहीं. अभिरुचींत व उत्पादनात फरक झाल्यानेंच प्रगति होते. ज्याप्रमाणें एकाच पोषाखांत मनुष्यास नेहमीं पहात असता एकदम निराळ्या पोषाखांत पाहिलें म्हणजे त्याची ओळख पटत नाहीं, तथापि त्यास निरनिराळ्या प्रकारच्या पोषाखांत पहाण्याची लोकांस संवय झाल्यास त्या मनुष्याचें खरें स्वरूप ज्याप्रमाणें अधिक लक्षांत येतें, त्याप्रमाणेंच कवितेची गोष्ट आहे. निरनिराळ्या स्वरूपांत जेव्हां कविता दृष्टीस पडूं लागेल तेव्हां कवितेचें खरें स्वरूप लक्षांत येईल.

पेशवाईच्या अस्तापूर्वीच्या व अस्तानंतरच्या कवितेमध्यें व जनतेच्या अभिरूचीमध्यें बरेचसे फेरफार दिसून येतात. काव्याचे विषय आतां निराळे झाले आहेत. पूर्वी ज्या विषयांवरील ग्रंथ पद्यात्मक होते त्या विषयांवर आतां गद्यात्मक ग्रंथ प्रसिद्ध होऊं लागले आहेत. नाटकें व कादंबर्या ह्यांच्यामध्यें बरेंच कौशल्य दिसून येत आहे. बरेंच मोठें व जें तयार करण्यास अखंड परिश्रमाची आवश्यकता आहे असें काव्यं करण्याची ताकद ज्यास आहे असा वर्ग नष्ट झाला आहे. कवितेमध्यें व्याकरणशुद्धि व शब्दसौष्ठव वाढत आहे. वृत्तामध्यें जुळविण्यासाठी होणारी शब्दांची तंगडीमोड कमी होत आहे. शेले, कीट्स् इत्यादि कच्च्या दमाच्या व नाजूक कविता करणारांचें अनुकरण वाढत आहे. पारमार्थिक कविता कमी होत आहे. पुराणांतर्गत इतिहासाऐवजीं अर्वाचीन इतिहास काव्यविषय होत आहे. शृंगारादि विविध रसांचा परिपोष करण्याकडे कल्पनेच्या कांहीं उंच, कांहीं उद्दाम, कांहीं अनुकरणाच्या, अशा उड्या घेण्यांत स्फुट कविता लिहिणारांचा वर्ग बराच गुंतत आहे.

अलीकडील कवींच्या स्फुट कवितेमध्यें रसपरिपोष फारसा दिसून येत नाहीं. वृथावर्णन, अलंकार, आणि कल्पना हींच फार दिसून येतात.

येथील शृंगारिक कविता म्हणजे अत्यंत क्षुद्र अशी भासते. आमच्या नजरेस पडलेल्या एका काव्यांतील कवि तर मनाचा विलक्षणच दुबळा होता. त्याची बायको माहेरीं गेली; ह्या विरहामुळें त्याच्या मनाला इतका शोक झाला कीं, पुढें त्यास मूर्च्छा आली व मूर्च्छेतून शोकपूर्ण कविता म्हणत म्हणत तो जागा झाला. कवि इतका दुर्बल खरोखरच असेल असें वाटत नाहीं; पण त्यास शोक मात्र वर्णन करावयाचा असेल. विप्रलंभशृंगार वर्णन करण्याची उत्कंठा असेल; पण माहेरीं गेलेल्या बायकोशिवाय त्यास तो योग्य काव्यविषयच सांपडला नसेल. कवीचा अनुभव असा असल्यामुळें व केवळ कल्पनेनेंच मनोभाव वर्णन करण्याचें कवीस प्रयोजन पडल्यामुळें शृंगारिक कविता पोंचट होतें. कांहीं नाटकांतून मात्र निरानिराळे रस साधिले जात आहेत.

आजच्या कवितेचें महत्त्वमापन परिणामाच्या दृष्टीनें करतां येणेंप्रमाणें होईल:—

पारमार्थिक ज्ञान अगर पौराणिक कथा हींच केवळ काव्यविषय नाहींत हें जनतेस दाखवावयाचें होतें, तें काम काव्यें शिकावयास लावणारीं विद्यापीठें करीत आहेत, व तेंच कार्य करण्यास अर्वाचीन कवींनीं बरीचशी मदत केली. इंग्रजीं शिक्षणानें बदललेली रुची रिझवायासाठीं कांहीं एक नवीन तर्हेचें खाद्य तयार केलें.

सध्यांच्या स्फुट कवितेपैकीं किती कविता कांहीं कालपर्यंत तरी टिकेल याची वानवाच आहे.

जनतेच्या मनास मोहून सोडणारी, राष्ट्रावर परिणाम घडविणारी व सर्वतोमुखीं होईल अशी कविता झालीच नाहीं.

पारमार्थिक कविता थोडीबहुत अजून चालू आहे, ती जुन्या पद्धतीचीच आहे. अर्वाचीन बौद्धिक परिस्थिति लक्षांत घेऊन नवीन उदात्त विचार लोकांच्या मनांत ठसवील अशी कविता झाली नाही.

थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे अर्वाचीन मराठी कविता संक्रमणाची दर्शक आहे. तिच्यांत चिरकाल टिकणारी किंवा निदान बराच वेळ टिकणारी कविता नाहींच; पण पारमार्थिक कविताच वाचण्यांत गढलेल्या लोकांची चव बदलण्यांत मात्र तिचा थोडाबहुत उपयोग होईल.

कवितेतील अलंकारबहुलता व कल्पनाप्राचुर्य  हीं कवींच्या कोंडलेल्या बुद्धीचीं द्योतक आहेत. कल्पना करा, उद्यां सरकारनें असा कायदा केला कीं, ''बादशहा पंचम जॉर्ज यांच्याखेरीज कोणत्याहि विषयावर कवींनीं कविता करूं नये.'' असा जर कायदा झाला तर कवीची बुद्धि निरनिराळे कल्पनातरंग आणि जॉर्ज बादशहा यांची सांगड घालण्यास पुढें सरसावेल. नवीन उपमा बाहेर येतील, नवीन तर्हेनें त्या मांडल्या जातील, कधीं कवीस भास होईल, कधीं संशय पडेल, कधीं जॉर्ज बादशहाची अनन्वयता नजरेस येईल व त्या कालीं कल्पनेचे फांदाडे जो अधिक फोडील तो अधिक प्रसिद्धि पावेल व मान्य कवि समजला जाईल. सध्यां कवीचें काव्यक्षेत्र बरेंच कोंडल्यासारखें झालें आहे व जो कवि रसनिष्पत्तीकडे लक्ष न देतां, मनांतील भाव तीव्रत्वानें न वठवितां केवळ कल्पनेच्या भरार्या मारील व अलंकारयुक्त वाणी वदेल तोच कवि चांगला असें लोकांस वाटूं लागलें आहे. सध्यां जे दोनचार कवी चांगल्यांत मोडतात, त्यांचा मुख्य गुण म्हणणे कल्पनाप्राचुर्य हाच आहे. सध्यांच्या कवीचें काव्यसाहित्य अल्प आहे. व त्याचा परिणाम लोकांच्या चवीवरहि बराच झाला आहे. ज्याप्रमाणें एखाद्या देशांत फारशीं फळें निर्माण होत नाहींत, पण फळें पिकविणारें लोक दोनचार फळांच्याच शेंकडों जाती निर्माण करतात, व त्या निर्माण करण्यांत बरेंच कौशल्य दाखवितात त्याप्रमाणेंच थोडक्या व शिळ्या झालेल्या विषयांवर कविता करणार्या कवीची गोष्ट आहे. तथापि ज्या देशांत फळें थोडकीं असून त्यांच्या जाती मात्र पुष्कळ झाल्या म्हणजे फलदारिद्र्याचा दोष नष्ट व्हावयाचा नाहीं. त्याप्रमाणेंच विशिष्ट वाङ्मयाची स्थिति आहे. विषयदारिद्र्य आणि कल्पनाप्राचुर्य यांची अगदीं स्वाभाविक सांगड आज मराठी वाङ्मयांत दिसून येते.

आतांपर्यंत चार कालांतील कविता वर्णिली गेली व त्यांचें  गुणदोषविवेचनहि झालें. सार्वजनिकतेच्या व साधेपणाच्या दृष्टीनें थोर म्हणजे दोन कालांतील कविता होय. ते काल म्हटले म्हणजे प्राचीन आर्षकाव्यांचा काल आणि महाराष्ट्रीय साधूंचा काल.

उत्तरकालीन संस्कृत कवितेच्या आणि अर्वाचीन मराठी काव्यांच्या कालांत फारच मोठें सादृश्य आहे. नाटकांचा आणि स्फुट कवितेचा सुकाळ या कालांत आढळतो. मराठी नाटकें मात्र संस्कृत नाटकांपेक्षा अधिक योग्यतेचीं आहेत. एक तर त्यांत विविधता आहे. सर्व जनावर परिणाम घडविणारीं अशीं ती आहेत. संस्कृतमधील तीनचार नाटकें बाजूस काढलीं तर उरलेल्या सर्व नाटकांपेक्षां चांगलीं अशीं मराठी नाटकें पुष्कळ काढून दाखवितां येतील. ही गोष्ट पटण्याकरितां एक गोष्ट सांगितली पाहिजे ती ही कीं, प्रत्यक्ष नाटकांची तुलना खरोखरच करावी. या प्रश्नाचा येथें विशेष खल करण्याचें कारण नाहीं; सध्यां एवढेंच सांगतों कीं, या दोन्ही कालामध्यें साम्य पुष्कळच आहे.

जनतेवर परिणाम करील व तीस अत्यंत आदरणीय होईल अशा प्रकारचें, महाकाव्य अगर खंडकाव्य ज्या व्यक्तींचे चरित्र लोकांस आदरणीय व आदर्शभूत होईल अशा व्यक्तीकडूनच होईल. काव्याचा व तें काव्य करणार्या व्यक्तीचा व हिंदुस्थानच्या भावी मानसिक इतिहासाचा जेव्हां अत्यंत निकय संबंध उत्पन्न होईल. तेव्हां देशाचा खरा अमर्त्य कवि निर्माण होईल. सध्यां हिंदुस्थानांत असा कवि नाहीं. 'काव्य' पहा. [विंटरनिझ; लोकशिक्षण, शके १८३६ माघ, १८३८ आषाढ]

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .